दोस्तांनो, मागील भागात आपण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान पसरलेली महामारी, हुकूमशाही आणि भुकमारीमुळे झालेले कैद्यांचे आणि सैनिकांचे हाल आणि यातूनच अॅन फ्रँक या अत्यंत भावनाशील लेखिकेचा करुण अंत यावर प्रकाश टाकला.
एशियन फ्लू हा विषमज्वराचा एक भयंकर प्रकार ज्याने सन १९५७ आणि त्या दरम्यानच्या काळात हाहाकार माजविला होता. दक्षिण चीन मधील गिझॉवमधून उदयास आलेला हा विषाणू एच. टू. एन. टू. प्रकारातील होता. या महामारीने जगातील जवळपास १० ते ४० लाख लोकसंख्या कालवश झाली होती. नोंदविलेल्या आकड्यांमधली तफावत हे सांगते की त्या त्या राष्ट्रांच्या प्रशासनाने आकडे लपविण्याचा प्रयत्न केलेला असावा.
गिझॉवमधील या विषाणूचा प्रादूर्भाव पूढे युनान आणि आसपासच्या प्रांतात पसरला होता. त्यावेळी चीन जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य राष्ट्र तर नव्हतेच परंतु चीनने आसपासच्या इतर राष्ट्रांना या महामारी बद्दल कळविण्याची तसदी घेतल्याची कोणतीही नोंद नाही.
संयुक्त राष्ट्राच्या सी.टी.सी. अर्थात ‘सेंटर फॉर डीसिज कंट्रोल अँड प्रिवेंशन’ या संस्थेने सदर महामारीचा अभ्यास करत ही महामारी सर्वप्रथम फेब्रुवारी १९५७ साली हाँगकाँग येथे आढळून आल्याचे सांगितले होते. याच विषमज्वराच्या दुसऱ्या लाटेने उत्तर चीनचा ग्रामीण भाग ग्रासला गेलेला होता.
तत्कालीन चीन प्रशासनाने सी.एन.आय.सी. अर्थात ‘चायनीज नॅशनल एन्फ्ल्यूइंझा सेंटर’ ची स्थापना केली. सदर संस्थेने सन १९५८ मधे या विषाणूवर पुस्तिका प्रकाशित केली होती. दिनांक १७ एप्रिल १९५७ रोजीच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रातून, “हाँगकाँग मधील हजारो नागरिक इन्फ्ल्यूइंझाने बाधित” ही बातमी छापून आली. या नवीन फ्लूचा सिंगापूरमधे देखील प्रादूर्भाव पसरला होता ज्यात मे १९५७ च्या मध्यापर्यंत जवळपास ६८० नागरिक मरण पावले होते आणि यामुळेच या बाधेची जागतिक आरोग्य संघटनेस अधिकृत माहिती देणारे सिंगापूर हे पहिले राष्ट्र ठरले होते.
तदनंतर जून १९५७ च्या मध्यात या ज्वराने भारतात प्रवेश करत लाखो रुग्णांना बाधित केले आणि जूनच्या शेवटास ग्रेट ब्रिटनवर हल्लाबोल केला . या विषाणूमुळे शालेय विद्यार्थी आणि प्रौढ व्यक्ती बाधित व्हायचे ज्यात त्यांची प्रतिकार क्षमता क्षीण व्हायची.
‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या हाँगकाँगमधील विषाणूमुळे ग्रस्त असलेल्यांच्या छायाचित्रांमुळे सूक्ष्म जैवविज्ञान अभ्यासक मॉरिस हिलमन सून्न झाले आणि त्यांनी जपानमधील अमेरिकेच्या नौदलाच्या डॉक्टरांकडून व्हायरसचे नमुने घेतले. सार्वजनिक आरोग्य सेवेने १२ मे १९५७ रोजी लस उत्पादकांना विषाणूचे नमुने हस्तांतरित केले आणि जुलैच्या अखेरीस फोर्ट ऑर्डर आणि लोरी एअर फोर्स बेसमध्ये लस चाचणीसाठी उपलब्ध करण्यात आली होती.
लसीचे पर्याप्त उत्पादन होऊन ती सामान्यांपर्यंत पोहोचेस्तोवर इंग्लंड आणि वेल्स मधील जवळपास ६०० नागरिक मरण पावले होते तर अमेरीकेतील जवळपास १० लाख बाधित मृत्यूच्या खाईत लोटले गेले होते. मात्र मॉरिस हिलमन यांच्या लसीने पुढे हजारो नागरिकांना जीवदान दिले असे तत्कालिन नोंदी सांगतात.
एशियन फ्लूचा स्ट्रेन एच.टू.एन.टू. चे संयुग असून ते पक्षातून मानवात आले असावे असे एका अभ्यासाअंती निष्कर्षास आले. या महामारी संदर्भात अमेरीकन सी.डी.सी. चे आकडे धक्कादायक असून त्यानुसार जवळपास ७० हजार ते १ लाख १६ हजार अमेरिकन मृत्यूच्या पडद्याआड लोटले गेले. तर १९५७-५८ दरम्यान ब्रिटन मधील जवळपास ३३ हजार रुग्ण मरण पावले.
त्याच दरम्यान जर्मनीत देखील या विषाणूच्या बाधेमुळे जवळपास ३० हजार बाधित मृत्यूमुखी पडले.
अलिकडचे, म्हणजेच सन २०१६ चे एक संशोधन ‘द जर्नल ऑफ इन्फेक्शीअस डिसीजेस’ असे सांगते की या विषमज्वराचा सर्वाधिक मृत्यूदर लॅटीन अमेरिकेत होता.
एका दशकानंतर याच ज्वराने पुनःश्च डोके वर काढले होते जो ‘हाँगकाँग फ्लू’ नावाने ओळखला गेला. याबद्दल पुढे चर्चा होईलच.
मित्रांनो, आजही हिलमन सारखे अभ्यासू मनोवृत्तीचे संशोधक आहेत हे आपले मोठया संकटातही सुदैवच. लवकरच सर्वांचे लसीकरण होईल अशी आशा करूयात. पण तोवर आणि त्यानंतर देखील आपण आपल्या स्वास्थाची काळजी घेऊत आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या!
क्रमशः……
– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.