दोस्तांनो, मागील भागात आपण ‘देवी’ उर्फ ‘स्मॉल पॉक्स’ या साथीच्या रोगाचे दुष्परीणाम आणि डॉ एडवर्ड जेन्नर यांचे लसीकरण उपचारातील अमूल्य योगदान याबद्दल माहिती पाहिली.
१९८० दरम्यान देवीचे पुर्णतः निर्मलन होते न होते, तोच १९८१ साली जगासमोर एका जीवघेण्या रोगाने थैमान घातले. ज्यावर संशोधकांना आजतागत पूर्ण प्रभावी औषधोपचार अथवा प्रतिबंधात्मक लस निर्माण करता आलेली नाही. ज्या रोगाचे नुसते नाव घेतले तरी अंगावर काटा ऊभा रहातो आणि मग एक सामान्य माणूस रोग्याकडे व्यक्ती म्हणून कमी आणि आरोपी म्हणून अधिक बघू लागतो.
तो रोग, अर्थात एड्स म्हणजे ‘अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम‘ एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी ही एक स्थिती आहे ज्यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एचआयव्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने, सर्दी खोकल्यापासून तर क्षयरोगासारखे भयंकर रोग होऊ शकतात, ज्यावर इलाज करणेही अवघड होते.
एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते. एड्स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्य समस्यांपैकी एक आहे. एड्सच्या संसर्गाची प्रमुख कारणे म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त चढविल्याने, संसर्गित आईकडून अर्भकाला, बाधित आईकडून स्तनपान करणार्या मुलाला किंवा दूषित सुई वापरली जाणे ही आहेत.
नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि यूएनएड्स यांच्या अहवालानुसार भारतात ८० से ८५ टक्के संसर्ग असुरक्षित विषमलैंगिक संबंधांतून पसरतो. भारतात आजपर्यंत एड्सकडे दुर्लक्ष झाले असले तरिही उपचार पध्दती उपलब्ध व्हावी आणि जनजागृती मधून प्रतिबंध साधता यावा याकडे शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाचा विशेष भर असतो आणि त्यासाठी डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा एड्स जनजागृती सप्ताह म्हणून पाळला जातो.
मित्रांनो, हा जीवघेणा आजार मनुष्यात आला कसा ? याबाबत असे सांगितले जाते की एच. आय. व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला होता आणि तेथूनच तो सगळ्या जगात पसरला.
इ.स.१९८१ मधे जगभरातील सुमारे ५ कोटी लोक एड्सचे बळी ठरले होते असा अंदाज आहे. अजूनही एड्सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत. प्राण्यांमधून माणसांत आलेल्या इतर रोगांप्रमाणे हा देखील एक क्लेशदायी रोग.
दोस्तांनो, पशुपक्षी, प्राणी किंवा जंगली श्वापदेच काय पण या विश्वातील प्रत्येक सजीवाचे आपले एक वेगळे संविधान रहातच असेल. माणसाने त्यात ढवळाढवळ, छेडछाड केली की त्याची फळं येणार्या कित्येक पिढयांना भोगावी लागतात. मग तो कोरोना असो स्वाईन फ्लू असो अथवा एड्स. मग ते पशुपक्षांना पाळणे असो, मानवी औषधोपचारासाठी संशोधन करणे असो अथवा मानवी जिभेचे चोचले पुरविणे असो ! आपण योग्य ती खबरदारी घ्यायलाच हवी.
एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही अँटीरेट्रोव्हायरल औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य असते. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना सहज उपलब्ध होत नाहीत. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही.
त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक बाबींचा अवलंब करणे गरजेचे असते. जसे की एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध टाळणे, असुरक्षित यौनसंबंध टाळणे.
तुमच्या प्रामाणिकतेची खरी कसोटी म्हणजे तुम्हाला एच. आय. व्ही. संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची तुम्ही कल्पना द्यायला हवी. रक्तदान हे जीवनदान असले तरीही एच.आय.व्ही. संक्रमित व्यक्तीने रक्तदान करू नये. सामान्य रक्तदात्याने नोंदणीकृत रक्त पेढीत अधिकृत मार्गानेच रक्तदान करावे. रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी ते एच.आय.व्ही. मुक्त आहे याची खात्री करून घ्यावी. इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करावा आणि आता तर त्यासाठी वैद्यक देखील बाध्य आहेत.
