स्त्रियांची उन्नती
समाजाच्या दडपणाखाली वावरणाऱ्या स्त्रियांना कुठला देव आणि कुठला धर्म, कुठले प्रवचन आणि कुठले निरूपण? काय कळणार या स्त्रियांना स्वतःचा आत्मोध्दार कसा करावा ते ? अशा त्या साध्या सरळ मनाच्या व बालपणीच वैधव्य प्राप्त झालेल्या साधेला स्वामी म्हणतात, साधे हो एथ काही मागा.’ तेव्हा अजाणतेपणे तिने स्वामींना पुनः संबंध मागितला. स्वामी म्हणतात, अजाणतेपणाने तुम्ही हे मागितले तर जाणतेपणी काय मागितले असते. ‘खरोखरच, याच साध्या व सरळ स्त्रीने मोठ्या हिंमतीने व धैर्याने जेव्हा मुसलमान आक्रमणाची महाराष्ट्रात धाड आली तेव्हा परळी वैजनाथाच्या मंदिरात ती काही भक्त स्त्रियांना घेऊन थांबली. त्यांचे संरक्षण केले. यवनाच्या धाडीस तिने रोखून धरून कणखर भाषेत सांगितले आत कोणी नाही. दारात दंड हातात घेऊन खंबीरपणे उभे राहून धर्मरक्षणाचे कार्य केले. हा इतिहास स्वामींच्या प्रेरणेने साध्या सरळ मनाच्या एका साधेने घडविला, हे विसरून चालणार नाही.
स्वामींना स्त्रियांच्या ठिकाणी असलेल्या उपजत ज्ञानाविषयी आदर होता. ज्या काळात स्त्रियांना जगण्याशिवाय इतर कोणतेही अधिकार मिळणे शक्य नव्हते, समाजाच्या आणि परिस्थितीच्या मगरमिठीतून त्यांची सुटका होणे अशक्य होते, अशा काळात सर्वज्ञांनी नागदेव आचार्यांसारख्या पंडितांच्या बरोबरीने महदाईसे सारख्या स्त्रीला स्वामींनी उपदेश केला. स्वामींनी दाखवून दिले की, स्त्रियांची आकलनशक्ती ही पुरुषांपेक्षा रतीभरही कमी नाही.
यादवकाळात वयाच्या बालपणीच म्हणजे आठव्या, नवव्या वर्षी मुलींची लग्न होत आणि तेही त्यांच्यापेक्षा तिप्पट वय जास्त असणाऱ्या पुरुषांसोबत. त्यामुळे त्यांना लवकरच वैधव्यही प्राप्त होत असे. तशीच महदाइसा ही स्वामींच्या परिवारातील जिज्ञासक व चर्चक अशी स्त्री होती. त्यामुळेच स्वामींनी तिच्याविषयी “म्हातारी जिज्ञासू, म्हातारी चर्चक, म्हातारी येथ काही पुसतची असे.” गौरवपूर्ण शब्दात उद्गार काढलेले आहेत.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800