नेस्ले प्रणीत हिलदारी अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर व क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त प्रसिद्ध अश्या महाबळेश्वर मंदिरात इको दोस्त उपक्रम राबविण्यात आला.
महाबळेश्वर शहरातील महत्वाचे आणि पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान येथे शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून भाविकांसाठी तिर्थप्रसादाची व्यवस्था देखील केलेली असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असतो. त्यानुषंगाने नुकताच पर्यावरण पूरक इको-दोस्त उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात कचरा निर्माण होण्यापासून तर त्याची योग्य ती विल्हेवाट संपूर्ण प्रक्रिये मध्ये कुठेच पर्यावरणाला हानी होणार नाही आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली गेली.
या उपक्रमात हिलदारी टीम मार्फत मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पर्यावरण पूरक इको-दोस्त उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तसेच या संपूर्ण उपक्रमादरम्यान प्लास्टिक चमचा, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिकची पत्रावळी न वापरता पर्यावरण पूरक पत्रावळी वापरण्यात आली. येणाऱ्या सर्वांनी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखताना स्वच्छता पाळण्याबाबत सूचित करण्यात आले .
घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगतांना कचरा वर्गीकरण प्रकार व कचरा वर्गीकरणची माहिती देतांना कचऱ्याचे चार प्रकार सांगितले. त्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती बायोमेडिकल कचरा याचे वर्गीकरण का करायचे ? त्याचे फायदे व तोटे समजावून सांगितले.
या उपक्रमाला येणाऱ्या पर्यटकांनी उत्तम प्रतिसाद देत ओला व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या कचरा पेट्या मध्येच कचरा टाकत उपलब्ध सुविधेबाबत व स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. या उपक्रमा दरम्यान ओला कचरा व सुका कचरा मिळून एकूण ७८.३४ किलोग्रॅम वर्गीकृत कचरा संकलित केला गेला. यामध्ये सुका कचरा २४.१६० किलोग्रॅम व ओला कचरा ५४.१८० किलोग्रॅम गोळा करण्यात आला.
क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानातील अनिल यशवंत महाबळेश्वरकर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, इतर श्रावणी सोमवार पेक्षा आजचा श्रावणी सोमवर स्वच्छतेच्या दृष्टीने खूप चांगला होता. मागील सोमवारी भाविक कुठेही कचरा टाकत होते. तसेच ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रित टाकत होते. पण हिलदारी अभियांना अंतर्गत आज जो इको-दोस्त उपक्रम, कचरा वर्गीकरण महत्त्व, स्वच्छते विषयी माहिती व घनकचरा व्यवस्थापना विषयी कार्यक्रम राबविला व प्रत्यक्ष कृतीतून भाविकांमध्ये जनजागृती केली हा उपक्रम खरोखरच कौतूकास्पद आहे.
या उपक्रमासाठी महाबळेश्वरच्या तहसीलदार सौ. सुषमा चौधरी पाटील, महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. क्षेत्र महाबळेश्वर ग्रा.प. चे सरपंच श्री सुनील बिरामणे, उपसरपंच सौ. सारिका पुजारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट व व्यवस्थापक श्री देवेंद्र जगताप, क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी , सुजित पेंडभाजे, राम भोसले, खाकसारअली पटेल, फयाज वारूनकर, अमृता जाधव, अंकिता गावडे, आर्तीका मोरे, गौरी चव्हाण इत्यादिनी परिश्रम घेतले.
अशा प्रकारचा उपक्रम राज्यातील इतरही तीर्थ क्षेत्री राबविणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी संबधित स्थानिक अधिकारी, पदाधिकारी, पर्यावरण कार्यकर्ते यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला तर राज्यात एक वेगळी पर्यावरण पूरक चळवळ नक्कीच उभी राहू शकेल.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
उत्तम सामाजिक उपक्रम.चांगल्या शब्दांत गुंफला आहे.