स्त्री प्रतिष्ठा
समाजात निर्माण झालेल्या अनिष्ट प्रथांचा विरोध करून, समाज चौकटीला दुरुस्त करीत स्वामींनी स्त्रियांना मोक्षाधिकार, ज्ञानाधिकार दिला. तो स्वामींनी केलेला स्त्री-पुरुष समानतेचा भारत वर्षातील पहिला प्रयत्न होता. एका आत्मप्रतिष्ठेच्या तेजाने तत्कालीन स्त्री वर्गाला उजळून टाकण्याचे काम श्री चक्रधर स्वामींनी केले. आज व्यक्तिस्वातंत्र्याच्या व समानतेच्या युगातही जे स्थान स्त्रीला सुशिक्षित असूनही, संविधानाचा आधार असूनही मिळू शकत नाही.
शासनाला आजही स्त्रियांसाठी कायद्याची निर्मिती करावी लागते. आजही तिला तिच्या अधिकारासाठी सातत्याने प्रयास करावा लागतो. तेच अधिकार स्वामींनी १२-१३ व्या शतकात, स्त्रियांच्या योग्यतेनुसार तिची मनोभूमिका समजून, तिच्या आत्मसन्मानसाठी आणि आत्मविकासासाठी दिल्याचे दिसून येते.
तत्कालीन परिस्थितीमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था व त्यातून निर्माण झालेली विषमता व जातीभेद मोठ्या प्रमाणात होता. वैदिक संस्कृतीचा व संस्कृत भाषेचा पगडा पडलेला होता. अशा वातावरणात स्त्रीला धर्माचा, ज्ञानाचा, चर्चेचा ,मोक्षाचा, संन्यासाचा अधिकार देणे ही गोष्ट अतिशय अभिनव म्हणता येईल, स्वामींनी स्त्रियांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना योग्य ती संधी प्राप्त करून दिली.
त्यांच्यात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याची ताकद निर्माण केली. त्यामुळे एकदा दामोदर पंडिताच्या पत्नीने पंडितांना सडेतोड प्रश्न केला की, मी प्रपंचाचा त्याग केला परंतु तुम्ही तिथेच आहात. त्या प्रसंगी ती म्हणते. “आतापर्यंत ज्या चुलीवर शिजलेली खीर खाल्ली तिथे तुम्हाला त्या चुलीतील राख खायची आहे का ? यावरून त्यावेळी स्वामींच्या प्रेरणेने स्त्रीचे आत्मबल वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. अशी अनेक उदाहरणे लीळाचरित्रात विखुरलेली आहेत.
विरह व्याकुळ अवस्थेत भानखेडीच्या जंगलात मूर्च्छितअवस्थेत असतांना श्रीनागदेवाचार्यांना महदाईसाने आपल्या पाठीवर उचलून रिद्धपूरला नेले. यावरून स्वामींनी स्त्रियांना धैर्यशाली, निर्भय बनवून स्त्री ही पुरुषांपेक्षा कमी नाही हे समाजाला दाखवून दिले. अनाथांचा नाथ, दीनदुबळांचे बलस्थान, निराश्रीतांचे आश्रयस्थान होऊन स्वामींनी स्त्रीला आत्मनिर्भर बनविण्याकरिता त्यांच्यातील दोष नष्ट केले. पुरुषप्रधान समाजाला स्त्रीच्या स्वत्वाची जाणीव करून दिली. स्त्री हक्काकरिता लढण्याची प्रेरणा दिली. अबोल अशा स्त्रीला स्वामींनी बोलके केले. मनतेने त्यांच्या पाठीवरून हात फिरविला. दुःखी, कष्टी, निराधार स्त्रियांचे माहेर होऊन त्यांचे दुःख दूर केले. एकंदरीत स्त्रियांच्या सबलीकरणाचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामींनी केले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800