प्रसाद सेवा
डोमेग्रामी दुटीच्या प्रसंगी आचार्य श्री नागदेवांनी प्रसादाच्या लाभाविषयी जिज्ञासा केल्यानंतर सर्वज्ञांनी प्रसाद सेवेचे मुख्य सहा लाभ सांगितलेले आहे. आचार्य श्री परसरामव्यासांच्या सहा वचनांच्या प्रसादसेवेत याच सहा लाभांचे वर्णन केलेले आहे.
साधकाने प्रतिदिनी तिन्हीही त्रिकाळ ज्ञानोक्त लीळा स्मरण युक्त तसेच प्रसादसेवा केल्याने ‘इष्ट प्राप्ती’ तर होते शिवाय प्रतिदिनीच्या ‘अनिष्टाची धुणेही’ होते. म्हणजेच कर्मनाश आणि योग्यता अशा प्रकारे दोन्ही मार्गाने प्रसादसेवेचा मूळ लाभ प्राप्त होतो .
सर्वज्ञांनी जीवाच्या कणवेस्तव ‘संबंधु वंद्य’ अशी श्रीमुखोक्त आज्ञा केलेली आहे. म्हणून प्रसादवंदनाने ‘आज्ञापालनाचा तोष’ ईश्वराला होतो. प्रसादसेवेमुळे जीवनाला सत्वगुण उपजतो आणि ईश्वराच्या ठिकाणी अत्यंतीक आर्तभाव निर्माण होतो. आर्ती चाडेस्तव ईश्वराला प्रसन्नता निर्माण होते, आणि दातृत्वातील अडथळे बाजूला सारून ईश्वराला दान देण्याविषयी आल्हाद निर्माण होतो. जीव हा सर्व दोषाचे आळे असूनही अविधीमुळे दुरावलेला ईश्वर अनंत द्वारे दुर्लक्षित करून जीवाला आनंददायी करण्यासाठी ‘प्रसाद सेवेने’ प्रवृत्त होतात. अशा प्रकारे ‘तुटलेला धर्म पुन्हा साधण्याकरिता प्रसादसेवा कारण आहे.
प्रसादसेवेमुळे एक विधी करता दुसऱ्या बलवत्तर विधीची स्फुरदरुपता होते. एक विधी करतांना दुसराही विधी प्राप्त होतो आणि क्रिया पूर्णत्व घडून विधी होतो. एखाद्या क्रियेमुळे अडलेल्या साधकाची मनोरथ सिद्धी होऊन गोमटेयाची इच्छाही पूर्ण होते.
प्रतिदिनी जो प्रसादसेवेचे अनुष्ठान करतो तो धर्माचरण करावयाला दक्ष होतो. विपरीत आणि विकल्प या महत्त्वाच्या दोषांना तो साधक केव्हाही आवडत नाही. उलट प्रसादसेवेने निर्वेद, अनुताप, अनुशोच, आणि अर्थ असे ओलेनी गुणे चतुर्विध दुःख करण्यावर त्याचा भर होतो. त्यामुळे ‘स्वतःचे दोष आणि पुढिलाचे गुण’ सहज दिसू लागतात. देवाची, मार्गाची, साधनवंतांची प्रीती संचारते.
अशा प्रकारे सर्वांना सर्वकाळी आचारावयाचा महंत विधी म्हणजे ‘महंत दोषाते नासौनि महंता गुणाने दे ‘ती अशी ही “प्रसादसेवा “आहे.

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800