मर्यादा म्हणजे तरी काय हो ? आपणच आपल्याला स्वेच्छेने घातलेले बंधन किवा दुसऱ्या कुणीतरी आपल्यावर लादलेले बंधन, खरं ना ?
आपली संस्कृती जतन करणे वा आई वडिलांकडून मिळालेले संस्कार जोपासणे, पाळणे यातही मर्यादा असतातच. आजच्या तरुण पिढीचे स्वैर जीवन पाहता तोकडे कपडे घालून राजरोस रस्त्यावर हुंदडणे असो, घरी वडिलधारी मंडळी असतानाही मोठमोठ्याने हसत खिदळत गप्पाष्टक रंगवणे असो वा वयाचे भान न ठेवता उलट उत्तर देणे असो अशी कितीतरी उदाहरणे मर्यादा उल्लंघनाची देता येतील, पण कालाय तस्मे नमः म्हणायचं अन हे मर्यादा उल्लंघन सहजचि सहन करायचं.
नुकतंच ११ जुलैला मला बहात्तरावं वर्ष लागलं. म्हणजे वार्धक्य सुरु आहे म्हणायचं. तसा वयाने जेष्ठ असलो तरी मनाने प्रफुल्ल, टवटवीत, तरुणच आहे बरं का ! त्यातच पत्नि वियोग झाला असल्याने कुटुंबात वावरताना अनेक मर्यादा पार पाडव्या लागतात पण त्याला काही इलाज नसतो. खरं तर हे परावलंबित्वाचं जीणं त्यामुळे त्या मर्यादेत राहून प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायचा, अन मला तो मिळतो देखील, त्यामुळे अशा मर्यादांचं काही वाईट वाटत नाही.
तरुणपणी म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी अस्मादिकांनी छान गोड मुलीवर प्रेम केले, त्यावेळी सहा महिन्यांचा विरह सोसावा लागणार होता. एकत्र फिरलो, संसाराची सुखस्वप्न रंगवली पण कधी तिच्या शरीराला स्पर्श केला नाही. मीच माझ्या मर्यादा त्या काळी ठरवून ठेवल्या होत्या. जे काही ते लग्नानंतरच आधी नाही असा मर्यादेचा सदरा अंगी चढवला होता. आता विरह होणार म्हणून एखादे तरी चुंबन घ्यावे अशी मनांत उर्मी होती, परंतु मर्यादेचं जागृत भान असल्यामुळे मनातली इच्छा मनातच ठेवली. मर्यादेच्या मर्यादांना तडा जाऊन दिला नाही. आज या गोष्टीचा अभिमान वाटतो, क्षणिक उत्पन्न झालेला मोह घरची संस्कृती अन स्वतःच ठरवलेल्या मर्यादा यामुळेच पाळला गेला हे महत्वाचे. मर्यादेचं बंधन पाळल्यामुळेच अनैतिकतेच्या चिखलात घसरून पडलो नाही हे ही तितकेच खरे. असो.
मी सोडून सारी लाज, बेधुंद नाचले आज, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू………. तुटले रे ! असं होतं कधी कधी, मेनी हार्टस् मेनी माईंडस् या उक्तीप्रमाणे असं घडत असतं, चालायचंच. ज्याने त्याने स्वतःच्या मर्यादा ठरवाव्यात इतकंच म्हणेन मी. मर्यादा या विषयावर मर्यादितच लिहिलेले बरे, पटतंय ना ?

— लेखन : सुनील चिटणीस
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मर्यादा ही संकल्पना सुरेख स्पष्ट करून जीवनातील,आपल्या संस्कृतीतील महात्म्य सुरेख शब्दबद्ध केले.
मर्यादा ही संकल्पना सुरेख स्पष्ट करून जीवनातील,आपल्या संस्कृतीतील महात्म्य सुरेख शब्दबद्ध केले.