स्त्रियांची उन्नती
श्री चक्रधर स्वामींनी परंपरेच्या विरोधात जाऊन स्त्रियांना सामाजिक मान, सन्मान, प्रतिष्ठा, दर्जा मिळवून दिला. धर्माचा, मोक्षाचा व संन्यासाचा अधिकार दिला. स्वामींनी मातृत्वाच्या कल्पनेतून संपूर्ण स्त्रीत्वाची व्याप्ती उलघडून दाखविण्याचा प्रयत्न केला. स्त्रीच्या विविध रूपातील वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे दृष्टांत देऊन स्त्रीचे महत्व पटवून सांगितले. स्त्रियांना सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने ज्ञानग्रहणाचा अधिकार प्रदान केला. विटाळादी निरर्थक व अवैज्ञानिक कल्पनेबाबत पारंपारिक, रुढीवाद्यांना प्रश्न विचारून त्या कल्पनांना मूठ माती दिली.
वेश्यांना कनिष्ठ प्रतीचे मानले जात होते. स्वामींनी या स्त्रियांच्या वस्तीत जाऊन त्यांना अनुग्रह दिला. जगण्यासाठी स्त्रियांना देहविक्रीय करावा लागतो, याबद्दल खंत व्यक्त केली . आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्त्रियांनी निर्भीड व धीट बनावे अशी शिकवण स्वामींनी दिली. स्त्रियांनी आत्मविकासात्मक पवित्रा घेऊन संकोच वृत्तीचा त्याग करावा हे महत्त्वाचे तत्व सांगितले. स्वामींनी स्त्रियांना माणूसपणाची वागणूक दिली. स्त्रीला माणूस म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. स्त्री मनातले लिंग भेदा संबंधित जुने संस्कार सोडून नवीन स्त्री घडविण्याचा स्वामींनी प्रयत्न केला. यावरून स्वामींची स्त्री विषयक भूमिका स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणारी असल्याचेच दिसून येते.
स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीचा उदो उदो आज सर्वत्र होत आहे. परंतु स्वामींनी ही त्रिसूत्री बाराव्या शतकात म्हणजे आठशे वर्षांपूर्वी समाजासमोर मांडली हे त्यांचे द्रष्टेपण वाखाणण्यासारखे आहे.
स्त्री -पुरुष, शूद्र – ब्राह्मण अशा सर्वांना जीवन जगण्याच्या संदर्भात समान अधिकार देणाऱ्या क्रांतीचे आद्य जनक म्हणून श्री चक्रधर स्वामींना म्हणता येईल. स्वामींच्या काळात आणि आजच्या काळात दोन टोकाचे अंतर असतानाही त्यांच्या कृतीची, शिकवणुकीची गरज आजही मान्य करावी लागेल.
एकंदरीत समतेच्या लढ्यातील पहिली धडक श्री चक्रधर स्वामींनी मारली. समाजास स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, धर्मनिरपेक्षता, प्रेम, शांती निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सुरुवातीला मनुष्य व्हावे अशी निकोप मानवता धर्माचे संवर्धन करणारी दृष्टी स्वामींनी समाजाला दिली.
पुरोगामी महाराष्ट्राने स्त्री विकासाचा आणि समाज क्रांतीचा मूळ स्त्रोत म्हणून श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव संप्रदायाकडे पाहण्यास काहीही हरकत नाही.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800