भारतीय अर्थ व्यवस्थेला नवी दिशा आणि नागरिकांना नवी आशा देण्याचे ऐतिहासिक कार्य अर्थतज्ञ, अर्थमंत्री आणि पुढे देशाचे सलग दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले परम आदरणीय डॉ मनमोहन सिंग यांनी केल्याचे आपण जाणतोच आणि दररोजच्या जीवनात अनुभवही असतो. काल त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या साधेपणाचे मला आलेले, मी पाहिलेले आणि मला भावलेले अनुभव आठवले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात मी २००३ ते २००८ अशी पाच वर्षे वृत्त विभागाचा उपसंचालक म्हणून कार्यरत होतो. मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, सचिव आणि विशेष म्हणजे मा. राष्ट्रपती, पंतप्रधान, इतर देशांचे प्रमुख या सर्वांच्या मुंबईतील बैठकांची, कार्यक्रमांची, पत्रकार परिषदांची प्रसिद्धी व्यवस्था पाहणे, टिव्ही कव्हरेज करणे, छायाचित्रं काढणे, बातम्या तयार करून हे सर्व प्रसिद्धी साहित्य दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे यांना मिळेल, असे पाहणे असे अतिशय जिकिरीचे काम वृत्त शाखेला करावे लागते. एका शब्दाची, अर्थाची चूक सुध्दा होऊ नये म्हणून फार काटेकोरपणे काम करावे लागते आणि करून घ्यावे लागते. असो.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु, अर्थतज्ञ प्रा डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी अर्थ शास्त्रावर लिहिलेल्या एका इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी २००३ साली डॉ मनमोहन सिंग यांना आमंत्रित केले होते.
त्यावेळी ते कुठल्याही पदावर नव्हते. पण माजी अर्थमंत्री, जेष्ठ अर्थतज्ञ तसेच मुंबई विद्यापीठाकडून कार्यक्रमाचे कव्हरेज करण्याची विनंती माहिती खात्याला करण्यात आली होती. त्या प्रमाणे आम्ही ती केली. आता मुंबईत असे कार्यक्रम नेहमीच होत असतात. त्यामुळे कार्यक्रमासाठी वृत्तांकन करणारे संबधित खात्याचे संपर्क अधिकारी किंवा वृत्त शाखेचे अधिकारी, टिव्ही कॅमेरामन, छायाचित्रकार आम्ही पाठवित असतो. वृत्त उपसंचालक यांनी उपस्थित राहण्याची काही गरज नसते. पण मुळात पत्रकार राहिलो असल्याने आणि विशेषत: अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आवड असल्याने मी शक्य असेल तेव्हा, नेहमीच उपस्थित रहात आलो आहे. त्यात कुलगुरु, अर्थतज्ञ प्रा डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा संध्याकाळी, कार्यालयीन वेळेनंतर असल्याने तर काहीच अडचण नव्हती.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील सभागृहात हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्व निमंत्रितांची भोजन व्यवस्था मात्र मरीन ड्राईव्ह जवळील हॉटेल मरीन येथे करण्यात आली होती. त्या प्रमाणे निवडक अतिथी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचलो. थोड्या वेळात डॉ मनमोहन सिंग हे देखील तिथे पोहोचले. बुफे पद्धत असल्यामुळे जेवण घेण्यासाठी रांग होती. डॉ मनमोहन सिंग तिथे पोहोचल्यावर त्यांच्या आदरापोटी काही मंडळी त्यांच्यासाठी जेवणाची प्लेट घेऊन जायला लागली. पण त्या सर्वांना थांबवून ते सर्व सामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहिले. त्यांच्या साधेपणाचा हा एक अनुभव आला. दुसरा अनुभवही लगेच आला. मला वाटलं, ते सरदार आहे, म्हणजे चिकन, मटण, मासे अशा पदार्थांवर ताव मारतील, म्हणून उष्चुकतेपोटी माझे त्यांच्या प्लेट वर लक्ष होते. बघतो तर काय, त्यांनी फक्त ग्रीन सॅलड, एक रोटी, दाल आणि थोडा भात इतकेच प्लेट मध्ये वाढून घेतले. प्लेट ही पूर्ण भरली नव्हती तर अर्धी अधिक रिकामीच होती. त्यानंतर कोपऱ्यातील एकांताची जागा पाहून त्यांनी शांतपणे जेवण केले.
हे सर्व पाहून मी थक्कच झालो. विदेशात शिक्षण घेतलेले, जग प्रसिद्ध विद्यापीठांकडून गौरविल्या गेलेले, केंद्र सरकार मध्ये सरकारचे आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री अशी एकाहून एक सरस, महत्वपूर्ण पदे भूषविलेली ही व्यक्ती अहंकार विरहित, इतकी साधी, इतकी मितभाषी कशी राहू शकते ? याचे मला फार आश्चर्य आणि कौतुक वाटले.
विशेष म्हणजे, पुढे ते सलग दहा वर्षे पंतप्रधान पदी राहिल्यानंतर ही त्यांचे हे सर्व गुण विशेष कायम राहिले. त्यामुळे त्यांनी माझ्या मनात कायमचे घर केले. नाही तर आम्ही अधिकारी, कर्मचारी आपापल्या छोट्या छोट्या पदांनी, अधिकारांनी असे काही वागतो आणि कनिष्टांना, इतरांना असे काही वागवतो की त्याचे वर्णन करायला, एकेक अनुभव सांगायला शब्द कमी पडतील. सार्वजनिक जीवनातीलच व्यक्तींनीच नव्हे तर सर्वांनीच त्यांचे हे सर्व गुण अंगिकरणाची नितांत गरज आहे. त्यामुळे आपले आणि आपल्यामुळे इतरांचे आयुष्य नक्कीच सुखावह होईल.
पुढे डॉ मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत त्यांची प्रसिद्धी कशी करावी, याबाबत आम्हाला कधीही विशेष सूचना (म्हणजे आदेशच !) प्राप्त झाले नाही. अर्थात यथा योग्य व्यवस्था होत असेच. तसेच प्राध्यापक असलेली त्यांची कन्या व्याख्यानांसाठी मुंबईत येऊन गेल्याचे आम्हाला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रे वाचल्यावरच कळत असे. त्यांच्या कार्यालयाकडून कधीही मुलीच्या कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्याबाबत आम्हाला कळविले जात नसे. आपल्या पदाचा जरासाही दुरुपयोग होऊ नये, यासाठी ते नेहमीच दक्ष असत.
अशा या दृष्टया, महान, निर्मोही नेत्याला, अर्थतज्ञाला, महान मानवाला माझे विनम्र अभिवादन.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत माहिती संचालक, नवी मुंबई.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800