“सोने की सुई,
रूपे का धागा”
‘नामा’ का चित्त,
‘हरी’ में लागा !!
संत नामदेव यांनी सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका आणि वारकरी संप्रदायाची भक्ती चळवळ थेट पंजाब पर्यंत नेली. त्यातूनच महाराष्ट्र व पंजाब यांचे अनोखे नाते तयार झाले.
संत नामदेवांची पदे पंजाबी माणूस अत्यंत भक्तीभावाने गातो. किंबहुना संत नामदेवांच्या पद, अभंगांचा समावेश गुरूबाणीत केला आहे. ही फार मोठी थोरवी आहे.
हा वारसा केवळ संत साहित्या पुरताच मर्यादित नाही तर तो भगतसिंग-राजगुरु यांच्या त्याग व बलिदानापर्यंत जाऊन पोहोचतो.
“सोने की सुई ….या नामदेवांच्या रचनेचा संदर्भ पाहता विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या संत नामदेवांनी शिलाईचे जे काम केले ते केवळ वस्त्रापुरते मर्यादित नाही तर त्यांनी मराठी-पंजाबी समाजाला एका धाग्यांत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.
८८ वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब मधील घुमान येथे २०१५ मध्ये पार पडले. तेव्हा पासून संत नामदेव आणि घुमान या विषयी माझ्या मनामध्ये मोठी उत्सुकता होती. त्या उत्सुकतेनं आम्ही मैत्रिणी नानक साई फाऊंडेशन तर्फे गेल्या महिन्यात आयोजित घुमान यात्रेत सहभागी झालो.
याला घुमान यात्रा असे जरी म्हटले जात असलं तरी आमच्यासाठी संत नामदेवांची ही घुमान वारी होती. या वारीचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील अतूट भाईचारा, सेवाभाव, श्रद्धा व भक्तीभाव अनुभवला.
वारी म्हटले की डोळ्यासमोर पायी जाणारे वारकरी
दिसतात. श्रद्धा, भक्ती, समता, विठ्ठल भेटीची ओढ, संसार तापापासून दूर होऊन टाळ, भजन-किर्तन, रिंगण यात तल्लीन झालेला वारकरी दिसतो. ते सुख या घुमान वारीत आम्हाला अनुभवता आले नाही तरी एक आत्मिक समाधान मात्र निश्चितच लाभले.
या वारीच्या निमित्ताने जेष्ठ साहित्यीक डाॅ.भगवान अंजनीकर, प्रकाशक दत्ता डांगे सर, प्रा.राजेश मुखेडकर, निवृत्त पोलीस उपअधीक्षक बालाजी सोनटक्के अशा मान्यवरांचा परिचय झाला. नांदेडच्या माजी महापौर श्रीमती मंगला ताई निमकर, माजी नगरसेविका सौ.जया तोडकरी, सौ.चंदा हळदे, सौ.सुरेखा भालके, रत्नमाला, सौ.नीता पतंगे, विजया विष्णुपुरीकर, प्रा.सुरेखा घोगरे मॅडम अशा ऑल राऊंडर मैत्रिणींशी तर छान दोस्ती झाली. डाॅ. नंदिनी चौधरी मॅडम, डाॅ.पुरणशेट्टीवार, डाॅ.अनिता पुदरोड यांच्याशी असणारे नाते अधिक घट्ट झाले.
मी आणि प्रेमला होनराव आम्ही दोघीही ही वारी विसरू शकणार नाही.

नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा संत नामदेव घुमान यात्रेचे मुख्य संयोजक श्रीयुत पंढरीनाथ बोकारे सरांचे आभार मानावे तितके कमीच आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र – पंजाब दरम्यान असलेल्या स्नेह संवर्धनाची प्रचिती येऊ शकली. शीख बांधवांचे आदरातिथ्य, अगत्यशीलता व सेवाभाव अनुभवता आला. संत नामदेवांची ७५२ वी जयंती साजरा करण्याची संधी मिळाली. सरांचे एकूणच नियोजन, संघटन कौशल्य, क्षमता व कठीण प्रसंगी मदतीची तत्परता वाखाणण्याजोगी आहे. नानक साई फाउंडेशनचे कार्य उत्कृष्ट आहे.

श्री बोकारे सरांना नुकताच पंजाबच्या सहारा क्लबचा “मानव सेवा” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. घुमानची वारी अखंड चालत राहो हीच सदिच्छा !!!

– लेखन : डाॅ. प्रभा वाडकर, लातूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800