Home बातम्या महाड क्रांती : अभ्यासक्रमात समाविष्ट करा !

महाड क्रांती : अभ्यासक्रमात समाविष्ट करा !

0

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्यावर दलितांसह पाणी प्राशन करण्यासाठी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्या समता संगराचा इतिहास विद्यालय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

उद्यापासून महाड क्रांतीचा शताब्दी महोत्सव राज्यात सुरू होत आहे. त्याचा प्रारंभिक समारंभ मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात नुकताच झाला. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समता अभियान यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या त्या समारंभात ही मागणी करण्यात आली आहे. या मागणीला उपस्थित नामवंतांनी आणि श्रोता समुदायाने टाळ्यांचा जोरदार कडकडाट करत पाठींबा व्यक्त केला.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभात अभिनेते किरण माने, मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुंदर राजदीप, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, समान संधी अभियानचे अध्यक्ष सुनील कदम यांनी मार्गदर्शन केले.

नामवंतांचा सहभाग : –
माजी खासदार हुसेन दलवाई, साहित्यिक अर्जुन डांगळे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, प्रा. अविनाश कोल्हे, पँथर नेते सुरेश केदारे, मधू मोहिते, ॲड. संघराज रूपवते, पत्रकार जयवंत हिरे, मिलिंद सुर्वे, उत्तमराव गायकवाड, दिल्लीचे पत्रकार विरेन झा, सत्यशोधक सुनील सरदार आदी मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

महाड क्रांतीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्यादृष्टीने त्याचे स्वरूप ठरवण्यासाठी नामवंत तज्ज्ञ प्राध्यापकांची एक समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सुनील कदम यांनी यावेळी केली. त्यांनी महाड क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती यांच्यातील साम्य विस्ताराने सांगत चौदार तळ्यावरील लढ्याची ऐतिहासिकता विशद केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाडचे समता संगर आणि त्यानंतर गांधीजींनी केलेला दांडी सत्याग्रह हे जगाच्या इतिहासातील दोन मोठे प्रतिकात्मक आणि सनदशीर लढे गणले जातात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांनी यावेळी केले. अभिनेते किरण माने यांनी आपण महाड क्रांतीचा शताब्दी महोत्सव साजरा करत असतानाच देशात पुन्हा प्रति क्रांती होवू घातली आहे, असे सांगतानाच ती हाणून पाडण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन आपल्या भाषणातून केले.

शैक्षणिक प्रगतीत जेमतेम असलेला इथला चैतन्य भंडारे हा एक दलित तरुण दोन यशस्वी कंपन्या थाटून जपानमध्ये मोठा उद्योजक बनतो, ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती आहे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. ही शताब्दी साजरी होत असतानाच आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही दलितांना पाण्यासाठी कसे लढावे लागते, हे सांगताना त्यांनी काही घटना उदाहरणादाखल सांगितल्या.

हल्लीचे ‘खासगीकरण’ म्हणजे दलितांना पाणी नाकारण्यासाठी महाडचे तळे खासगी असल्याचा दावा करण्यामागील युक्तीचेच अनुकरण आहे, असे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.

समता अभियानतर्फे महाड क्रांतीचा महोत्सव राज्यभरात साजरा करण्यासाठी गजानन शिरसाट, नामदेव साबळे, राजू रोटे, प्रमोद नाईक, संजय कांबळे. ॲड. जालिंदर यादव, सतीश डोंगरे, अशोक कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version