Monday, December 23, 2024
Homeसाहित्यमहामारीत प्रेमाचा ओलावा!

महामारीत प्रेमाचा ओलावा!

माणसाला टाळू पाहत असणारा माणूस, भेटण्यास वेळ न देवू शकणारा व्यस्त माणूस, भ्रमणध्वनीवर पाच मिनिटेसुद्धा संवाद न साधू शकणारा गर्विष्ठ माणूस, आज मात्र प्रत्येक गोष्टींसाठी आसूसलेला आहे.

आजपर्यंत माणूस आपापल्या कामात व्यस्त असलेला दिसत होता. प्रत्येक मिनिट त्याला महत्वाचा वाटत असे. भ्रमणध्वनीवरील आपल्या जवळच्या माणसाचे संदेश, वाचण्यास वेळ मिळत नव्हता. उलट त्याच्याकडून टोमणे ऐकायला मिळत असत, “गप्पांसाठी यांच्याकडे भरपूर वेळ आहे. यांच्यासारखे सगळेच रिकामटेकडे नसतात, किती बोलतो हा माणूस ! नकळतच असे उदगार तोंडून निघायचे.

पण आज भ्रमणध्वनीची बेल कानी पडताच हातातले काम अर्धवट सोडून प्रत्येक जण, भ्रमणध्वनीवर विचारपूर्वक संवाद, न कंटाळता साधू लागला आहे. मिळणारे संदेश आठवणीने वाचून त्याची प्रति उत्तरे देऊ लागला आहे. आज जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे प्रत्येक जण आपला मित्रपरिवार, नातेवाईक तसेच नुकतीच कधीतरी तोंडओळख झालेल्या व्यक्तींची आस्थेने विचारपूस करू लागला आहे. माणुसकीचे दर्शन कसे घडते? अश्या गुणांचे, प्रत्येक जण स्वतःमध्ये स्वागत करु लागला आहे.

एकत्र कुटुंब म्हटले, की सासू- सासरे, दीर- नणंदा यांच्याशी, तर क्षुल्लक कारणावरून राग रुसवे, ‘मी’ पणाचे वागणे वा खटके नेहमीच होतात. मुलांवरून होणारी चिडचिड, नवरा-बायकोत होणारा हेवे- दावे, नणंद- भावजयमध्ये होणारा कुचकामीपणा, भावा- भावात उद्भवणारा मोठेपणाचा तुरा, सून-सासू मध्ये उद्धभवनारा किरकिरेपणा तसेच भाऊ-बहिणीत कमी झालेल्या मायेमुळे पडलेली दरी, मित्रांवर सुद्धा कधी कधी लटका राग असणे असे अनेक हलके हलके उकळीचे फुगे नात्यांमध्ये फुटतात.

पुर्वापार चालत आलेली नात्यांमधील दुफळी, थोडक्यात अशी होती. प्रत्येक नात्यात खोटेपणा शोधणे ही माणसाची विकृती होती. देण्या- घेण्यावरून, माणसा-माणसातील मान-अपमान याची तटस्थ सीमा, गर्विष्ठ पणाला जागृत करते. एखाद्याच्या चांगुलपणावर द्वेष भावनेने फुत्कार उडवले जात असतात. एखाद्याच्या आयुष्याची यशस्वी घोडदौड मनाला बोचते, पुढे जाण्याऱ्यांचे तुच्छतेने पाय ओढणे, शिवाजी जन्माला यावा, पण शेजारच्या घरात, असे मानसिक प्रवृत्तीचे स्वभावदोष अंगी जोपासून, प्रत्येक व्यक्ती जीवनाची वाटचाल करत आला आहे.

आजच्या परिस्थितीमुळे माणूस स्वतःला बदलण्याच्या प्रयत्नात आहे. बरेच दिवसात जवळच्या माणसाशी संवाद झाला नाही की उगाचच, मनात पाल चुकचुकल्या सारखी होते. हळूच मनाला शंका शिवून जाते, “सगळे बरे असतील ना! सासूबाईंचे आता वय झालं आहे, त्यांना बाहेर जाऊ नका, असं निक्षून सांगायला हवं. वहिनी, जरा चिंगट आहे, तिला सांगावं की, फेरीवाल्याकडुन कोणतीच वस्तू खरेदी करू नकोस. फळ- दुकानातूनच फळे विकत घे. वन्सना म्हणावं, उगाच डोक्यात राग धरून राहू नकोस. वरचेवर माहेरी फोन करत जा. भावोजींना सांग, काही मदत लागली तर, नक्की कळवा. छोट्या दिरांना म्हणावं, उगाच नाक्यावर बसत जाऊ नकोस. घरातल्या मंडळींची काळजी घे. दादा, वहिनीचे जरा ऐकत जा.” असे काळजीपोटी मनात तरंग उमटतात. आपल्या माणसांसाठी हेच ते खरे प्रेमाचे झरे!

आयुष्यात माणूस काय घेऊन जन्माला येतो? नि काय घेऊन जातो? सर्व इथेच सोडून रिकाम्या हाती जातो.
आजच्या महामारीत, प्रत्येकाच्या जीवनात, लाभणारा क्षण, हा लाख मोलाचा आहे. जेवढा आनंद मिळवता येईल, तसेच जेवढे प्रेम इतरांना देता येईल, असे सत्कार्य प्रत्येक जण करू लागला आहे. सामाजिक स्तरावर अन्नदानाचा उपक्रम तसेच आर्थिक बळाचे पाठबळ देण्यासाठी, अनेक हात पुढे सरसावले आहेत. मानव प्रेमाची वेणी गुंफू लागला आहे. “मी”पणाचा तोरा संपुष्टात येऊ लागला आहे. प्रत्येक क्षण सुखाने जगता यावा, याची प्रत्येकाला आस लागली आहे.

कधीकाळी चुकून मुखातून निसटलेल्या अप शब्दांची माफी पदरात घेऊन पुण्याईने जगण्याची, तडफड या जगी प्रत्येकाच्या मनी, जागृत झालेली दिसत आहे. ह्या महामारीने नव्याने जगायला खुप काही शिकवलं ! आपण जवळच काही गमावतो, तेव्हा त्याची किंमत कळते. तोटय़ातूनच नफ्याचे मूल्य अजमावता येते. हेच खरं! आपलं जवळचं जेव्हा आपल्यापासून दूर जात तेव्हाच नात्यातील गोडीचे मूल्य जाणवते. मानव स्वभावातून निसटलेल्या चांगल्या गुणांची खरी ओळख, पुन्हा एकदा मानवाला, नव्याने गवसली आहे.

लेखिका – वर्षा भाबल.

– लेखन : वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कोरोना सारख्या महामारीत माणसांच्या अंगी असलेले गुणविशेष कळायला लागले. आपल्याच कुटुंबाला कोण कोण आणि कसा आधार देतात ह्यांची नवओळख होते. सुंदर आणि ओघवता लेख आहे. वर्षा हिच्या लेखामध्ये अगदी महाविद्यालयीन जीवनापासून मानवांचे अंतरंग ओळखण्याची खुबी आहे. newssportal today वर असे लेख ती देत राहील ही अपेक्षा. श्री. देवेंद्र भुजबळ आणि सौ. अलका भुजबळ यांना धन्यवाद देईन व अभिनंदन .स्तुत्य उपक्रम आहे. बाकीचे लेख तेव्हढेच वाचनीय आणि मनाची पकड घेणारे आहेत. धन्यवाद.👏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९
गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७