Sunday, September 8, 2024
Homeलेखमहामारी आणि विश्वाचा नवोदय (भाग १)

महामारी आणि विश्वाचा नवोदय (भाग १)

जगावर पुरातन काळापासून ओढवलेल्या महामारी आणि त्यावर जगाने केलेली मात, यावरील विशेष लेखमला……..

कोविड १९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजाराने जगात साथीच्या रोगाचे रूप धारण केले आणि याचे रूपांतर कसे थोड्या कालावधीतच महामारीत झाले हे कळले देखील नाही ! २०१९ च्या मावळतीला या रोगाची लागण होत असल्याचे अधिकृतपणे उघडकीस आले .मात्र चीनच्या वूहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले एक तरुण डॉक्टर ली वेनलीयांग यांनी सर्व प्रथम याबद्दल धोक्याची पूर्वसुचना दिलेली होती. त्यांच्या या धोक्याच्या सुचनेकडे जरा दुर्लक्षच झाले आणि वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी रुग्णसेवा देत असताना त्यांचे याच विषाणूच्या बाधेने निधन झाले. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो आहे की, जर जग एवढं पुढं गेलंय तर का असे हे अचानक सक्तीचे निर्बंध? का आधीच उपाय उपलब्ध नसावे? आपल्यापैकी बहुतेक हा अभूतपूर्व संकटकाळ पाहून अवाक देखील होतात. असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते! अचानक सगळे ठप्प झाल्याचे अथवा शाळा, महाविद्यालये, देवस्थळे बंद पडल्याचे तर इतिहासात देखील कधीही घडले नसावे असे आपणास वाटते.

या लेखमालेच्या माध्यमातून मी गेल्या काही शतकांमधील महामारीच्या तांडवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात यासाठी भरपूर विश्वासार्ह माहितीचे संकलन आणि तत्सम पुस्तकांचे वाचन करावे लागले आहे. अशी भयानक संकटे या विश्वाने कैकदा अनुभवली आहेत. त्यातून विश्वाचा तेवढ्यांदाच नव्याने उदय देखील झालाय. मात्र त्या संकटांमधून सही सलामत बाहेर पडल्यानंतर त्यातून शिकलेलं कितीस आपण संस्कार शिदोरीत जपून वृद्धिंगत केलंय? साहित्य क्षेत्रात अशा अलिखित पण मौखिक परंपरेतून जपल्या गेलेल्या साहित्याचे एक वेगळे महत्त्व आहे. मग हे जीवघेणे प्रसंग का सहज विसरल्यात पिढ्या? आपण मानव प्रगतीच्या हव्यासात एवढे गुरफटून गेलो की जुने प्रसंग विसरलोच!अर्थात आरोग्याबाबत असलेली अनास्था आणि संशोधनाचा अभाव ही आणि अशी बरीच कारणं आहेत यामागे!

काळाचा पडदा जरासा वर केला आणि हे काय आपण जवळपास एकोणविसशे वर्ष मागे गेलोत. इसवी सन १६५ ते १८० म्हणजे पंधरा वर्षांचा तो काळ. ‘अँटोनाईन प्लेग’, जो ‘गॅलन प्लेग’ या एका चिकित्सकाच्या नावाने देखील ओळखला जातो. या प्लेगची साथ तत्कालीन रोमन राजवटीच्या अधिपत्याखाली असलेल्या सैन्याने आपल्या पूर्वेकडील स्वारीच्या माध्यमातून आणली होती. या महामारीत रोमन राजा लुसिअस वेरस याचा इसवी सन १६९ मधे अंत झाला. पुढे रोमन साम्रज्य मार्कस ऑरेलस अँटोनीअसच्या अधिपत्याखाली आले आणि याच कुटुंबाचे नाव या महामारीला दिले गेले. तत्कालीन रोमन इतिहास अभ्यासक कॅसीअस डियो या घटनेला पुष्टी देताना सांगतात की या रोगाने पुन्हा नऊ वर्षांनी म्हणजेच इसवी १८९ मधे डोके वर काढले ज्यात रोमचे दर दिवशी जवळपास २००० लोक मृत्युमुखी पडत होते. या महामारीत रोम साम्राज्याचा जवळपास एक चतुर्थांश भाग प्रभावित झाला होता ज्यामुळे ५ मिलियन म्हणजे ५० लक्ष लोकसंख्या काळाच्या पडद्याआड लोटली गेली. काही इतिहासकार आणि चिनी भाषा अभ्यासकांच्या मते या रोगाने पूर्व चीनवर देखील आपला दुष्प्रभाव सोडला होता. रोमन संस्कृती आणि वाङ्मयासोबतच हिंद महासागरातून होणाऱ्या इंडो-रोम व्यापारावर याचे दूरगामी परिणाम झालेले होते.

पुढील लेखांमधून हे साथीचे रोग कधी आणि कसे आपल्या भारतात आले यावर उहापोह होईलच !

क्रमशः

– लेखन: तृप्ती काळे
– संपादक: देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments