आपले भारतीय सण मूळ स्वरूपात कसे साजरे केले जातात, त्यांचे महत्व काय ? या विषयी मजकूर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने विविध पौर्णिमांचे महत्व, वैशिष्टय सांगणारे स्वाती दामले यांचे दीर्घ काव्य पुढे सादर करीत आहे. स्वाती ताईंचे मन:पूर्वक आभार.
– संपादक
लालस लोभस सूर्यबिंब पाहूनी हरखला सान
झेप घेऊनि उंच उडाला गगनी हनुमान
बाल रवीचे रक्षण करण्या वज्र फेकिले इंद्राने
‘हनुमान जयंती’ अशी साजरी केली ‘चैत्री पुनवेने’
सत्य, त्रेता, द्वापार उलटले, कलीयुग अवतरले अवनी
विवेक, सत्शील, विनयबुध्दिही लयास गेली या भुवनी
अंदाधुंदी, कर्मकांड अन् अशांततेस ना उरे सीमा
‘वैशाखी पुनवेस’ बुध्द तो शांतीदूत आला जन्मा
अखंड जीवन वटवृक्षाचे साक्षी त्याला ठेवूनिया
मर्त्य मानवा जीवित करण्या वर मागितला जिने यमा
‘तथास्तु’ म्हणता सावित्रीला सत्यवान उठुनि बसला
वटपूजेचा मान मिळे मग, ‘ज्येष्ठामधल्या पुनवेला’
मातापितरांसवे देतसे गुरु जीवना आकार
कलागुणांचा विकास करिता स्वप्ने होती साकार
समाजास या ज्ञान देऊनि सन्मार्ग दाविती व्यासमुनी
‘आषाढातील पुनव’ वाहते पुष्पांजली सद् गुरूचरणी
तृप्त जाहली धरणीमाता अमृतास प्राशन करूनि
शांत जाहला तसाच सागर आकांडतांडव ते करूनि
धीवर सारे पूजन करिती अर्पिती श्रीफल भक्तिने
‘ नारळी पूनम ‘करिती साजरी श्रावणात अति प्रेमाने
रेशमी धागे गुंफण करिती घट्ट वीण ती नात्याची
सुंदर राखी प्रतीक आहे बंधुभगिनी प्रेमाची
द्रौपदीस तो कृष्ण सखा अन् सैनिक बंधु देशाला
‘राखीपौर्णिमा’ करू साजरी बांधुनिया त्या राखीला
अश्र्विनात ते शुभ्र चांदणे शीतलता पसरित जाई
तेजस्वी शशी पूर्ण रूपाने दिमाखात गगनी येई
स्वागत करितो सागर त्याचे शुभ्र फेन तो उसळूनिया
प्रश्न शिवाचा ‘को जागर्ति’ ऐका लक्ष देऊनिया
दीपोत्सव पृथ्वीवर शोभे तशी दिवाळी नभांगणी
उत्फुल्ल तेजोमय बिंबाचे तेज फाकले धरांगणी
त्रिपुरसुराला मारिताचि ही पृथ्वी भयमुक्तचि झाली
त्रिपुरज्योतींनी गोपुर सजता ‘ कार्तिकीपूनम ‘ शुभ झाली
ब्रह्मा, विष्णू, महेश यांची दत्तगुरू ही त्रैमूर्ती
गुरुमाऊली प्रसन्न होता सा-या भवचिंता हरिती
अनुसूयेच्या योगबलाने दत्तगुरू जन्मा आले
‘मार्गशीर्ष पौर्णिमा’ तिथिला अघटित सारे हे घडले
सरता वर्ष आली फागुनी ‘हुताशनी’ ही म्हणती तिला
राग, लोभ, द्वेषांना जाळून हेवेदावे विसरू चला
उषा फुलावी सुखाशेची अन् रात्र सरावी दुःखाची
हीच प्रार्थना तुला होलिके राख करी तूं पापांची
वर्षभरातील अशा पौर्णिमा वैशिष्ट्ये घेऊन येती
सोहळ्यातचि रंगून जाता प्रसन्नता चित्ता देती

– रचना : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अभ्यास पूर्व लेख धन्यवाद न्यूज टुडे संपादक साहेब