साहसी युवकांना नेहमीच समुद्र खुणावत असतो. बरेच युवक भारतीय नौदलात सामील होतात. पण समुद्रातील करिअर साठी दुसरा एक मोठा पर्याय आहे, तो म्हणजे मर्चंट नेव्ही. या विषयी कॅप्टन विश्वनाथ साठ्ये यांची सौ शलाका आणि प्रा डॉ किरण ठाकूर यांनी गप्पांच्या स्वरूपात घेतलेली मुलाखत निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे.
– संपादक
युद्धस्य कथा रम्या हे खरेच. युद्धावर गेलेल्या सैनिकाच्या कथा ऐकायला सगळ्यांनाच आवडतात. मर्चंट नेव्ही मध्ये आयुष्य घालवलेल्या अनेकांबद्दल देखील इतरांना अशीच उत्सुकता असते.
मी गेली 30-32 वर्षे समुद्रावर नोकरीत कार्यरत होतो. आता सेवानिवृत्तीनंतर पुण्यात पत्नी मुक्ताबरोबर ज्येष्ठ नागरिक म्हणून रहात आहे. माझ्या दोन कन्या शमा व बकुल आपापल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या देशात स्थिरावलेल्या आहेत.
बरेचदा, आलेले पाहुणे, गप्पा मारताना माझ्या करिअर बद्दल प्रश्न विचारतात. तेव्हा त्यांना मर्चन्ट नेव्ही विषयी किती कमी माहिती असते, कसे गैरसमज असतात हे मला कळतं.
नौदलात काम करणाऱ्या माझ्या बरोबरीच्या माझ्या बांधवांना आयुष्यभर समुद्राची संगत करावी लागते. त्यांना युद्धाची तयारी ठेवावी लागते. प्रत्यक्षात क्वचित प्रसंगी परकीय आक्रमणाचा सामना त्यांना करावा लागतो, असा आता पर्यंतचा इतिहास आहे. त्यांच्या सारखंच मर्चंट नेव्ही मध्ये असणाऱ्या आम्हाला समुद्रमार्गे जगाची सफर करणे नित्याचे असते. या कामासाठी समुद्राशी कायम दोस्ती ठेवावी लागते. वादळ वारे, समुद्राच्या महाकाय लाटा, सतत बदलत जाणारे हवामान, बर्फाच्या लाद्या, अनपेक्षितपणे समोर येणारे हिमनग आणि समुद्री चाचे अशा अनेक समस्या हाताळणे हे मर्चंट नेव्ही च्या बोटीवरच्या कॅप्टनचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे नेहमीचे काम असते.
माझ्या कामाचा भाग म्हणून मी ७२ देशांचा बोटीने प्रवास केला आहे. वर्ष १९७१ मध्ये मी सतरा वर्षांचा असताना दोन वर्षाचे प्रशिक्षण ‘डफरीन व राजेंद्र’ नावांच्या बोटीवर घेतले. कॅडेट ते कॅप्टन अशा पायऱ्या परीक्षा देत चढत गेलो. अर्थात आमच्या परिवारात मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करणारा मी काहीं पहिला नव्हतो. माझ्या आधी माझे काका व दोन आत्तेभाऊ या क्षेत्रांत कार्यरत होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी या क्षेत्रात आलो असे निश्चितच म्हणता येईल.
मर्चंट नेव्ही कंपन्यांच्या व्यवसायाचे स्वरूप अर्थातच देशोदेशी लागणाऱ्या मालाची वाहतूक एका देशाच्या बंदरातून दुसऱ्या देशाच्या बंदरात करणे, तो माल तेथे चढवणे / उतरवणे अशा प्रकारचा असते. समुद्रावरील वाहतूक आणि व्यवसाय यासाठी आखून दिलेले आंतरराष्ट्रीय कायदे कानून आणि सामंजस्य करार आणि संकेत यांनी हा व्यवहार नियंत्रित होतो.
या क्षेत्रात येणाऱ्या अनुभवाचे आणि आव्हानाचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नमुन्यासाठी कॅनडाच्या मॉन्ट्रिअल बंदरात आलेल्या अनुभवाची कहाणी सांगतो.
