महानुभावांचा स्त्री विषयक दृष्टिकोन
स्त्रियांचे सामाजिक स्थान -:
भारतात काही समाजात मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती. काही काळानंतर पुरुषप्रधान आर्यांचे स्त्रीप्रधान अनार्यांबरोबर अनेक संघर्ष झाले. या संघर्षात आर्यांचा विजय झाला. अनार्य पराभूत झाले तरी त्यांनी आपली मातृसत्ताक पद्धती पूर्णपणे सोडून दिली नाही. म्हणून आर्यांनी अनार्यांसोबत काही तडजोडी करून मातृसत्ताक पद्धतीला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रक्रियेमुळे पुरुषप्रधान संस्कृती अधिकाधिक बळकट होत गेली आणि मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले. पुरुषप्रधान वैदिक समाजाने अनेक अनिष्ट चालीरीतींच्या माध्यमातून समाज जीवनातील स्त्रियांचे महात्म्य, त्यांची प्रतिष्ठा, मानसन्मान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बालविवाह, बहूपत्नित्व, कुमारी जरठ विवाह, विधवांना दिली जाणारी अमानवीय वागणूक आणि विशेष म्हणजे सतीची चाल या सर्व गोष्टी या दृष्टीने लक्षणीय आहेत.
स्त्रियांच्या तुलनेने पुरुष श्रेष्ठ आहे, अशी उच्च नीचतेची निर्मिती करून पुरुषप्रधान व्यवस्था येथील समाजावर बिंबवण्याचा प्रयत्न तत्कालीन आर्यपरंपरेत वाढलेल्या अनेक विचारवंतांनी केला. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. स्त्रियांना पुरुषांकडून निकृष्ट हिणकस व अमानवीय वागणूक मिळू लागली. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये असमानता वाढायला लागली.
उपनयनाच्या बाबतीत स्त्रीची कमालीची उपेक्षा केली जात होती. मनुस्मृती- सारख्या ग्रंथांनी तर स्त्रीच्या दृष्टीने विवाह हेच उपनयन असल्याचे सांगून शिक्षणासाठी असलेले उपनयन स्त्रियांना निश्चित केले. यावरून स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान लक्षात येते. (क्रमशः)
– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800