आज १३ ऑगस्ट. हा जागतिक अवयवदान दिन आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजल्या जाते. पण भारतात या बाबतीत अजूनही हवी तेव्हढी प्रगती झालेली नाही.
अवयव दानाचं प्रमाण जगात दर १० लाख लोकांमागे स्पेनमध्ये ३५, इंग्लंडमध्ये २७ तर भारतात फक्त ०.१६ इतकं कमी आहे. म्हणूनच अवयवदानाचं महत्व सांगताहेत या चळवळीतील अग्रणी कार्यकर्त्या आशा कुलकर्णी…
“अवयवदान महादान” असे म्हटले जाते. अवयवदानाचा विषय तसा गंभीरच, कारण तो मृत्यूशी निगडित !
मृत्यू म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेले आपले हे शरीर निष्प्राण होणे किंवा आध्यात्मिक भाषेत सांगायचे झाले तर आत्म्याने शरीराचा त्याग करणे. निरुपयोगी झालेले मृत शरीर जर एखाद्याचे प्राण वाचवण्यास उपयोगी ठरत असेल तर यासारखे पुण्यकर्म नाही. असे म्हटले जाते की “मरावे परी कीर्तिरूपे उरावे” परंतु हे फारच थोड्याना साध्य होते. तर “मरावे परी अवयवरुपी उरावे” हे मात्र सर्व सामान्यांना, गरीब, श्रीमंत सर्वांनाच शक्य होण्यासारखे आहे.
सुदैवाने गेल्या काही वर्षात अवयवदान चळवळ जोमाने कार्य करत आहे. अवयवदानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे “अवयव दान कोण, कधी, व कसे करु शकतो ?” अवयव दान कोणीही निरोगी व्यक्ती तीन टप्यात करू शकतो एक जिवंतपणी, दुसरे मस्तिष्क स्तंभ मृत्यू आल्यास आणि तिसरे नैसर्गिक मृत्यू झाल्यावर.
(१) जिवंतपणी माणूस बोन मॅरो (सत्व चरबी), एक मूत्रपिंड, यकृत – फुफ्फुस -स्वादुपिंड या तीन अवयवांचा काही भाग दान करू शकतो. परंतु हे फक्त रक्ताच्या व जवळच्या नातेवाइकांमध्येच होऊ शकते. तसेच वयाच्या साठ वर्षांपर्यंत सुदृढ व निरोगी व्यक्ती रक्तदान सुद्धा करू शकते.
(२) एखाद्या अपघातात व्यक्तीला मेंदू मृत घोषित केल्यास अनेक अवयव दानासाठी उपयुक्त ठरतात. ज्यामुळे कमीत कमी सात आजारी व्यक्तींना जीवदान मिळू शकते व दोघांना दृष्टी लाभू शकते. तसेच अनेकांच्या शारीरिक व्याधी बऱ्या होतात. मेंदू मृत व्यक्तीच्या शरीरातील हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे व मोठे आतडे, स्वरयंत्र, कंठनाळ, गर्भाशय, कानाचा मध्यभाग, त्वचा, हाडे, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मज्यातंतूची शीर, बीजकोष किंवा अंडाशय, हातापायाची बोटे, असे अनेक अवयव उपयोगी पडतात. मेंदू मृत घोषित झाल्यावर काही काळाने त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. मृत्यूनंतर हे सर्व अवयव जाळून टाकण्यापेक्षा अनेकांना जीवदान देऊ शकतात अनेकांची जीवने फुलवण्यास कामी येतात.
(३) नैसर्गिक मृत्यू आल्यास अगदी सहजपणे डोळे, त्वचा, हृदयाच्या झडपा, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मृदु अस्थींचे वेस्टन इत्यादी अवयव दान करता येतात. ज्यामुळे दोघांना दृष्टी तर मिळतेच परंतु जाळीत रुग्णांना म्हणजेच भाजल्यामुळे गंभीर जखमा होऊन जंतुसंसर्गाने गंभीर अवस्था झालेल्यांना जीवदानही मिळू शकते.
वरील सर्व अवयव नैसर्गिक मृत्यू जर एखाद्या अद्ययावत आधुनिक रुग्णालयात झाला जेथे वरील सर्व अवयव दानाच्या सोयी उपलब्ध आहेत तेथेच दान करता येतील. अन्यथा मृत्यू जर घरीच झाला तर डोळे आणि त्वचा हे दोन अवयव सहजरित्या दान करता येतात.
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूनंतर ३ ते ४ तासाचे आत करावी लागते. या प्रक्रियेस १५ ते २० मिनिटे लागतात. नेत्रदानाचा फॉर्म भरलेला असो वा नसो, जवळच्या नेत्रपेढीला फोनवर कळवता येते. त्वचा दानाची प्रक्रिया ८ ते १० तासाचे आत करावी लागते, त्वचा पेढीला कळवल्यास ३० ते ४० मिनिटात त्वचा दानाची पूर्तता होते. मृत दात्याच्या मांडी व पाठीची त्वचा दानात घेतली जाते. या दोन्ही दानानंतर मृत शरीर विद्रुप होत नाही व अंत्यविधी व्यवस्थित पार पाडता येतो.
तसेच नेत्र व त्वचा दानानंतर देहदानही करता येते. देहदानाचा वैद्यकीय शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी बहुमूल्य उपयोग होतो.
अवयवदानातील गैरप्रकार टाळता यावे किंवा मानवी अवयवांचा व्यापार होऊ नये यासाठी १९९४ मध्ये आपल्याकडे “मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा” पारित करण्यात आला. (Human Organ Transplant Act 1994 – HOTA) या कायद्याचे दोन मुख्य उद्देश आहेत .
१) मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्याचे निश्चित करून तसे प्रमाणित करणे.
२) मेंदूमृत रुग्णाचे कोणते अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत ते ठरवणे. जेणेकरून नातेवाईकांना जिवंतपणी अवयव दान करावे लागू नये.
हा कायदा अतिशय कडक असून त्याच्या अंमलबजावणी साठी कायद्यातील तरतुदीनुसार झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना झाली आहे.
या सेंटरच्या अतिशय महत्वाच्या चार जबाबदाऱ्या आहेत.
(१) अवयव दानाचा प्रचार-प्रसार करणे.
(२) अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाची प्रतीक्षा यादी तयार करणे आणि यादीचे संरक्षण करणे.
(३) दानात प्राप्त झालेल्या अवयवांचे योग्य प्रकारे वितरण करणे.
(४) अवयव दान व प्रत्यारोपण प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये याची खबरदारी घेणे.
या सेंटरसाठी अवयवदान समन्वयक म्हणजेच “ऑर्गन डोनेशन कोऑर्डिनेटर“ विविध रुग्णालयात कार्य करतात. एखादा रुग्ण मेंदू मृत घोषित झाल्यास त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून त्या रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे अत्यंत कठीण परंतु तितकेच महत्वाचे कार्य समन्वयक पार पाडत असतो तसेच कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मदत करतो.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू म्हणजे मानवी शरीरातील चेतना व श्वासोच्छवास या दोन्हींचे केंद्र मेंदूत ज्या भागात असते त्या भागाला कायमस्वरूपी इजा होते तेंव्हा मस्तिष्क स्तंभ मृत्यू होतो. अशा स्थितीत त्या रुग्णाचे हृदय कृत्रिमरीत्या काही काळ क्रियाशील ठेवता येते. या काळात मेंदू सोडून सर्व अवयव सुरक्षित व कार्यरत असतात, कारण सर्व अवयवांना त्या काळात कृत्रिमरीत्या प्राणवायू पुरवला जातो. या काळात अवयव दानाचा निर्णय घेऊन मेंदू मृत शरीरातील सुरक्षित आणि सुदृढ अवयव प्रत्यारोपणासाठी काढणे आवश्यक असते. ही संपूर्ण प्रक्रिया आधुनिक सोयीनीं परिपूर्ण व अद्ययावत रुग्णालयातच होऊ शकते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्याचे निदान करणे अत्यंत जोखमीचे काम असते. कायद्यानुसार हे निदान एकटा डॉक्टर करत नाही तर चार डॉक्टरांची एक टीम हे निदान करून रुग्ण मेंदू मृत झाल्याचे घोषित करते. या टीम मध्ये एक न्युरोलॉजिस्ट, एक मान्यताप्राप्त फिजिशियन, एक भूलतज्ञ्, आणि संबंधित रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर असतात.
या प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेला सर्टिफिकेशन असे म्हणतात. या साठी करण्यात येणाऱ्या चाचण्या महाग असल्या तरी अवयव दान करण्यास नातेवाईकांची अनुमती असल्यास त्यात सवलत मिळू शकते.
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवान स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा होतात. आज आरोग्य विज्ञानातील संशोधनामुळे एखादा सामान्य नागरिकही जीवनदानासारखे सर्वोच्च दान देऊन मृत्यू नंतरही अवयव रुपात अमर होतो.
ही अवयव दानाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोचावी यासाठी कार्यरत सर्व कार्यकर्ते मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशंसेस पात्र आहेत.
चला तर, आज प्रतिज्ञा करू या अवयवदानाची !

– लेखन : आशा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.
देहदान किती महत्वाचे आहे हे आशाताई कुळकर्णी यांनी अतिशय सुंदर रित्या वाचकांना पटवून दिले आहे.मृत शरीराची जाळून राख करण्यापेक्षा जिवंत माणसाला त्याचा उपयोग झाला तर त्यासारखे पुण्यकर्म नाही.