कोरी करकरीत नोट सर्वांनाच आवडते आणि हवीशी वाटते. प्रस्तुत लेखकाला मात्र “मळकी नोट” मोठी वाटते कारण तिने खूप लोकांची खूप वेळा गरज भागविलेली असते !……..
– संपादक
उन्हाळ्याचे चटके चांगलेच जाणवू लागले होते. कोणत्या तरी कामासाठी मी सकाळीच नारायणगावला आलो होतो. काम संपवून उदापूरला जाण्यासाठी स्टॅन्डवर उभा होतो.
शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. लग्नकार्येही जोरात चालू होती. त्यामुळे येणा-या एस्टया भरूनच येत होत्या. आलेल्या एस्टया एकतर स्टॅन्डला थांबत नव्हत्या किंवा थांबल्या तरी उतरणारे पॅसेंजर उतरून झाले की, कंडक्टर बेल द्यायचा आणि एस. टी. पळवायचा.
भूक लागली होती. शिवाय तहानेने घसाही कोरडा पडला होता. अंगात खादीचा नेहरू शर्ट, पायजमा आणि खांद्यावर शबनम अशा वेशात मी स्टॅन्डवर अक्षरश: ताटकळून गेलो होतो. वडीलांनी सांगितलं होतं की, कुठलंही, विशेषत: हाॅटेलातील पाणी पिऊ नकोस. शिवाय तहानेने घसाही कोरडा पडला होता. नाईलाज म्हणून एस.टी.स्टॅन्डच्या कॅन्टीनमधे गेलो. पंखे फुल स्पीडमध्ये सुरू होते. अनेकजण वडा, मिसळ, भजी पाव असं काही खात होते. किचनमध्ये भट्टी जोरात चालू होती. त्यामुळं वातावरण गरम होतं आणि खाद्यपदार्थांचा तेलकट आणि तिखट वास सगळीकडे भरून होता. दोन स्पेशल चहा आणि एक बंद बिस्कीटचा पुडा खायचं त्यातल्या त्यात योग्य वाटलं. पण त्यात तहान भागलीच नाही. मनात विचार केला की, कोणत्याही नाशिक गाडीनं आळेफाटयापर्यंत जायचं. अगदी जागा मिळाली नाहीतरी उभं राहून, गर्दीत धक्के खात जायचं. आणि मग तिथून मिळेल त्या वाहनानं उदापूरपर्यंत जायचं. त्यासाठी नेहरू शर्टाच्या वरच्या खिशात एक नोट काढून ठेवली आणि एस.टी.ची वाट पहात राहिलो.
पुण्याहून नाशिकला जाणारी एक एस.टी.आली. गर्दी एवढी होती की, माणसं अगदी मेंढरासारखी भरली होती. एस. टी.स्टॅन्डवर येताच कंडक्टर आधी खाली उतरला. शिट्टी वाजवत त्याने ती एका कोपर्यात उभी केली. “आधी लोकांना उतरू द्या. कुणीही आत शिरायचा प्रयत्न करू नका” मोठ्या आवाजात त्याने ऑर्डर सोडली. अनेक लोक खाली उतरले.
“चला आता. पण खालीच तिकीट घेऊन आत जा” .
मुसंडी मारत मी पुढे घुसलो. “एक आळेफाटा द्या” असं म्हणून मी खिशातली नोट त्याला दिली.
“अरे, किती मळकी नोट आणलीस”. असं म्हणून त्याने ती माझ्या हातात परत दिली. तोवर इतर पॅसेंजरनी मला मागं ढकललं. मला त्या नोटेचा खूप राग आला.
चरफडत मी परत स्टॅन्डवर गेलो आणि रुमालाने घाम पुसत तिथल्या एका बाकावर बसलो. वारा नव्हताच. समोरच्या बाकावर एक स्थूल बाई बसली होती. उन्हाळा असूनही भरजरी साडी आणि भरपूर दागिन्यांनी ती नखशिखांत मढली होती. शेजारी तिचा गुबगुबीत मुलगा सारखा आईकडं कसलं तरी टुमणं लावत बसला होता. शेवटी न रहावून तिनं आपल्या पर्समधून एक नोट काढून त्याच्या हातात दिली, “जा. त्या बाईकडून केळी आण. इथं दुसरं काही चांगलं नाही मिळणार”. नोट हातात घेऊन तो गुबगुबीत मुलगा स्टॅन्डबाहेर केळी विकणा-या म्हाताऱ्या बाईकडं गेला. केळी घेऊन तो आला. दोघा मायलेकरांनी ती खाल्ली.
केळीवाल्या बाईने ती नोट आपल्या कमरेच्या पिशवीत ठेवून दिली.
बराच वेळ गेल्यावर केळीवाल्या बाईने आपली केळयाची टोपली त्या स्थूल बाईकडे आणली.
“बाई, मी जरा हॉटेलातून नातवंडांना भेळ घेऊन येते. तवर राहू दे का टोपली इथं ?”
“बरं बरं” तिच्या होकाराबरोबरच केळेवाली बाई कॅन्टीनकडं गेली. भेळ घेतली आणि कमरेच्या पिशवीतून एक नोट काढून दिली. भेळेचा पुडा तिनं आपल्या पिशवीत ठेवून दिला.
मी हे पहात होतो. विचार करू लागलो. मगाशी त्या स्थूल (आणि श्रीमंतही) बाईकडच्या पर्समधील नोट नवीन करकरीत असेल. केळी घेऊन ती म्हातारीकडं गेली. तिनं ती कमरेच्या पिशवीत ठेवली. त्यातूनच तिनं आपल्या नातवंडांसाठी भेळ घेतली. तेव्हा ती नोट कॅन्टीनच्या गल्ल्यात गेली. कदाचित त्याच नोटमधून तो चहा पावडर, साखर आणील. अशीच ती नोट फिरत राहील, अनेकांच्या भूका, तहाना भागवत या प्रवासात ती मळून जाईल, जीर्ण होऊन माझ्यासारख्याच्या खिशात येईल. मी खिशातून ती नोट काढली आणि पाहिली. मात्र यावेळी मला तिचा अजिबात राग आला नाही. उलट त्या नोटेच्या तेजाने माझे डोळे दिपले.

– लेखक – प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800