Friday, October 18, 2024
Homeलेखमहामारी आणि विश्वाचा नवोदय - भाग ११

महामारी आणि विश्वाचा नवोदय – भाग ११

दोस्तांनो, मागील भागात आपण १९५७ -५८ चा एशियन फ्लू आणि त्यातून पसरलेल्या महामारीवर प्रकाश टाकला होता. त्याकाळी सुक्ष्मजैव शास्त्रज्ञ मॅरिस हिलमन यांनी पुढाकार घेऊन लसीचे संशोधन केले नसते तर कदाचित झाली त्याहून कितीतरी पट अधिक हानी या विश्वाने अनुभवली असती.

काळाचा पडदा एक दशक पुढच्या व्यासपीठावरून वर केला आणि हे काय हाँग काँग फ्लू जो त्याच्या उत्पत्तीच्या सालावरून म्हणजेच १९६८ – फ्लू पँडॉमिक म्हणून देखील ओळखला जातो, तोच पसरलेला दिसतोय.

१९६८-६९ या दोन वर्षाच्या कालावधीत जगभरातील जवळपास १० लाख ते ४० लाख लोकसंख्या मृत्यूच्या खाईत लोटली गेलेली दिसते आहे. ही एक भयंकर महामारी होती जी इन्फ्लूइंझा ए. च्या एच.थ्री.एन.टू. या विषाणूच्या बाधेमुळे पसरली होती. या विषाणूचे मुळ एशियन फ्लू चा एच.टू.एन.टू. हा विषाणू होते. यावरून असे लक्षात येते की रोगराईचा समूळ नायनाट झालाय असे वाटलेले असतानाच ती रोगराई पुन्हा कोणत्या नव्या रूपात डोके वर काढेल सांगता येत नाही.

आजही कोरोना संपतोय असे वाटू लागले होते आणि सामान्य जनजीवन सुरळीत होऊ लागले होते न होते तोच दुसरा स्ट्रेन कोरोनाची दुसरी महाभयानक लाट घेऊन आला ज्यात या राष्ट्राचे आधारस्तंभ असलेला बराचसा होतकरू युवा वर्ग आपण गमाविला. कित्येक कुटूबांमधील कमावते हात निघून गेले. यावरून हे मात्र निश्चीत की हा विषाणू आपल्या सोबत गनिमी कावा खेळत असतो.

हाँगकाँग फ्लूचा उद्रेक १३ जुलै १९६८ रोजी ब्रिटीशांची वसाहत असलेल्या हाँगकाँग प्रांतात आढळून आला ज्याची दखल सर्वप्रथम ‘द टाईम्स’ या वृत्तपत्राने घेतली होती. काही तत्कालिन अभ्यासक अशीही शक्यता वर्तवितात की या विषाणूचा उद्रेक प्रथम चीन मधूनच झालेला असावा. मात्र ठोस पुराव्या अभावी असे विधान करणे चुकीचे ठरेल. या विषाणूच्या बाधेने ६ हजार प्रति किलोमीटर अशी दाट लोकवस्ती असलेल्या हाँगकाँगवर केवळ १५ दिवसांच्या कालावधीत घातक परीणाम केला आणि सहा आठवडयात जवळपास १५% लोकसंख्येवर या विषमज्वराचा दुष्प्रभाव झाला.

तत्कालिन सांस्कृतिक क्रांतीमुळे फारशी माहिती उपलब्ध नसली तरिही या महामारीच्या चीनमधे दोन लाटा येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. त्यापैकी पहिली लाट १९६८ च्या जुलै- सप्टेंबर दरम्यान तर दुसरी लाट १९७० च्या जून ते डिसेंबर या काळात उद्भवली. पहिल्या लाटेत चीनचा बहुतांश भाग प्रभावित झालेला होता.

असे म्हणतात की कवी मन फार कल्पक असते. कवी कल्पना फार वेगाने जगाचा प्रवास करतात. मात्र हे जीवघेणे विषाणू या विचारास खोटे ठरवत क्षणार्धात स्वतःचा प्रसार करतात. हाँककाँग फ्लू जुलै १९६८ च्या शेवटास व्हिएतनाम, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रेलिया, फिलीपाईन्स, ब्रिटन असा प्रवास करत व्हिएतनाम युद्धाहून परतलेल्या सैन्य तुकडयांद्वारे अमेरिकेत पोहोचून डिसेंबर १९६८ दरम्यान अमेरिकेत पसरलेला होता. पुढे १९६९ मधे जपान,आफ्रिका, दक्षिण अमेरिकेत या महामारीने उद्रेक केलेला होता.

त्यावेळी या विषमज्वरास ‘माओ फ्लू’ ‘माओ त्से-त्तुंग फ्लू’ म्हणून देखील संबोधले जावू लागले. डिसेंबर १९६८ – जानेवारी १९६९ मध्ये वैद्यकीय आणि शास्त्रीय जर्नल्स तसेच वृत्तपत्रांमधून आरोग्याबद्दल जनजागृतीपर लेखन छापून येऊ लागले. जर्मनीतील बर्लिनमधे या महामारीचा उद्रेक एवढा भयावह झालेला होता की कचरा व्यवस्थापकास रस्त्यांवरील प्रेतांची विल्हेवाट लावावी लागलेली होती.

या महामारीने जर्मनीमधील जवळपास ६० हजार लोकसंख्या काळाच्या पडद्याआड गेली होती. फ्रॉन्स मधील उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेला जवळपास निम्मा कर्मचारी वर्ग अंथरुनाला खिळल्याने अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. संयुक्त राष्ट्रांमधील पोस्ट सेवा आणि रेल विभागावर हॉंगकॉंग फ्लूचा चांगलाच दुष्परीणाम झाला. सुक्ष्मजैववैज्ञानिक मॅरिस हिलमन आणि समुहाने पुनश्च अहोरात्र मेहनत करून गुणकारी लस निर्माण करत ९० लाख लसींचे उत्पादन केले.

दोस्तांनो, एच.थ्री.एन.टू. आजही एक मानवी आजार म्हणून मानवी समाजात प्रभावी आहे ज्यामुळे बाधित ४ ते ५ दिवस आजारी रहातो. मात्र कधी कधी या रोगातून बरं व्हायला जवळपास दोन-तीन आठवड्यांचा कालावधी देखील लागतो. काही अभ्यासकांच्या मते एशियन फ्लू आणि हाँगकाँग फ्लू या रोगांचा विषाणू पिग अर्थात डुगरांमधून माणसात आलेला असावा ज्याची बाधा पूर्णत: टाळता येण्यासाठी हवे तेवढे प्रभावी उपचार आजही उपलब्ध नाहीत. हाच विषाणू पक्षांमधे देखील आढळतो जो माणसाला बाधीत करतो आणि कैकदा प्राणघातक ठरतो.

अशाच एखाद्या महामारीवर आणि त्यातून नव्याने उभ्या राहिलेल्या संस्कृतीवर पुढील भागांमधून चर्चा करू. मात्र तोवर कडक निर्बध, संचारबंदी हे सगळे आमच्याच नशिबी का ? या नकारात्मकतेत वेळ वाया घालवू नका. कारण आपल्या पूर्वजांनी याहून कठीण काळ पाहिला आहे हे इतिहास सांगतो. तेव्हा सर्व नियम पाळत स्वतःची काळजी घ्या.

क्रमश:

लेखिका तृप्ती काळे.

– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन