शाळेतील विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत अचूक कचरा वर्गीकरण समजावे, त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी जागृकता निर्माण व्हावी या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिन व सप्ताह निमित्त महाबळेश्वर येथील अंजुमान हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये, हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे शिक्षण देणाऱ्या “बिन इट टू विन इट” या अनोख्या खेळाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक सुजित पेंडभाजे यांनी करत हिलदारी कडून शाळेतील विद्यार्थ्याना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील रोजच्या विषयाबरोबरच त्यांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, कचरा वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन या विषयी विद्यार्थ्यांध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे असते. विद्यार्थी हे भारताचे भवितव्य आहेत. त्यांना या वयात पर्यावरण संवर्धन व कचरा वर्गीकरणाविषयी योग्य शिक्षण मिळाले तर नक्कीच त्या माहितीचा वापर ते त्यांच्या कृतीमध्ये करू शकतात. शाळेत मिळालेली माहिती घरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतात. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना कचरा वर्गीकरण महत्व समजाऊन सांगून बिन इट टू विन इट हा खेळ कसा खेळायचा या विषयीची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्याना या खेळाच्या माध्यमातून कचरा वर्गीकरणाचे प्रकार, कचरा वर्गीकरण महत्व सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली.
या खेळामध्ये एकूण ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला व या नाविन्यपूर्ण कचरा वर्गीकरण खेळाचा आनंद लुटला.
अंजुमान हायस्कूल मधील इयत्ता 9 वीचे विद्यार्थी अमन नालबंद व इशा मंसुरी हे प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, या अनोख्या कचरा वर्गीकरण खेळामुळे आम्हाला कचऱ्याचे चार प्रकार खूप सहज पद्धतीने समजले. तसेच ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती बायोमेडिकल कचरा यामध्ये कोणकोणते घटक येतात तसेच चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणाचे महत्व समजले. हा खेळ खेळून आमच्या माहितीत अधिक भर पडली असून ही माहिती आमच्या उपयोगाची आहे.
सदर कार्यक्रमासाठी महाबळेश्वर न.पा. च्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील, मुख्य लिपिक आबासाहेब ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले. अंजुमान हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शबाना शेख, शिक्षक श्री. रियाज महापुळे, श्री. जेद खान, श्री. खाजासाहब शेख आदी शिक्षकांचे सहकार्य मिळाले.
या उपक्रमासाठी हिलदारीचे खाकसरअली पटेल, फैयाज वारुणकर, अमृता जाधव, गौरी चव्हाण इत्यादींनी परिश्रम घेतले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
अतिशय आवश्यक तरीही रूक्ष विषय खेळाच्या माध्यमातून सोपा केला हे अनुकरणीय आहे.