या बंदरावर बोट नेऊन गोठलेल्या नदी / समुद्रामध्ये बर्फाच्या चार-पाच फूट जाड थरातून वाटचाल करण्यासाठी दुसऱ्या छोट्या बोटीची मदत घ्यावी लागते. या वाटचालीत समुद्राला येऊन मिळणाऱ्या लहान मोठ्या नद्या, त्यांच्या पाण्याचे होणारे बर्फ, ते फोडून बाजूला सारून आमची बोट हळूहळू आमच्या नियोजित बंदरावर जाणे हे उद्दिष्ट होते. बंदरावर आमची बोट लागल्यानंतर मगच आमचा माल उतरवून घेणे शक्य होणार होते. बर्फ फोडण्यासाठी आणि फोडलेले बर्फ बाजूला सारून आमच्या बोटीला मार्ग करून देण्यासाठी विशेष प्रकार ची यंत्रणा असलेल्या लहान बोटी असतात. त्यांना Ice Breaker असे म्हणतात. त्यांना दूरसंचार माध्यमातून (VHF) संदेश पाठवून विनंती केली. त्या झपाट्याने पोहोचल्या आणि लगेच कामाला लागल्या. हळूहळू बर्फ फोडत तिने आमच्या बोटीला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. या कामासाठी खाजगी बोटी असतातच. शिवाय कॅनडाच्या कोस्ट गार्डच्या देखील बोटी असतात. आवश्यक तसे, आवश्यक तितकी मदत देणे हे त्यांचे कामच असते. या प्रसंगात चार-पाच फूट जाडीचा बर्फाचा थर जसा फोडून काढायला लागला तसाच समुद्रात तीन-चार फूट जाडीचा असा बर्फ हटवणे यासाठी सुद्धा तांत्रिक यंत्रणा या बोटीवर होती.
हॅम्बर्ग या जर्मनी मधल्या बंदरातून आमचा प्रवास सुरु झाला १५ डिसेंबरला. तेथे चढविलेला माल आम्हाला कॅनडाच्या मॉन्ट्रिअल बंदरात पोहोचवायचा होता. त्याकरिता आम्हाला अटलांटिक महासागर पार करून जायचे होते. हिवाळ्यात या भागात सतत मोठी वादळं होत असतात. तो आमच्या मार्गातील पहिला अडथळा होता. त्या प्रवासाला साधारणपणे ७ दिवस लागतात. पण या वादळी परिस्थितीतून मार्ग काढून महासागर ओलांडायला आम्हाला १० दिवस लागले.
तिथे पोचल्यावर समस्या क्रमांक २! St Lawrence नदी, ज्यावर मॉन्ट्रिअल आहे, ती आणि काही समुद्राचा भाग हे गोठले होते. जिकडे तिकडे बर्फच बर्फ ! तो फोडून, बाजूला सारून बंदराच्या धक्क्याला लागण्या साठी अजून ५ दिवस लागले. आमची बोट धक्क्याला लागली तो दिवस होता ३० डिसेंबर. हा मॉन्ट्रिअल पर्यंतचा प्रवास आणि तिथून माल घेऊन आम्ही त्या थंडीतून आणि बर्फातून पुन्हा बाहेर पडलो तेव्हा मी कॅप्टन आणि माझे सहकारी सर्वाना या अनुभवातून बाहेर पडण्याचा आनंद निश्चित वाटला. परंतु असे अनुभव येण्याची देखील आम्हा सगळ्यांना सवय झालेली असते, त्यामुळे काही मोठा पराक्रम केला असा कुणाचाच आविर्भाव नव्हता.
हे अनुभव कथन करण्याचा उद्देश आमच्या क्षेत्रातील करिअर संबंधी काही थोडी माहिती सांगावी असा आहे. त्यासाठी फ्रिक्वेंटली ऑस्क्ड क्वेश्चन्स (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) आणि त्यांची माझ्या अनुभवानुसार ची उत्तरे या फॉर्मॅट मध्ये मांडून बघतो :-
१. या करिअरमध्ये नेहमीच खूप मोठी रिस्क असते हे खरे का ?
इतर कोणत्याही नोकरी / व्यवसायात असते तेवढीच रिस्क या क्षेत्रात असते. त्यामुळे त्याचा कोणीही बाऊ करत नाही. जी काही रिस्क येईल, तिला यशस्वीरीत्या तोंड देणे हे महत्वाचे. याचे ट्रेनिंग आम्हा सगळ्यांना पहिल्या दिवसापासून दिलेले असते. आमच्या कंपनीने नियमितपणे आयोजित केलेल्या ट्रेनिंग मध्ये नित्य नवे तंत्रज्ञान आम्हाला आत्मसात करता येते. त्याचा उपयोग होतो.
