दोस्तांनो, मागील भागात आपण ‘मदर ऑफ ऑल पँडेमिक्स’ म्हणून संबोधले जाणारे स्पॅनिश फ्लू, पहिले महायुध्द आणि तत्कालीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाधितांची धक्कादायक आकडेवारी याबद्दल जाणून घेतले.
या भागात देखील युद्ध आणि महामारी यांचा मानवी जीवनावर झालेला दूरगामी परिणाम यावर प्रकाश टाकू या.
पहिल्या महायुद्धापूर्वीचा हा एक पडदा वर केला आणि हे काय? पोलंड आणि शेजारील राष्ट्रांना भेडसावलेली टायफस ही महामारी आणि तिच्या प्रादुर्भवामुळे मोठ्या संख्येने होणारे मृत्यू! पहिल्या महायुध्दाच्या काळात ज्याप्रमाणे रशियन फ्लूने धुमाकूळ घातला होता अगदी तेवढा भयावह नसला तरीही तसाच काहीसा हा टायफस.
महायुध्द सुरू असताना म्हणजेच सन १९१४ ते १९१८ या चार वर्षात आणि त्यानंतर देखील मानवी आरोग्याला हानिकारक ठरला तो टायफस ज्याने राशियातील जवळपास ३० लक्ष लोकसंख्या कालवश झाली तर, कित्येक लक्ष पोलिश आणि रोमेनियन यात मारले गेले. याला जबाबदार जेवढी मानवी जमात आणि अस्वच्छता तेवढच त्या त्या राष्ट्राचे तत्कालिन प्रशासन असावे. कारण महासत्ता होण्याच्या हव्यासातून राष्ट्रांनी युध्दात उडी टाकली आणि परीणामस्वरुप सैन्य आणि कैदी यांच्याद्वारे प्रादूर्भाव वाढतच गेला.
असे म्हणतात वेळेतील एक शिवण पुढचे मोठे श्रम वाचविते. त्यावेळी राष्ट्रांनी युध्दाऐवजी सामान्यांच्या आरोग्याकडे वेळेत लक्ष दिले असते तर कदाचित आज चित्र काही निराळेच असते, नाही का? या विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सैबेरीयातील जवळपास दिड लाख नागरीक मृत्यूच्या खाईत लोटले गेले ज्यात किमान ५० हजार कैद्यांचा समावेश होता.
या महामारीच्या प्रादूर्भावामुळे सन १९१४ पर्यंत बरेच डॉक्टर्स आणि सैन्यदल देखील प्रभावी झालेले होते. उवांमुळे हा प्रादूर्भाव होतो आहे या निष्कर्षानंतर पश्चिमी आघाडीने सैन्याला या बाधेतून बरे करण्यासाठी डिलिव्हिंग स्टेशन्स उभारली. मात्र दूर्दैव एवढे भयंकर की या दुखण्याने डोके वर काढले ते पूर्व आघाडीवर.
भूतलावर जन्मास आलेला प्रत्येक सजीव आपल्या अस्तित्वासाठी झगडत असतो आणि या नियमाला जीवजंतू देखील अपवाद नसावे.
या महामारीचा मृत्यूदर १० टक्के त ४० टक्क्याच्या दरम्यान होता. सन १९१८ ते १९२२ या काळात रशियन नागरी युध्दादरम्यान जवळपास २ ते ३ करोड बाधित रुग्णांपैकी २० ते ३० लाख रशियन रुग्ण मृत्यू पावले होते.
याच टायफसने दुसऱ्या महायुद्धादरम्यान देखील डोके वर काढल्याची इतिहासात नोंद आहे. जर्मन सैन्याची या महामारीने नामुष्की तर केलीच परंतु १९४२-१९४३ दरम्यान फ्रान्स, उत्तर आफ्रिका, इजिप्त आणि इराणमधे देखील धुमाकुळ घातला. नाझी दलाचे कॅम्पस टायफसच्या प्रसारासाठी अधिक पोषक ठरले.
याच कॅम्पमधे आसऱ्यास असलेल्या अँन फ्रॅंकला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी प्राण गमवावे लागले होते. याच बाधेने तिची बहिण मार्गोट हिचा देखील अंत झाला.
रोजनिशी लेखिका असलेल्या आणि ज्यू संस्कृतीचा वारसा लाभलेल्या अॅन फ्रँक हिला प्रसिध्दी मिळाली ती मात्र तिच्या मृत्यू पश्चात! तिने लिहिलेली रोजनिशी ही एका हुकुमशाहीची आणि ज्यू जनतेवर होणाऱ्या पाशवी अन्यायाची एक ऐतहासिक साक्षीदार ठरली. मात्र काही इतिहास अभ्यासकांच्या मते या डायरीतील नोंदींचा गैरवापर देखील झाला. शेवटी संधीसाधू कोणत्याही घटनेतून आपली पोळी शेकणारच!
टायफसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी फ्रॉन्स आणि जर्मन अभ्यासकांनी काही लसी विकसीत केल्या होत्या. मात्र प्रादूर्भाव ज्या गतीने वाढत होता त्या गतीने फ्रेंच लसीचे उत्पादन होणे अशक्यप्राय होते. तसेच फ्रेंच लसीची विश्वासार्हता देखील फार कमी होती. जर्मन लस बाधित व्यक्तीच्या लघवीपासून तयार करण्यात आलेली होती आणि ती कैद्यांना प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आलेली होती.
हा सगळा खटाटोप मात्र प्रभावीपणे यशस्वी ठरलेला नव्हता. पुढे नेपल्स मधील संशोधनातून असे निष्कर्षास आले की नुकत्याच शोध लागलेल्या डिडिटीच्या वापरातून उवांचा नायनाट करता येतो, ज्या टायफसच्या मुख्य वाहक असतात.
शोकांतिका की अशा महामारीच्या काळात हुकुमशाही आणि साम्राज्यवादामुळे कित्येक अनमोल रत्न मानवी संस्कृतीने गमावले. त्यापैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले आणि दुसऱ्या माझ्या आवडत्या लेखिका अॅन फ्रँक!
क्रमशः...
– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.