१. प्रतिज्ञा
मराठी भाषेला “अभिजात भाषेचा दर्जा” मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रतिज्ञा करु या…
“महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्रचा आहे,
मराठीत बोलणारे सारे माझे बांधव आहेत,
माझ्या महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर माझे प्रेम आहे,
मराठी भाषेतल्या समृध्द वाड्:मयाचा मला अभिमान आहे,
मराठी भाषेची ध्वजा जगभर फडकवण्याचा मी प्रयत्न करीन,
मराठी शिकवणाऱ्या व शिकणाऱ्या सर्वांचा मी मान राखीन,
मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाशी मी सौजन्याने वागेन,
मराठी भाषा संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे,
मराठी भाषेला “अभिजात दर्जा” मिळण्यासाठी मी प्रयत्न करीन,
मराठी भाषेची समृद्धी व वृध्दी यात माझे सौख्य सामावलेले आहे.
– रचना : दिलीप गडकरी. कर्जत -रायगड
२. महाराष्ट्र माझा
माझ्या महाराष्ट्राची जपतो आम्ही आन,बाण,शान
माझ्या महाराष्ट्राचा मला लक्ष लक्ष अभिमान
मोडेन पण वाकणार नाही जरी असे आमचा बाणा
तरी थोरवी पुढे नतमस्तक होती आमच्या माना
माझी मराठी ही भूमी थोर संत महंतांची
शिकवण आम्हा मराठी मना वारकरी पंथाची
श्वास माझ्या महाराष्ट्राच्या मराठी बोलीचा
अवघा मुलुख माझा इंद्रायणीच्या चालीचा
पायी इथल्या चांदण्याचे चाळ, हाती थाप डफाची
पोवाड्यातून शाहीर गातो कीर्ती शौर्याची
रानावनातून इथल्या वाहती वारे मराठी उषेचे
वाऱ्यासवे छेडीत तान गातो गान गुणवंतांचे
स्वाभिमानाची भगवी मशाल आमच्या राजा शिवबाची
मातृभूमीच्या कटीला धार महाराष्टीय तेजाची
जन्मोजन्मी पोटी यावे या मराठी मातीच्या
गंध शरीरास लाभो माझ्या मातृभूमीचा
– रचना : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
३. कामगारांच्या व्यथा गाथा कथा !
१३७ व्या आंतरराष्ट्रीय,
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
आली कोरोनाची साथ
झाले वातावरण गंभीर
सरकार म्हणे, घरात रहा
खाऊन बना खंबीर
असो सरकारी
असो खाजगी
पण नोकरी
असते नोकरी
श्रीमंत असो
की गरिब
त्याला खावी
लागते भाकरी
काम कोणतंही असो
नसावे त्यास
कोणती तोड
पगाराची वाट
पाहताना वाटे
असावी दुसरी
कमाईचे जोड
घरच्यांची इच्छा
पुर्ण करताना
मनाला घालावी
लागते आवर
वाढत्या महागाईत
पैसा नसेल तर
भल्याभल्यांची
कमी होते पॉवर
कामगार कामावर
असे तेव्हा
तेव्हा वाढते हिंमत
जेव्हा हाताला नसे काम
तेव्हा नसे किंमत
करुया शेवट पर्यंत कष्ट
कष्ट कष्ट आणि कष्ट
– रचना : विलास देवळेकर. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800