स्त्री-पुरुष समानतेची शिकवण
श्री चक्रधर स्वामींच्या परिवारात सर्वसंगपरित्याग केलेल्या स्त्रियांमध्ये बाईसाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. स्वामींच्या अंतःकरणात तिने मानाचे स्थान पटकाविले होते. ती परमेश्वर योग्यतेची तपस्विनी होती.
एकदा लखुबाईसा बाईसाचे पाय घासून सेवा करीत होती. त्यावेळी स्वामी म्हणतात, “बाई ते काही तेथे केले ? नाही ते येथे केले. तुमचे पाय धुतल्यामुळे त्यांना किती लाभ झाला”. यावरून बाईसाची आध्यात्मिक योग्यता सहज लक्षात येते. काही लोक बाईसाला ‘कुंती’ म्हणूनही संबोधत असत. बाईसाची योग्यता एका दृष्टीने नागदेवचार्यापेक्षाही अधिक म्हणता येईल. कारण नागदेवाचार्य ज्ञानी होते तर बाईसा भक्त होती.
बाईसाने आध्यात्मिक प्रगती साधली व त्याचबरोबर शिस्तीने मठ व्यवस्थापनाचे कार्य करून पंथाची सेवा केली. बाईसेला पंथात आदर होता, कारण ती स्वामींची प्रिय शिष्या होती. बाईसा व्यवहार दक्ष व जिज्ञासू वृत्तीची स्त्री होती. स्वामींचे संन्निधान तिला मृत्यूपर्यंत लाभले. शेवटी स्वामींच्या मृत्यूंची खोटी वार्ता ऐकून तिने प्राण त्याग केला. बाईसांनी प्राण त्याग केल्याची वार्ता ऐकून स्वामींना फार दुःख झाले “बाई अशी घाई का केली, थोडावेळ वाट पाहायला पाहिजे होती ?” असे स्वामींनी उद्गार काढले होते. पण खरा भक्त परमेश्वराशिवाय क्षणभर जिवंत राहू शकत नाही.
शेवटपर्यंत स्वामींची एकनिष्ठपणे सेवा करून अव्यभिचारी भक्तीचे अप्रतिम उदाहरण घालून देणारी बाईचा पंथातील आद्यप्रेमी स्त्री भक्त म्हणता येईल.
स्वामीच्या सानिध्यात स्त्रिया शास्त्र शिकल्या व वादविवादाच्या माध्यमातून जिज्ञासू व चिकित्सक सुद्धा झाल्या. परंतु सारंग पंडितांसारख्या पुरुषी अहंगंड बाळगणाऱ्या विद्वानाना स्त्रियांचे शास्त्रचर्चा करणे आवडत नसे. एकदा स्वामींनी, “स्त्रियांचा जीव पुरुषांपेक्षा वेगळा असतो का ? असा प्रश्न विचारून सारंग पंडितांना गप्प केले होते. “पुरुषांचा जीव आणि स्त्रियांच्या काय जिवलिया ?” पण तरीही स्त्रियांविषयी त्यांच्या मनातील विचार शुद्ध नव्हते.
त्यांनी एकदा स्वामींना विचारले, “बाबा पूर्वी शास्त्र नाथांना ऐकता येते, परंतु नाथिनीला ऐकता येत नाही. सीधांना ऐकता येते परंतु सीधीनींना एकता येत नव्हते. असे असतानाही आपण स्त्रियांना निरूपण करता”. सर्वज्ञ म्हणाले: “पूर्वी, गार्गी, मैत्री, मदळसा दीलहूतीन या लोकांमध्ये पुराण प्रसिद्ध विदुषी नव्हत्या का ? अशा प्रकारे पुरानातील स्त्रियांचे दाखले देऊन स्त्रियांमध्ये विद्वान असल्याचे सांगून सारंगपंडितांना निरुत्तर केले. एकंदरीत याही संन्निधानातील स्त्रिया पुराण प्रसिद्ध ब्रह्मविद्या स्त्रियांप्रमाणेच विदुषी असल्याचे स्वामींना स्पष्ट करायचे होते, असे म्हणता येईल.
महदाईसा सारख्या स्त्रियांची स्वामींनी जिज्ञासा व विद्वत्ता बघून अनेक ठिकाणी प्रशंसा केल्याचे दिसून येत. यावरून स्वामींनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला हेच लक्षात येते.
(क्रमशः)

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800