अस्पृश्यतेविरुद्धची लढाई बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० पासून सुरु केली होती. महाडला चवदार तळ्याच्या पाण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीला जगात तोड नाही. त्यावेळची सामाजिक विषमता इतकी विकोपाला पोहोचली होती की, जनावरांना पाणी पिण्याचा हक्क होता, परंतु माणसासारख्या माणूस असणाऱ्या माणसाला पाणी पिण्याचा हक्क इथल्या समाज व्यवस्थेने नाकारला होता. अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांनी या समाजव्यवस्थेविरूध्द बंड पुकारले आणि आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही माणसासारखे जगण्याचा अधिकार आहे अशा शब्दात ठणकावून प्रत्यक्षात कृतीत उतरवलेली तीच ही महाडच्या चवदार तळ्याची क्रांती.
भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना बाबासाहेबांना चवदार तळ्यातील पाणी घेण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण निश्चित झाली असणार. त्यांनी मुलभूत अधिकारांच्या यादीत समतेच्या अधिकाराला मुख्य स्थान दिले. भारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा, रुढी, परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेत १७ व्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे.
यात समतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी तरतुदी आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती १९८९ अन्वये जो याचे पालन करणार नाही तो गुन्हेगार ठरतो. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधोरेखीत होतंय. डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला जी मानवमुक्ती संग्रामाची आग लावली होती ती आग अजूनहि विझली नाही. कारण जोपर्यंत ही जातीव्यवस्था आहे तोपर्यंत ही आग अशीच धगधगत राहणार आहे.
त्यामुळे जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी सर्वांनी एकजुटीने एकदिलाने लढायला हवे तरच या छेडलेल्या धर्म संगराचे सार्थक झाल्यासारखे होईल. त्याकाळच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक पडला नाही परंतु आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी बाबासाहेबांच्या संयमाचे दर्शन घडवणारा सत्याग्रहाची संघर्षगाथा डॉ यशवंत चवरे यांनी लिहिलेला ‘महाडचा मुक्तीसंग्राम’ हा ग्रंथ समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे उद्गगार सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी काढले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि विद्यमान राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले कि, न्यायालयीन लढ्याचा संपूर्ण चिकित्सक अभिलेख असलेला ग्रंथ निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी अत्यंत परिश्रमाने शब्दबद्ध केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याच्या हक्कासाठी महाड चवदार तळ्याचा १९२७ ते १९३७ असा प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयापर्यंत हा मानव मुक्तीच्या हक्काचा लढा आंबेडकरांनी त्यांच्या कायदा पांडित्याने जिंकला. एका बाजूला कोर्टाबाहेरची लढाई व दुसरीकडे अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीची वकिली अशी दुतर्फा लढाई करून महाडचा मुक्ती संग्राम जिंकला.
गव्हर्नमेंट ऍक्ट १९३५ येण्यापूर्वी तत्कालीन सरकारने २३ कमिट्या नियुक्त केल्या होत्या. त्यापैकी १७ कमिट्यांवर बाबासाहेबानी काम केले होते. या कमिट्यांनी घेतलेले निर्णय आणि बाबासाहेबांचे कामकाज यावर संशोधन करून यापुढच्या काळात चवरे यांनी ग्रंथरूपाने प्रकाशित करावे असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
तर ज्येष्ठ पत्रकार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य कुमार केतकर आपल्या भाषणात म्हणाले की, मानवमुक्तीच्या चळवळीच्या इतिहासात या ऐतिहासिक सत्याग्रहाला फार महत्व असून या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीच्या बरोबरीने केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने २० मार्च हा दिवस ह्युमन राईट डे मानायला हवा. समतेसाठी अनेक आंदोलनं झाली, भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरुन जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत.
तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो.महाडच्या ऐतिहासिक लढ्याची उद्दिष्टपूर्ती तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा विषमतावादी शक्तींना परिघावर लोटून समतावादी शक्ती सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी येतील. या ग्रंथाचे मोल पाहात डॉ यशवंत चवरे यांनी हा ग्रंथ इंग्रजी भाषेत प्रकाशित करणे गरजेचे आहे.
हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद करताना डॉ चवरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा केलेला मुक्तीसंग्राम हा आधुनिक जगातील मानवाधिकाराचा पहिला लढा त्याचप्रमाणे भारतीय लोकांचा मुक्तीसंग्रामही ठरला. येथूनच भारतीय समाजाला आपल्या हक्कांची जाणीव झाली. माझा पी एच डी चा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर हे संशोधनाचे काम पुढे सुरूच ठेवावे असे आवाहन माझे मार्गदर्शक आर के क्षीरसागर यांनी केले.
बाबासाहेबानी अस्पृश्यांना मुक्ती, स्वाभिमान व.माणूसपण मिळवून देण्यासाठी महाडचा मुक्तीसंग्राम उभारला. अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीची सुरूवात बाबासाहेबांनी महाड येथे केली. १९२७ ते ३७ या कालखंडातील या सत्याग्रहाचे सर्व महत्वाची कागदपत्रे शोधण्यासाठी आणि लेखाजोखा लिहिण्यासाठी मला १५ वर्षे परिश्रम करावे लागली. त्यातली मोडी अक्षरातली कागदपत्रे देवनागरी करण्यासाठी जिवन्त भन्ते यांनी केले.

हे सर्व संकलन करताना बाबासाहेबांनी सत्याग्रहाची तात्त्विक बाजू मांडून या सत्याग्रहाची भूमिका व महत्व सगळ्यांच्या लक्षात आणून दिले. महाड कोर्टातील खटला, अस्पृश्यांनी चवदार तळे बाटवल्याने त्या काळातील अनेक वृत्तपत्रांनी बाबासाहेबांविरोधात उठवलेली टीकेची झोड व बाबासाहेबांनी त्याचा अभ्यासपूर्ण शैलीत घेतलेला समाचार, महाड सत्याग्रहाची व्यूहरचना, बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन का केले ? इत्यादी अनेक गोष्टी नव्याने माझ्या नजरेस आल्या. हा ग्रंथ इंग्रजीसह इतर राज्यातील भाषांमध्ये अनुवादित होत आहे. तर बाळासाहेबांनी आंबेडकर यांनी आवाहन केल्याप्रमाणे १९३५ च्या घटनेसंदर्भात झालेल्या सर्व घटनांचा धांडोळा शोधण्याचे काम यापुढच्या काळात मी सुरु करू तो ग्रंथरूपात आणण्याचे काम मी नक्की करणार आहे असे अभिवचन देतो.
या सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभागी झालेले सत्याग्रही आणि साक्षीदार सुरबानाना टिपणीस, पांडुरंग भा पाल्येशास्त्री, संभाजी गायकवाड, आर बी मोरे यांचे नातू भीमराव आंबेडकर, मिलिंद टिपणीस, आनंद पालये, कॉम्रेड सुबोध मोरे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल यांनी केले. आभार प्रदर्शन निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी के सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ज वि पवार, विजय सुरवाडे, बापू सोनावणे, न्यायाधीश पलसपगार, निवृत्त वरिष्ठ आय पी एस अधिकारी सुधाकर सुराडकर, आंबेडकरी विचारवंत रमेश शिंदे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ, साहित्यिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– लेखन : रवींद्र मालुसरे.
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800