स्त्री प्रतिष्ठा
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एखाद्या आईप्रमाणे निराधार स्त्रियांची काळजी घेतात, व आपल्या शिष्य परिवारातील सर्वांना तशा सूचनाही देतात. नागदेवाचार्यांच्या पत्नी, गंगाई- साचे माहेरपण स्वामींनी केले. एका निराधार गर्भवती स्त्रीला नवव्या महिन्यापासून पूर्ण विश्रांती देऊन तिचे मातृवत प्रेमाने बाळंतपण करविले. नाथोबा आणि बाईसा बाळंतिणीची सुश्रुषा करीत. दर दिवशी प्रेमाने स्वामी तिची विचारपूस करीत, यावरून स्वामी मानवतेचे मूर्तिमंत प्रतिक आहेत, असे म्हणता येईल.
स्त्रियांना ममतेने कोणी जेवायला वाढत नाही पण स्वामींनी स्वतःच्या हाताने महादाईसेला तूप वाढले. साधेला स्वतः वाढले. दही -भात वाढला, विडा दिला. स्वामींच्या भेटीला येणाऱ्या देवगावच्या स्त्रीचे पुरात बुडताना रक्षण केले. बाईसाच्या पायात काटा मोडला असता पित्याच्या अधिकाराने तिच्या पायातील काटा स्वतः काढला. मार्कंडवाडीच्या एका स्त्रीला विहिरीवर पाणी भरण्यास आली असता सातवेळा घागर उचलून देण्यास स्वामींनी मदत केली. सावरखेडा येथील तीवाडी ब्राह्मणांच्या पत्नीस पाटी उचलण्यास मदत केली. स्त्रियांना आदराची, स्नेहपूर्व व मातृत्वतुल्य वागणूक दिली स्वामींनी सर्वसामान्य होऊन जनसामान्यांचे दुःख दूर केल्याचे अनेक लीळावरून दिसून येते. यातूनच महानुभावांचे तत्त्वज्ञान निर्माण होऊन ती एक जीवनपद्धती ठरली आहे.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींनी हा पंथ सर्व मानव प्राण्यांसाठी खुला केला. स्त्री -पुरुष, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य, श्रीमंत -गरीब असा कोणताच भेद त्यांना मान्य नव्हता. माणूस ही (जीवाची) एकच जात आणि माणुसकी (जीवाचे स्वातंत्र्य) हा एकच धर्म त्यांच्या तत्त्वज्ञानातून दिसून येतो. पवित्र अपवित्रतेचे प्रस्थ स्वामींनी कधी माजविले नाही. वृद्धी -सुतक यावर त्यांचा विश्वास नव्हता. सुतक असणाऱ्या दादोसाच्या हातचा दूध-भात त्यांनी खाल्ला.
स्त्रियांना मोकळेपणाने ज्ञान आत्मसात करता यावे याकरिता त्यांच्यातील संकोचवृत्ती नष्ट व्हावी असे स्वामींना वाटत होते. म्हणूनच त्यांनी ‘बाई, गुरु, देवाकडे पाठ करून बसू नये. त्यांच्या आमोरा-समोर बसावे यावरून स्वामींनी स्त्रियांना संकोचवृत्तीचा त्याग केल्याशिवाय विकासाची वाट मोकळी होत नाही असे सूचित केले. गृहिणी असणाऱ्या स्त्रियांनाही स्वामींनी उपदेश करून त्यांना निर्भीड, धीट बनवून स्त्रीला पाच गुरु असल्याचे सांगितले, स्त्रीत्वाचे रक्षण होऊन स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन शुद्ध राहावा अशी काळजी स्वामींनी घेतली. यावरून स्त्रियांच्या धार्मिक प्रगती बरोबरच ऐहिक प्रगतीचाही स्वामींनी विचार केल्याचे दिसून येते.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
एक माहिती म्हणून सांगतो.
माझे गाव पिंपळगाव माळवी. अहमदनगर जवळ आहे.
गावाजवळ मोठा तलाव आहे. खूप जुना.
कोणत्या तरी ग्रंथ मध्ये स्वामींनी त्या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. त्यांनी तिथे मंदिर बांधलं होत. महानुभाव चे मंडळी खूप वेळा तेथे शोध घेत होती पण हाती काही लागले नाही.
एकदा तलावात माती काढत असताना jcb वर ड्राइवर च्या लक्षात आले की काही वस्तू आहेत.
मग सर्व सूत्र हलली. शासन लोक आले, महानुभाव पंथ चे पण आले. त्यांच्याकडे सर्व पुरावे होते.
आज तलावात खूप आकर्षक मंदिर उभारले आहे.
एक पर्यटन स्थळ पण झाले आहे.
🌹सुंदर लेखन, चक्रधर स्वामींनी दिलेली शिकवण आपण छान प्रकारे मांडली आहे 🌹
🌹धन्यवाद 🌹