महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे साहित्यिकांना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल आणि उत्तम लिखाणाबद्दल साहित्य पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या योगदानाची माहिती आपण पहिल्या भागात घेतली आहे.
आजच्या दुसऱ्या भागात सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार मिळालेल्या कार्यकर्त्यांची माहिती घेऊ या.
परिवर्तनाच्या चळवळीतील कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याच्या आधारावर सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार विजेते ठरविले जातात. मोठ्या शहरातच नव्हे तर तालुक्यात, गावात, अगदी खेड्यातही असे सामाजिक कार्यकर्ते काम करत असतात. तसेच संस्था देखील सामाजिक कार्य करीत असतात. त्यांना प्रसिद्धीची मुळीच हाव नसते. पण महाराष्ट्र फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यांची नावे निवड समितीकडे जातात. त्यांच्या कामाचे समाजासाठी असलेले महत्त्व ओळखून पुरस्कार दिले जातात.
अर्धा भारत खेडेगावात राहतो. गावाच्या विकासासाठी सरकारी योजना असतात. पण त्यांचा सर्व लाभ सर्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचतोच असे नाही. कुठे सकस अन्नाचा अभाव आणि दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्याही दिसतात. आपल्या समस्या कशा सोडवायच्या याबाबत गावकऱ्यांना प्रशिक्षणही नसते. ही परिस्थिती पाहून महाराष्ट्र फाउंडेशनने गावांच्या विकासासाठी पंचम ही योजना आखली आहे.
महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव यांनी सांगितल्याप्रमाणे पंचम हा प्रकल्प समस्यांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक गावांसाठी सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र फाउंडेशन गावातील शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्त्री सबलीकरण आणि गरिबी निर्मूलन याबाबत प्रशिक्षणाची सोय करते आणि गावातील सामूहिक प्रकल्पासाठी मदत करते.
महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या पुढील संस्था व कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले गेलेत.
ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (AIPSN):
समाजाच्या प्रगतीसाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक असते. देशाच्या राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्पष्ट उल्लेख आहे हे बऱ्याच नागरिकांना माहीतही नसतं. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे हे त्यात एक कर्तव्य म्हणून नोंदलेले आहे.
ऑल इंडिया पीपल्स नेटवर्क हे भारतभरातील लोकविज्ञान संघटनांचे नेटवर्क आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सार्वत्रिकरण करण्याच्या कामात यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या काळात याचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र फाउंडेशनने AIPSN म्हणजे ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार दिलेला आहे.
प्रमोद झिंजाडे :
महाराष्ट्राला पुरोगामी म्हणवत असताना आपण जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बहुजन समाजातील महिलांची स्थिती पाहिली तर महाराष्ट्र किती मागासलेला आहे हे कळेल.आजही विधवा महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे, नव्हे त्यांना त्यांच्या काही हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे.
खेडोपाडी स्त्री विधवा झाल्यावर तिचे अलंकार हिसकावून घेणे, तिला साधी वस्त्रे घालायला लावणे, सार्वजनिक समारंभांपासून तिला वंचित ठेवणे अशा प्रथा सर्वांच्या अंगवळणी पडल्या आहेत.
वास्तविक स्त्री विधवा झाली तर त्यात तिचा स्वतःचा काय दोष असतो ? जिचा नवरा गेला आहे,तिला प्रेमाने वागविण्याऐवजी कामाला जुंपून तिचा छळच केला जातो. या साऱ्याविरुद्ध आता कायदाच करायची वेळ आलेली आहे असे सांगलीतील प्रमोद झिंजाडे या समाज कार्यकर्त्याला वाटले आणि त्याने आपले कार्य सुरू केले.
आता 2022 मध्ये आपण कोरोनाचे थैमान पाहिले. कोरोनाने गरीब, श्रीमंत, सुशिक्षित काही न पाहता एकेका घरावर हल्ला करीत माणसांना गिळले. कितीतरी घरातील बायका विधवा झाल्या. कुणा मुलांचे आईबाप गेले. या महामारीच्या दिवसात राज्यात ठिकठिकाणी गोरगरीब कष्टकऱ्यांना अन्नधान्य, आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याची मोहीम झिंजाडे राबवत होते. या काळात विधवा झालेल्या महिलांचे होत असलेले हालही त्यांच्या नजरेस पडले.

