स्त्रियांची उन्नती
स्वामींच्या सानिध्यातील स्त्री सर्वसामान्य इतर स्त्रियांपेक्षा स्वावलंबी, बुद्धिमान, चिकित्सक, आध्यात्मिक असल्याचे दिसून येते. त्या स्त्रियांमध्ये शालीनता, नम्रता, विद्वत्ता, जिज्ञासा, विनयशिलता, निर्भयता इत्यादी गुण दिसून येतात. त्यामुळे त्या जीवनात यशस्वी होऊ शकल्या.
कुमरे रेमाईसासारख्या एका जिज्ञासक स्त्रीने ग्रामस्थांना वादविवादात हरविण्याचे काम केले. आपली कन्या मृत झाली असता तिचा मृतदेह झाकून अभ्यागताला भोजन वाढणाऱ्या स्त्री चे म्हणजे हिराईसाचे पंथात दर्शन होते. स्त्रियांच्या संसारात खूप जीव असतो पण हिराईसाने पतीच्या आधी संन्यास घेऊन विरक्त स्त्री चे दर्शन घडविले.
लखुबाईसा बाबुळगावकर सारख्या स्त्री ने स्वतः आपल्या पतीकरिता दुसरी पत्नी शोधून आपण संन्यासी झाली. अशा विरक्त अवस्थेत फिरत असतांना तिला तिचा पती ओळखत नाही व तिला तपस्विनी म्हणून दंडवत घालतो. या ठिकाणी आपल्याला पुरुषप्रधान व्यवस्था स्त्री- त्वासमोर नतमस्तक होतांना दिसून येते.
स्त्रियांमधील निर्णय क्षमता आणि वैराग्याच्या बळावर लखुबाईसाने प्राप्त केलेली विशालता महानुभाव संप्रदायात पाहता येईल. एकंदरीत स्वामींनी पुरुषी अहंगंडाला छेद देण्यासाठी स्त्रियांना जागृत करून स्त्री- पुरुष विषमता मिटविण्याचा प्रयत्न केला.
यादव काळात स्त्रियांवर कितीतरी बंधने निर्माण झालेली असतांना महानुभाव पंथातील कमळाईसाने आपले गुरु जाणोपाध्याय यांचा अंतविधी पार पाडला . आज २०-२१ व्या शतकात स्त्रियांच्या माध्यमातून अंत्यविधी पार पाडल्याचे दिसून येते.
परंतु तेराव्या शतकात कमळाईसाने आपल्या गुरुचा अंत्यविधी पार पाडणे ही स्त्रियांच्या प्रगतीच्या संबंधाने महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल. बाराव्या शतकात अंत्यविधी करणारी ही प्रथम महिला म्हणता येईल, गुरूच्या निधनानंतर कमळाईसाने स्वतंत्र मठाशी स्थापना करून बऱ्याच स्त्री-पुरुषांना संन्यास दीक्षा दिली. १९ -२० व्या शतकात स्त्रियांच्या माध्यमातून ज्ञानदान व प्रचार प्रसाराचे कार्य केले परंतु तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वतंत्र मठाच्या निर्मितीतून ज्ञानदान करणारी व पंथाच्या प्रचार- प्रसाराला हातभार लावणारी ती पहिली स्त्री असल्याचे दिसून येते.
प्रचंड शिळा ढकलून सांडोव्याचे काम पूर्ण करणाऱ्या राणाईसाने दाखवून दिले की, स्त्रिया या पुरुषाच्या बरोबरीने कार्य करू शकतात. बाराव्या शतकात स्वामींनी स्त्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना देऊन त्यांच्यात जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण केली. स्वातंत्र्याचा संदेश दिला. त्या उपदेशाला पुरेपूर आचरणात आणून स्त्रीया स्वतंत्रपणे विचार करू लागल्या. मठांची निर्मिती करून आचारविचारपर तत्वज्ञान सांगू लागल्या. यावरून स्वामींनी सांगितलेल्या समताधिष्ठित महिला सबलीकरणाच्या विचारांची महती मान्य करावी लागते.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800