मागील भागात आपण ‘कॉलरा’ साथीचा भारतात झालेला उगम आणि गेल्या २ शतकातील त्याचे जगभरात झालेले दुष्परिणाम, त्याचप्रमाणे क्वीन व्हिक्टोरीया हिच्या रोजनिशीतील तत्कालिन ब्रिटन मधील कॉलराच्या साथीसंबंधी महत्त्वपूर्ण नोंदी याबद्दल माहिती पाहिली.
मित्रांनो, आताच्या युवा पिढीच्या आधीच्या एका पिढीला म्हणजे आपल्या आई-बाबा, काका-काकूंच्या दंडावर लसीचा एक भला मोठा व्रण दिसतो. मला बालपणी आपल्यालाच हा व्रण का नसावा याचे वाईट वाटायचे. पुढे मोठी झाल्यावर देवी या रोगाची लस दंडावर घेतल्यावर तो व्रण राहतो, हे समजले.
देवी, चेचक किंवा स्मॉलपॉक्स या रोगाचे १९८० पर्यंत पूर्णतः निर्मूलन झालेले होते. हा रोग ‘वा रिओला’ नावाच्या विषाणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जा संस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप आणि संसर्गानंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात. त्या पुरळांमध्ये पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पस होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात.
जिथे मानवी वस्तीत अस्वच्छता तिथे रोगराईला निमंत्रण. अन जिथे अज्ञान तिथे अंधश्रध्देला निमंत्रण. देवी रोग हा देवीच्या कोपामुळे होतो अशी भारतीयांची मान्यता होती, त्यामुळे या रोगास ‘देवी रोग’ हे नाव पडले. मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता.
देवी हा साथीचा रोग जवळ पास ३००० वर्ष जुना असून या रोगाने जगभरातील जवळपास ३०% लोकांना आपला जीव गमवावा लागला असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे. मात्र काही अभ्यासकांच्या मते या आजाराचे निर्मूलन होईस्तोवर जवळपास ६०% लोकसंख्या काळाच्या पडद्याआड लोटली गेली होती.
आरोग्य क्षेत्रातील संशोधनाबाबतीत अजुनही बरीच राष्ट्रे उदासिन असल्यामुळे आजही या रोगावर उपचार उपलब्ध नाही असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. मात्र लसीकरणाचे जनक मानले जाणारे एडवर्ड जेन्नर यांच्या संशोधनामुळे सन १८०२ मधे देवीवर जी प्रभावी लस तयारी झाली, तिच्यामुळे देवीचे पूर्णतः निर्मूलन झाले आहे.
या रोगाचे शेवटचे ज्ञात नैसर्गिक प्रकरण १९७७ मध्ये सोमालियामध्ये आढळून आले होते. त्यानंतर इंग्लंडमधील बर्मिंगहममध्ये १९७८ साली प्रयोगशाळेत झालेल्या दुर्घटनेमुळे एकमेव ज्ञात प्रकरण घडले ज्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता आणि मर्यादित उद्रेक झाला होता.
सन १९७९ मधे स्मॉलपॉक्स उर्फ देवी रोगास अधिकृतपणे पूर्णत: निर्मूलन झालेला रोग म्हणून घोषित केले गेले. देवी हा लसीकरणाने पूर्णतः निर्मूलन झालेला पहिला रोग ठरला. एडवर्ड जेन्नर यांच्या अभ्यासू आणि संशोधक प्रवृत्तीमुळे जगाला या जीवघेण्या रोगापासून विश्वाला संरक्षण मिळाले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. हे विधान एडवर्ड जेन्नर यांच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले. बालपणी जेन्नर मानवी अवशेष गोळा करुन त्यांचा अभ्यास करत. नऊ भावंडांपैकी एक असलेले एडवर्ड, यांना त्यांच्या वडीलांमुळे अत्यंत प्रभावी पायाभूत शिक्षण मिळाले. पुढे ते एक यशस्वी वैद्यक व त्यानंतर जगप्रसिद्ध सर्जन ठरले.
गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. एडवर्ड यांना बालपणी ज्या रोगाने ग्रासले तो हाच रोग ज्यावर त्यांनी यशस्वी संशोधन केले. देवीमुळे त्यांचे सामान्य आरोग्य देखील प्रभावित झालेले होते. एडवर्ड यांच्या मते हा रोग ‘काऊ पॉक्स‘ असून तो गवळणींमधे आढळायचा आणि समाजात पसरत जायचा.
एडवर्ड फक्त संशोधन करून थांबले नाही तर त्याकाळी ग्रामीण भागात या रोगाचा प्रभाव अधिक तीव्र असल्याने ते जनतेला आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करायचे. त्यांच्या या कार्याचे साक्षीदार आहेत ती तत्कालिन चित्रकारांनी रेखाटलेली तैलचित्रे !

दोस्तांनो या संशोधकाची आज जगभर वाहवा होते आणि त्याकाळी देखील बरेच पुरस्कार देऊन यांना सन्मानित करण्यात आले होते, मात्र त्यांच्या सोबत देखील कुटील राजकारण झाल्याचे दाखले इतिहासात नमूद आहे.
डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी लसीकरण या उपचार पध्दतीचा जो वैज्ञानिक पायंडा घातला त्यामुळे आजवर बऱ्याच रोगांवर लस उपलब्ध होऊन त्यातून त्या त्या रोगाचे निर्मूलन झालेले आहे. ज्यात पोलिओ सारख्या रोगाचा समावेश आहे.
आशा करूत की कोरोनाचा देखील समूळ नायनाट होईल. मात्र तोवर स्वतःची आणि आप्तांची काळजी घ्या. आपल्या आपुलकीच्या काही शब्दांमुळे कुणाला या वादळात जगण्याचे बळ मिळत असेल तर ती आपुलकी जपायला काय हरकत आहे.

क्रमश :……
– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.