पुढे कोरोनाचे संकट ओसरल्यावर एका गंभीर विचारातून त्यांनी ‘विधवा महिला सन्मान संरक्षण कायदा अभियान’ या नावाने व्हाट्सअप ग्रुप बनवला आणि नव्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीस प्रारंभ केला. ग्रामीण भाग पिंजून काढला. अनेक संस्थांशी संवाद करून गावात विधवा महिलांना माणूस म्हणून सन्मान मिळवून दिला. विधवा प्रथा बंद करण्यासाठी अनेक गावात ठराव झाले. याबाबत कायदा व्हावा म्हणून सरकारलाही ते साद घालत आहेत. प्रमोद झिंजाडे यांना त्यांच्या समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला.
नंदिनी जाधव :
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात झोकून देणाऱ्या नंदिनी जाधव यांनी जट निर्मूलनाचे मोठे कार्य केले आहे. महाराष्ट्रात जट निर्मूलन, देवदासी प्रथेला विरोध आदी समाज सुधारण्याचे काम स्वातंत्र्य काळापासून केले जात आहे.
नंदिनी जाधव 2012 पासून हे काम धडाडीने करीत आहेत. स्त्री, अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी कायदा या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यात 2000 पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. जादूटोणा कायद्याच्या प्रसारासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या. बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला.
डोक्यात जट आलेल्या मुलींना देवदासी म्हणून सोडले जाते हे त्यांना कळले. तशा केसेस येऊ लागल्या. मग तेथे जाऊन भेटणे, कुटुंबातील लोकांना समजावणे, प्रसंगी वर्ष दोन वर्षे लागली तरी पाठपुरावा करणे, त्या मुलींवर औषधोपचार करून घेणे हे सारे करून त्या महिलेस जट ठेवण्यापासून आणि देवदासी होण्यापासून मुक्ती देणे हे मोठे कार्य त्यांनी केले आहे.

कंजारभाट समाजात नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची चुकीची प्रथा आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी नंदिनी जाधव यांचे योगदान आहे. सामाजिक बहिष्कृत कायदा, जादूटोणा विरोधी कायदा याचा प्रचार व प्रसाराचे काम करणे व कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्याबाबत पोलीस तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई होण्यास पाठपुरावा करणे आदि कामे नंदिनी जाधव करत आहेत.
नंदिनी जाधव यांना प्रबोधनासाठी असलेला कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला.
शांताराम पंदेरे :
शांताराम मूळचे रत्नागिरीचे. पुढे मुंबईत स्थायिक झाले. रुईयात शिकले. भूमिहिन, आदिवासी, गायरान जमिनी, जाती निर्मूलन, महिलांचे अधिकार, हमाल, मापारी, शेतमजुरांचे प्रश्न, रोजगार हमी अशा महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेच्या प्रत्येक ज्वलंत प्रश्नावर शांतारामने राजकीय वैचारिक भूमिका घेत राजकीय व्यासपीठावरून संघर्ष आणि संघटनात्मक काम केले आहे. अशा प्रश्नांवर महाराष्ट्रात झालेल्या पक्ष संघटनांच्या आंदोलन आघाड्यांचे नेतृत्व शांताराम यांनी केले आहे.
शांताराम व त्यांच्या पत्नी मंगल गेली २० वर्षे
‘भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्था’ ही विकासात्मक कामे आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था चालवत आहेत.
शांताराम यांनी सुमारे अकराशे कुटुंबांना पंधराशे एकर गायरान जमीन आणि 375 भूमिहिन आदिवासी कुटुंबांना 800 एकर वन जमीन मिळवून दिली आहे. शिवाय या सात बारा वर बायकोचे नावही लावले आहे.

सुमारे 35 हजार भिल्ल, ठाकर, पारधी, आदिवासी यांना जात प्रमाणपत्रे मिळवून दिली आहेत.
शांताराम पंदेरे यांना महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे समाजकार्यासाठी असलेला विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
कुमारीबाई जमकातन :
गडचिरोली भागात काम करणाऱ्या कुमारीबाई जमकातन यांचे नाव आता सर्व दूर पसरलेले आहे. त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
गडचिरोलीमध्ये लोकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने जंगलावर आधारित आहे. अनेक सुशिक्षित लोकांच्या संपर्कातून आणि अभ्यास मंडळातून त्यांनी आदिवासी स्वशासन, जंगल संरक्षण, पैसा कायदा, अशा अनेक जल-जंगल-जमीन संदर्भातील कायद्यांचा अभ्यास केला आहे.
महिलांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याच्या कामातही त्या आघाडीवर आहेत. 2005 मध्ये कोरची ग्रामपंचायतमध्ये कागदपत्रात पतीबरोबर पत्नीचे ही नाव घरमालक म्हणून नोंदवण्यात आले. हे त्यांना मिळालेले मोठे यश आहे.

कुमारीबाई आता फक्त गडचिरोली जिल्ह्यापर्यंत किंवा कोरची पर्यंत मर्यादित राहिल्या नाही, तर ‘मकान’ म्हणजे ‘महिला किसान अधिकार’ या संस्थेत देश पातळीवर अनेक ठिकाणी महिलांच्या अधिकारांबद्दल त्या अधिकारवाणीने मांडणी करत आहेत.
कुमारीबाई जमकातन यांना महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांच्या संघर्षाबद्दल कार्यकर्ता पुरस्कार दिला आहे.
हे सारे पुरस्कार एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचे आहेत.
या पुरस्कारांमुळे महाराष्ट्र फाउंडेशन समाजात काही आदर्श घालून देत आहेच शिवाय ही कार्ये करणाऱ्या मंडळींना अधिक जोमाने कार्य करण्याची स्फूर्ती देत आहे.
समाप्त.

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800