Home साहित्य ‘महानुभावांचे मराठी योगदान’ ( २ )

‘महानुभावांचे मराठी योगदान’ ( २ )

1

आद्य कवयित्री : महदंबा
तेराव्या शतकातील विवाह पद्धतीची माहितीही धवळ्यांतून मिळते. स्वाभाविकता, गतिमानता, सहजसुंदरता आणि स्त्रीसुलभता हे धवळ्यांचे उठून दिसणारे असे विशेष आहेत.

महदंबेच्या कवित्वाचे विशेष सांगताना वा.ना. देशपांडे म्हणतात, “महदाइसा ही अशी आद्य कवयित्री तसे तिचे धवळे हे या विषयावरील स्वतंत्र काव्या मधले आद्य काव्य होय”. साधेपणा हा तर काव्याचा प्राणच होय. साधे वर्णन, साधी भाषा व साधे विचारविकार असूनही एखादे काव्य हृदयंगम कसे होते. याचा धवळे हा उत्कृष्ट आदर्शच म्हटला पाहिजे.

महदंबेने रचिलेल्या “धवळ्यात” रुक्मिणी हरणाची कथा आली असून मराठीत गायिलेली ती पहिली कृष्णविवाहकथा होय. ती गाणारी महदायिसा ही नागदेवाचार्याची चुलत बहिण असून तिला प्रथम चक्रधरांचे व त्यांच्या पश्चात श्री गोविंदप्रभू आणि नागदेवाचार्य यांचे निकट सान्निध्य बरीच वर्षे लाभले. (ज्ञानेश्वरमंडळात जो मान मुक्ताबाईस होता तोच चक्रधरांच्या मंडळात महदायिसेला होता.) ती मोठी बुद्धिमान, विरक्त आणि स्वामींच्या परमार्गाचे मर्म जाणणारी असावी असे तिच्या आठवणी सांगतात.

स्वामींना ती नेहमी काहीतरी विचारित असायची म्हणूनच “म्हातारी जिज्ञासक: म्हातारी चर्चक: एथ निरंतर काही पुसतचि” असे त्यांनी तिच्याविषयी म्हटले होते. अंगी अधिकार असल्यामुळे ती पंथीयांना मार्गदर्शनही करीत असे, तिचे हे “मार्गावरील उपकार ध्यानात घेऊनच नागदेवाचार्यांनी तिच्याविषयी म्हातारी माझेया धर्मासि रक्षक कीं गा” असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.

लीळाचरित्र” मध्ये महदाई सेचे जे दर्शन घडते, त्यामुळे हे कुतूहल उत्तरोत्तर वाढत जाते, ‘लीळाचरित्र‘ श्रीरिद्धीपुरलीळा किंवा ‘गोविंदप्रभुचरित्र आणि ‘स्मृतिस्थळ’ या तीन्ही महानुभाव ग्रंथातून महदाइसेचे व्यक्तिमत्व रूप घेते. हे व्यक्तिमत्व अत्यंत संस्कारसंपन्न, भावुक आहे. दादोस श्री चक्रधरस्वामी, श्री गोविंदप्रभु, भटोबास, म्हाइंभट आणि लक्ष्मीद्रभट यांचा सहवास लाभल्याने या व्यक्तिमत्वातील छटा अधिक उजळून निघाली आहे.

लीळाचरित्रातील महदाइसेचे मुग्ध आगमन श्री गोविंदप्रभुचरित्रातील तिचे वास्तव्य आणि “स्मृतिस्थळात” तिने घेतलेला निरोप या साऱ्याच गोष्टी आपल्या मनात रुंजी घालीत असतात. अशाप्रकारे शतकानुशतके वेध लावणारे हे व्यक्तिमत्व स्थल-काल आणि पंथोपपंथ यांच्या सीमारेषा ओलांडून साहित्यप्रेमी रसिकांच्या मनात कायमचे वास्तव्य करून राहते.

आपल्याला महदाइसेचे ‘आद्यत्व’ तर जाणवतेच पण त्याहून अधिक प्रकर्षाने जाणवते ते तिचे एकमेकाव्दितीयत्व श्री चक्रधरस्वामींच्या सहवासात आल्यानंतर जणू या जिज्ञासू मनाला परिसस्पर्श लाभतो तिच्या या जिज्ञासेने जसे तिचे समाधान झाले आहे. तसेच स्वामींचेही झाले आहे. महदाइसेने स्वामींना विचारलेले प्रश्न हे एका अर्थाने मराठीतील
‘प्रश्नोपनिषद’ आहे. प्रश्नोपनिषदातील विविध प्रश्नांमुळे मराठी साहित्य समृद्ध झालेले आहे.

महदाइसेने स्वामींना विचारलेल्या विविध प्रश्नांमुळे स्वामींनी ‘एकांकातील आपल्या लीळा सांगितल्या आहेत. एरवी एकांका ची रूपसिद्धी ही एका अर्थाने अशक्यप्राय गोष्ट होती. केवळ पूर्वजीवनाविषयीचे प्रश्न विचारूनच ही म्हातारी थांबत नाही तर ती पंथीय तत्वमीमांसे वर प्रकाश टाकणारे प्रश्नही स्वामींना विचारते आणि त्या प्रश्नांमुळे पंथीय तत्वज्ञान व आचारधर्म यांच्या कितीतरी कडा प्रकाशमान होतात, उजळून निघतात. (उर्वरित लेख पुढल्या सत्रात)

प्रा डॉ विजया राऊत

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. खुप छान महदाइसा यांच्या विषयी माहिती मिळाली
    धन्यवाद। 🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version