एच.आय.व्ही. चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यात बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत. एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही.
ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि भूक कमी होणे, लसिकांची सूज, नागीण, वजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त), वारंवार तोंड येणे, वारंवार जुलाब, वारंवार आजारी पडणे, अंगावर लालसर डाग येणे ही या रोगातील काही लक्षणे जी साध्या रोगात दिसून येतात त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित ओळखता येत नाही.
एच.आय.व्ही. वर उपचार उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात ए.आर.टी. मोफत मिळतो. ही औषधे प्रणाली आता रुग्णालयांमधून उपलब्ध असून ती ‘प्रति उत्त्क्रम-प्रतिलिपि-किण्वक विषाणु चिकित्सा’ या नावाने ओळखली जाते. मात्र यातील काही औषधे महाग असून ती सर्वत्र मिळतातच असेही नाही. याच्या सेवनाने आजार नियंत्रणात येतो पण संपत नाही. जर या औषध घेणे थांबवले तर आजार परत वाढतो म्हणून एकदा आजार झाल्यावर हे आयुष्य भर घ्यायला लागतात. जर औषध बंद केले तर आजाराचे लक्षण वाढते आणि एड्स ग्रस्ताचा मृत्यू देखील होऊ शकतो.
२००४ सालच्या एड्सच्या वैश्विक पातळीवरील उद्रेकानंतर उपचारपध्दतीतील बदलांमुळे एड्समुळे वाढलेला मृत्यूदर जवळपास ६०% ने आटोक्यात आलेला आहे असे संयुक्त राष्ट्र एड्स संघटनेच्या अहवालात नमूद आहे.
कधी वीतभर पोटासाठी तर कधी माणसाच्या धूर्त पाशवी प्रवृत्तीस बळी पडत कित्येक मुली, महिला, बालिका दरवर्षी वेश्या व्यवसायात लोटल्या जातात. स्वतःच्या शरीर स्वास्थाची अपुरी जाण आणि ग्राहकांच्या नको नको त्या इच्छांची पूर्तता यामुळे वेश्या एड्स रोगाच्या मोठया प्रमाणात वाहक ठरल्या. कित्येक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत त्यांना शरीर स्वास्थाचे प्रशिक्षण दिले, ज्यामुळे या रोगाच्या वाहक म्हणून त्यांचे प्रमाण आटोक्यात आले, असे संशोधनाअंती निदर्शनास आले आहे.
भारताच्या नॅको अर्थात नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी जवळपास ७० हजार बाधित एड्समुळे मृत्यूच्या खाईत लोटले जातात. आणि यातील कित्येक बाधित तर निव्वळ रोग झालाय हे माहित झाल्यानेच खचून अर्धमेले होतात. याला कारण समाजाचा दृष्टीकोन.
मित्रांनो, नायनाट रोगाचा करायचा असतो रोग्याचा नव्हे. एकत्र राहिल्याने, सोबत काम केल्याने किंवा एकत्र जेवण केल्याने एड्स होत नाही किंवा निव्वळ वेश्यागमन केल्यानेच तो होतो असेही नाही. परंतु समाज एड्स बाधितांना किंवा त्यांच्या मुला बाळांना जी वागणूक देतो त्याने रुग्ण अधिक खचतो, ओषधोपचार टाळतो आणि क्लेशदायी मृत्यूला कवटाळतो.
अशी काहीशी विचित्र वागणूक कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीस मिळत असल्याचे निदर्शनास आले की वाईट वाटते. आपल्याला बाधा होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हा वेगळा भाग परंतु साध्या माणुसकीच्या आधाराच्या दोन गोष्टी देखील बाधितास लक्षात येतील अशा पद्धतीने टाळणे…!
हिच खरं तर मनुष्याची हार आहे… मग संशोधक म्हणून तो उपचार पद्धतीत अव्वल ठरलेला असला तरीही.

क्रमशः….
– लेखन : तृप्ती काळे
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

अत्यंत माहितीपर आणि मार्गदर्शक लेख, धन्यवाद 👌👌🙏🙏🌹🌹