नमस्कार मंडळी,
एक खूप आनंदाची बातमी आहे. कवयत्री प्रा सुमती पाटील यांची तिसरी कविता शालेय अभ्यासक्रमात लागली आहे. पहिली कविता दहा वर्षांपूर्वी गुजरात अभ्यासक्रमात, दुसरी २०१६ पासून “सुलभ भारती” इंग्रजी माध्यमात मुले शिकत आहेत. “हे खरे खरे व्हावे”.
आता सीबीएसई अभ्यासक्रमात, इ.६ वी साठी
“मला वाटते” या कवितेची झाली आहे.
सुमती ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन. ही कविता पुढे देत आहे.आपल्याला नक्कीच आवडेल💐
– संपादक
कधी कधी वाटते मला मी
धुलीकण व्हावे
पतितांच्या स्पर्शाने
पावन व्हावे ….
माझ्यातून उमलावा अंकुर
वृक्ष तयाचा व्हावा
कणकण त्याचा जनसेवेस्तव
उपयोगी पडावा…
कधी वाटते व्हावे चांदणे
कधी चंद्र व्हावा
आसमंत तो प्रकाशात मग
सारा उजळून निघावा …
वारा होऊन सुगंध उधळत
दिशा दिशा पसरावे
सुगंधात त्या माझ्या अवघे
जग न्हाऊन निघावे….
सुर होऊनी मुरलीचा मी
संमोहन घालावे
लहरींवरती पाण्याच्या त्या
अवघे जग डुलावे…
पाऊस होऊन शिवारात मी
मनसोक्त असा बरसावा
घरोघरी त्या शेतकऱ्यांच्या
शेतमळा फुलवावा…
सृष्टीचा हा अंश असा मी
सेवेस्तव झिजावा
झिजता झिजता जन्मच माझा
सार्थकीच लागावा…

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
खूप सुंदर कविता ! प्रा.सुमती मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन !