स्त्रियांची उन्नती
दाईबा जेव्हा आउसाचा तिरस्कार करतात तेव्हा स्त्रीची महती सांगतांना प्रश्नोत्तर पद्धतीने निरूपण करतात. “भोजेया ही गंगा धरतीवर कोणी आणली ? कोणत्या ठिकाणावरून आणली ? काहो, आज जे पाणी आहे ते तेच आहे का ?” तेव्हा तो म्हणाला, “नाही ते कसे राहील ? ते निघून गेले” मग म्हणाले “त्याच मार्गाने हे आलेले पाणी आजही जर लोकांच्या पापाचे क्षाळण करीत असेल तर थोड्याही संबंधा पुरती आऊ नव्हे ? हीचा तुम्ही विटाळ मानता ? का हो जीव काही जोगी ? की महार ? की ब्राह्मण ? जीव हा शुद्ध, नित्य व केवळ आहे आणि हा विकल्प प्रेतदेह होण्याला कारण ठरतो.” श्री चक्रधर स्वामींच्या या उद्गगारात स्त्री- पुरुष समतेची जाणीव तीव्रतेने प्रकटली आहे. स्त्री -पुरुष विषमता व जातीयता मिटविण्याचा संबंधाने स्वामींनी केलेला युक्तिवाद निश्चितच निरुत्तर करणारा आहे.
असेच विदारक चित्र वसमत येथील माईबाई यांच्या असाहाय्य, दु:स्थितीचे वर्णन करतांना लीळाचरित्रात चित्रित केलेले आहे. माईबाईला वैधव्य प्राप्त झाले होते. तरुण मुलाचा मृत्यू झाला असून द्रव्य संपत्ती डाकूंनी लुटून नेली. वडील मुलगी एकाइसे तीही विधवा झाली. धाकटी मुलगी जसमाईसे हिच्या सासरी वागवत नव्हते. उपजीविकेचे साधन नाही. तशामध्ये दोन तरुण मुलींना सांभाळण्याचा भार असह्य झाल्यामुळे द्वारकेला जाऊन दोन मुलीसह समुद्रामध्ये आत्महत्या करावी, या उद्देशाने माईबाई आपल्या दोन मुलींना घेऊन पैठण मार्गे द्वारकेला जाण्यास निघाली. पैठणला सारंग पंडिताची भेट झाली. इतिवार्ता ऐकून सारंग पंडित म्हणतात ; तुम्ही द्वारकेला जात आहात तर जाताना वेरूळला स्वामींचे दर्शन घेऊन जा त्याप्रमाणे माईबाई स्वामींच्या दर्शनासाठी वेरूळला जातात. स्वामींच्या कृपाप्रसादाने जस्माई साचे भांडण दूर होऊन सासरी तिचा आनंदाने स्वीकार केला जातो .संसारिक तापाने जगदंब माई बाईचे अंत:करण स्वामींच्या कृपादृष्टीने शांत झाले.
काळू गावच्या माळीनीला जीवारोग झाल्यामुळे तिला एकविरेच्या देवळात आणून टाकले होते.
जीव तोंडा बाहेर येऊन तिला मुंग्या, मुंगळे लागून मरणप्राय वेदना होत होत्या. तिचे ते दुःख साधा स्वामींना सांगते. दयाघन स्वामींनी आपल्या तांबोळाच्या प्रसादाने तिला दुःखमुक्त केलेले होते .
क्रमश:

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800