प्रसाद महात्म्य
चतुर्विध साधनातील एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे प्रसाद होय. कारण या साधनाचे यथार्थ महत्व स्वतःच्या उक्ती आणि कृतीतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
रिद्धपुरी श्रीप्रभूंचे वस्त्र जेव्हा बाईचा झटकत होत्या तेंव्हा स्वामींनी त्या क्रियेला नकार देताना “बाई हे रज केसणे पवित्र: जे ब्रम्हादिकां दुर्लभ:” असे म्हटले आहे. जर हे रज देवादिकांनाही दुर्लभ असेल तर त्याचे महत्त्व किती अनन्यसाधारण असेल याची कल्पनाच केलेली बरी. प्रतिदिनीच्या अनुचित आचाराने ईश्वर आपल्यावर उदास होतात. ते औदासिन्यही प्रसादसेवेने परीहरते. ईश्वराची भंगलेली प्रवृत्ती प्रसादसेवेने पूर्ववत होते. असं आहे प्रसादसेवेचे महत्व.
कारण डोमेग्रामी प्रसन्नमठी सर्वज्ञ जेव्हा उदास होतात तेव्हा आचार्य श्रीनागदेवांनी कुशलतापूर्वक श्री प्रभूंच्या प्रसादाच्या दुटीचे दर्शन करवले. तेव्हा उदास झालेला दयाघनही संतुष्टतेने प्रसन्न झाला. एवढे महत्व प्रसादवस्त्राचे पर्यायाने प्रसादसेवेचे आहे. प्रसाद सेवेने ईश्वरीचे सकळ अवयव प्रसन्न होतात आणि खंतीचा परिहारही होतो.
नित्यविधी आणि निमित्तविधी अशा उभयविधीत साधकांसाठी ‘प्रसादसेवा’ ही अनिवार्य असलेली धर्मसाधना आहे. अनुसरलेला साधक असो वा गृहस्थसाधक असो दोघांसाठीही आचरणीय असलेली ही साधना. विशेष लक्षणीय बाब म्हणजे नित्यविधीतील विदेशी असलेल्या साधकाच्या प्रत्येक विधी पालटी प्रसादसेवा विहित केलेली आहे.
अटना़हून आलात करा प्रसाद सेवा. विजनी बैसला करा प्रसाद सेवा. भिक्षाविधीहून आलात आठवा प्रसादसेवा. म्हणजेच दोन विधीमध्ये केलेली प्रसादसेवा ही दोन विधींना जोडणारा दुवाच आहे.
यावरून “प्रसादसेवेचे” मोल किती अनन्यसाधारण आहे हे आपल्या सहज लक्षात येईल.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800