Thursday, February 6, 2025
Homeलेखमस्त झोपा !

मस्त झोपा !

“झोप” हा सर्वांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. दुपारची झोप, रात्रीची झोप, सकाळच्या पहिल्या प्रहराची झोप, थकल्यानंतर येणारी अनावर झोप, प्रवासात लागणारी झोप, पुस्तक वाचताना येणारी झोप, एखादे भाषण ऐकताना अलगद डोळ्यांवर पांघरणारी झोप, काहीही काम नसले की येणारी झोप,असे या झोपेचे विविध प्रकार. मात्र अनेकविध, आणि त्याच्या वेळाही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळ्या.

रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे, हा फार पूर्वीपासून चालत आलेला सुखी आरोग्याचा मंत्र. पण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात मात्र या मंत्राचे फक्त ऐकण्यापुरतेच स्थान राहिले आहे. मनुष्याचे जीवन पार यांत्रिक होऊन गेले आहे आणि त्यामुळे त्याच्या दिवस भरातील कामकाजाच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा यांचे वेळापत्रक पार कोलमडून पडले आहे. मिळेल त्या मोकळ्या वेळात आपापले दिवसभराचे कार्यक्रम कसेतरी पार पाडण्याकडेच सर्वांचा कल दिसून येत आहे.

ऑफिसमधून घरी यायला होणारा उशीर आणि त्यामुळे पुढील सर्व गोष्टींना होणारा विलंब, यामुळे फक्त त्या एकाच व्यक्तीचे नव्हे तर पूर्ण कुटुंबाच्या वेळेचे गणित चुकत आहे. आजकाल आईवडील दोघेही नोकरी करत असतात, त्यामुळे घरी आल्यावर मुलांना देण्यात येणारा वेळही दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे आणि ज्या वयात मुलांना सकस आहाराचे, स्वास्थ्यपूर्ण झोपेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, तिकडे वेळेअभावी दुर्लक्ष होत आहे.

परंतु या सर्व धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण रात्र कधी होते आणि आपण पाठ बिछान्यावर कधी टेकवतो, याची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीची झोप ही मनुष्याच्या थकल्या भागल्या देहाला अती आवश्यक. ही या काळातील झोपच तर दुसऱ्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करते.

पण या झोपेचे तरी किती विविध प्रकार. कुणाला पडल्या पडल्या झोप येते, कोणाला झोपेसाठी कधीकधी उगाचच तळमळत राहावे लागते, तर कोणाला वाचता वाचता झोपायची सवय असते. कुणीतरी मंद आवाजात संगीत ऐकत झोपी जाते. तर काहीजण अशीही असतात की त्यांना आजूबाजूच्या गोंधळाचा, आवाजाचा, प्रकाशाचा काहीएक त्रास न होता ते व्यवस्थित झोपी जातात.

या सर्व प्रकारात कधीकधी असेही होते की रात्रभर शांत झोप न लागल्याने सकाळच्या प्रहरी जो डोळा लागतो, त्या झोपेचा आनंद मात्र अवर्णनीय. अगदी उठू नये वाटेस्तोवर लागणारी झोप म्हणजे पूर्ण शरीरभर पसरत चाललेला प्रसन्नतेचा शिडकावाच जणू. दिवसाच्या वेळात ही कुणाला एखादी झोपेची डुलकी लागण्याचीही सवय असते, पण त्या अगदी पाच दहा मिनिटांच्या झोपेनेही ती व्यक्ती मात्र अगदी ताजीतवानी होऊन जाते. कधी कधी मात्र रात्री झोपताना या झोपेची अगदी आराधना करावी लागते. तर कधी अत्यानंदाने ही झोप आपल्यापासून दूर दूर पळत असते.

परंतु, काहीही असले तरी स्वस्थ आणि शांततापूर्ण झोप ही आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्याची एक प्रमुख भागीदार आहे. आणि त्याशिवाय आपले जीवन अपूर्णतेने आणि अप्रसन्नतेने भरलेले राहील. झोपेचा हा महिमा मात्र अगाध असाच आहे. हा महिमा वाचून, आजपासून तुम्ही मस्तपैकी झोपत चला !

-लेखन : मानसी लाड
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी