प्रसादसेवा
‘प्रसादसेवा’ हे महानुभाव वाङ्मयातील एक स्वतंत्र स्फुट प्रकरण आहे. सर्वज्ञांनी असन्निधान स्थित साधकांच्या साधन चरितत्त्वासाठी विहीत केलेल्या चतुर्विध साधनातील द्वितीय स्तंभ म्हणजे ‘प्रसाद’. या प्रसादाचे महत्त्व श्री चक्रधर स्वामींनी श्रीमुखी भक्तजनांना कथन केले.
तेराव्या शतकापासून ते आजपर्यंतच्या सुमारे ८०० वर्षात विविध कालखंडात १६ गद्य आणि १० पद्य अशा एकूण भिन्नभिन्न २६ प्रसादसेवा तयार झालेल्या आहेत. ‘प्रसाद’ या एकाच विषयावर विविध अंगांनी चिंतन करून त्यातील नवनवीन सुक्ष्म खुलासे संदर्भ यातून उलगडले गेलेले आहेत.
चतुर्विध साधन –
सूत्रपाठातील पाठाच्या प्रसाद सेवेत ‘जीव उद्धरावेया तो एक समर्थ: कां तयाचे साधन समर्थ: तयाच्या साधनाचे च्यारी:पक्ष स्थान :प्रसाद : वासनिक: भिक्षू: हे अति गहण:’ असा संदर्भ आढळतो.
या प्रसाद सेवेची रचना आचार्य केशिराजव्यासांची असावी. कर्त्याबाबत जरी संदिग्धता असली तरी या प्रसाद सेवेचा आधार घेत पुढील कालखंडात अनेक प्रसाद सेवा तयार झाल्या. या प्रसादसेवेत चतुर्विध साधनातील अनुक्रमे दुसरे साधन म्हणून ‘प्रसादाचा’ उल्लेख केलेला आढळतो.
या विहित चतुर्विध साधनातील ‘स्थान आणि प्रसाद’ ही दोन जड साधने आहेत तर ‘वासनिक आणि भिक्षू’ ही दोन चेतन साधने आहेत. यात मुख्यतः जड साधनांना वंदन करता येते तर चेतन साधनांना वंदन, भजन, पूजनही करता येते. या अर्थाने जडापेक्षा चेतन जरी थोर असले तरी त्यातही जड साधनाच्या ठिकाणी ईश्वर संबंधाने पवित्रता आलेली असते. स्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती प्रधान तर कृपाशक्ती अनुषंगिक असते आणि प्रसादाच्या ठिकाणी कृपाशक्ती प्रधान आणि माया शक्ती अनुषंगिक असते. अशा प्रकारे ही सर्व साधने आपापल्या परीने परिपूर्ण असून त्यांच्या ज्ञानोक्त विधीविधानाने साधकाला अधिकार आणि योग्यता प्राप्त होत असते.
परमेश्वराच्या ठिकाणी सर्वसंग परित्याग करून जो अनुसरतो त्याला ‘भिक्षुक’ असे म्हणतात. तर संन्यास धारणे आधी प्रपंचात राहून अनुसरण्याची ज्याला तळमळ असते त्याला ‘वासनिक’ असे म्हणतात. या दोन्ही चेतन साधनाच्या ठिकाणी भजन पूजनादी क्रियेने धर्मरूप अधिकार वृध्दिंगत होत असतो.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800