पहिली माझी ओवी ग, त्या युगपुरुषाला, अस्पृश्यता निवारूनी, वर्णभेदाच्या बेड्या ज्यांनी तोडिल्या !!१!!
दुसरी माझी ओवी ग, परमपूज्य महामानवाला,
त्यांच्या समता बंधुता आणि सहिष्णू विश्वबंधुत्वाला !!२!!
तिसरी माझी ओवी ग, त्या न्यायपुरुषाला, विद्या, विनयशीलता, प्रज्ञा आणि करूणेला !!३!!
चवथी माझी ओवी ग, त्या समाजसुधारकाला,अभ्यासू विदुषी आणि थोर व्यासंगी वाचकाला !!४!!
पाचवी माझी ओवी ग, रयतेच्या कैवाऱ्याला, महाड तळ्याचे चाखून पाणी, अस्पृश्यांसाठी केला खुला !!५!!
सहावी माझी ओवी ग, घटनेच्या शिल्पकाराला, संविधानाची करुन निर्मिती, धन्य केले शोषितांना !!६!!
सातवी माझी ओवी ग, त्या भारतरत्नाला, पत्रकारितेतून वाचा फोडली उपेक्षित अन्यायाला !!७!!
आठवी माझी ओवी ग, दिव्य त्या विद्वाना, जनहित बलिदाना आणि निर्भिड स्वाभिमानला !!८!!
नववी माझी ओवी ग, मानवतेच्या पुजाऱ्यांला, “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या त्यांच्या संदेशाला !!९!!
दहावी माझी ओवी ग, बौद्ध धम्माच्या प्रसारकाला, शांतीदूताच्या सेवेसाठी उभा जन्म वाहिला !!१०!!
अकरावी माझी ओवी ग, कायदे विधी तज्ञाला, दीनदुबळ्यांसाठी देऊन लढा, अन्यायाचा प्रतिकार केला !!११!!
बारावी माझी ओवी ग त्या युगप्रवर्तकाला, स्वशिक्षणाच्या पदव्यांच्या रचून विटा, इतिहास ज्यांनी घडविला !!१२!!
तेरावी माझी ओवी ग त्या क्रांतिसूर्याला, समतेच्या तीरावर, ममतेचे बांधून मंदिर, आदर्श समाज निर्मिला !!१३!!
चौदावी माझी ओवी ग, विश्वभूषित द्रष्ट्याला, ज्ञानाचा अथांग सागर, आणि अर्थक्रांतीच्या उद्गगात्याला !!१४!!
पंधरावी माझी ओवी ग, समताधिष्ठित मूल्यांना, संविधानाची जाहली सुवर्ण क्रांती, सलाम त्यांच्या कार्यकर्तृत्वाला !!१५!!

– रचना : पूर्णिमा शिंदे