२. समुद्रावरच्या पर्यावरणाचा / हवामानाचा प्रकृतीवर काही अनिष्ट परिणाम होतो का ?.
हे तर मुळीच खरे नाही. समुद्रावरील हवा आणि पाणी हे प्रदूषण रहित असते. पर्यावरण हे इतके आल्हाददायक आणि उत्साहवर्धक असते की आम्ही बोटीवर निघताना सोबत असावा म्हणून घेतलेला औषधाचा बॉक्स प्रवास संपवून परत मुंबईला येतो तोपर्यंत उघडलेलाही नसतो.
३. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची आणि तुमच्या कुटुंबीयांना तुमची आठवण येत असेलच. मग तुम्ही एकमेकांच्या संपर्कात कसे राहता ?
आठवण तर एकमेकांना सतत होत असते. आता तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि व्हाट्सअप मुळे संपर्क साधणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी ते नव्हते तरीसुद्धा त्याच्या संबंधी कोणीही कधी तक्रार केली नाही. आमची पत्रे एकमेकांना पोचायला महिना दोन महिने लागत असत.
माझ्या पत्नीने कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या सुरळीतपणे आयुष्यभर पार पाडल्या. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की “शी वॉज द मॅन ऑन द स्पॉट अँड शी टुक ऑल द डिसिजन्स बोल्डली अँड करेक्टली इन माय अब्सेंस !” मुलांच्या शाळांच्या कॉलेजांच्या आणि करिअर प्लॅनिंग च्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या मुलींनी त्यांच्या आईच्या मदतीने पार पाडल्या.
४. तुमचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षाचे असेल असे मी समजतो. इतर क्षेत्रात सेवानिवृत्तीनंतर दुसरी काही व्यवधानं लोक लावून घेतात. मर्चंट नेव्ही मध्ये हे शक्य आहे का ?
या क्षेत्रात सेवानिवृत्तीचे वय नाही. माझे एक सहकारी आता सत्तर वर्षाचे झाले आहेत. ते अजूनही तितक्याच उत्साहाने समुद्रावर बोटीवर काम करीत असतात. अर्थात हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असतो. जोवर तुमची तब्येत ठणठणीत आहे तोवर हे शक्य होते.
आयुष्यभर मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर इतर क्षेत्रात नोकऱ्या सेवानिवृत्तीनंतर मिळू शकतात. प्रशासकीय जबाबदारीच्या कामात तर ते उत्तम रित्या यशस्वी होताना दिसतात.
५, आता भूदल, नौदल आणि हवाईदल या क्षेत्रात महिला काम करताना दिसतात. त्यात त्या यशस्वी झाल्याचेही आपण कौतुकाने वाचतो. मर्चंट नेव्हीत तसे फार दिसत नाहीत हे खरे आहे का ?
होय. आतापर्यंत मुली या क्षेत्रात फारशा उत्साहाने प्रवेश करताना दिसल्या नाहीत पण आता हळूहळू हे क्षेत्र सुद्धा त्या पादाक्रांत करताना दिसतील अशी चिन्हे आहेत.
— मुलाखतकार : सौ शलाका ठाकूर व प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कॅप्टन विश्वनाथजी साठ्ये …यांची सौ.शलाकाजी ठाकूर आणि प्रा. डॉ.किरणजी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत एकदम बोलकी आहे आणि कॅप्टन विश्वनाथजी साठ्ये यांनी सांगितले आपले अनुभव अगदीच छान आणि त्यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखे मर्चंड नेव्ही या क्षेत्रात आत्ताच आमच्या रायगड जिह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी गावाची माझ्या भावाची मुलगी आगरी समाजातील पहिली मुलगी सृष्टी राजश्री राजेंद्र मुंबईकर ही मर्क्स कंपनीच्या जहाजावर चीन जेथे कार्यरत होऊन मलेशिया सिंगापूर अश्या अनेक देशांच्या समुद्राला आपल्या कवेत घेऊन सफर करत आहे आणि म्हणूनच या सागरी कन्येच आम्हां समस्त आगरी समाजाला सार्थ अभिमान आहे!..
सुरेख मुलाखत शब्दांकनही छान.