Wednesday, February 5, 2025
Homeलेखमहिला दिनाच्या निमित्ताने.....

महिला दिनाच्या निमित्ताने…..

महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन
म्हणून साजरा केला जातो.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिन १९४३ साली साजरा झाला.१९७१ साली आठ मार्चला एक, महिला संघटन, समस्या निवारण, सुरक्षितता असे मूलभूत प्रश्न घेऊन पुण्यात, एक व्यापक असा मोर्चा काढला होता.

पुढे १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून युनोने जाहीर केले.आणि त्यानंतर स्त्रियांच्या समस्या
ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी येऊ लागली.

बदलत्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार स्त्रियांच्या समस्या, प्रश्न ही बदलत गेले. जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मूळ हेतु, महिलांचे अधिकार जपणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे हाच आहे.

या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता, या महिला दिनी, एक स्त्री म्हणूनच नव्हे, एक जागरुक, सामाजिक भान असणारी व्यक्ती म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न ऊभे राहतात.
स्त्रीवाद म्हणजे ढोबळमानाने असे मानले जाते की पुरुषांविरुद्धची चळवळ.मात्र स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचार प्रवाह.
वास्तविक आपल्या संस्कृतीत
।।यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।।
ही विचारधारा आहे.

आपले अनेक सण स्त्री शक्तीचा जागर करतात. पण मग मखरात पूजल्या जाण्यार्‍या या स्त्री शक्तीचे प्रत्यक्ष समाजातले स्थान सुरक्षित तरी आहे का ? तितकेच पूजनीय आहे का ?
समानतेची वागणूक खरोखरच तिला मिळते का ?
“मुलगी झाली” म्हणून तिच्या जन्माचा सोहळा होतो का ? ती गृहित, ती दुय्यम हे तिच्या जीवनाचं पारंपारीक स्टेटस पूर्णपणे बदलले आहे का ?
जेव्हां “मीटु” सारखी अंदोलने घडतात, हाथरस सारख्या घटना वेळोवेळी वाचायला मिळतात, तेव्हां वरील सर्व प्रश्नांची ऊत्तरे संपूर्णपणे सकारात्मक मिळत नाहीत हे दु:खं आहे.

महिला दिनी, महिला शिक्षणासाठी जीवन समर्पित करण्यार्‍या पूज्य सावित्रीबाईंचे स्मरण होईल. अनेक पौराणिक, ऐतिहासिक, ऊंबरठा ओलांडून जगलेल्या विसाव्या, एकविसाव्या शतकातील, सर्व स्तरांवर, सर्व क्षेत्रांत ऊच्च स्थानी पोहचलेल्या महिलांची गौरवाने नावे घेतली जातील…
पण म्हणून स्त्रीच्या आयुष्यातला संघर्ष संपला असे म्हणू शकतो का ? गुलामगिरीच्या जोखडातून ती पूर्ण मुक्त झाली असे सामाजिक चित्र आहे का ?
पुन्हा ऊत्तर नाईलाजाने नकारात्मकच….

परवाच माझी एक अत्यंत सुविचारी, समंजस, कुटुंबवत्सल, नाती जपणारी मैत्रीण सासुच्या भूमिकेत सुनेविषयी सांगताना म्हणाली..”अग ! शांभवीचं घरात लक्षच नसतं..सदा आॅफीसच्या मीटींग्ज, करीअर, पैसा, प्रमोशन्स घरासाठी वेळच नाही. मुलांसाठी वेळच नाही.. काही सण, रिती, सोहळे परंपरा कश्शाची पर्वा नाही.वेळच नसतो तिला..

आज मुलं सगळं स्वत:चं स्वत: करतात, सगळ्यांची वेळापत्रकं सांभाळली जाताहेत…पण ऊद्या मुलांना
आईबद्दल नेमकं काय वाटेल ग ? मायेचा सहवास नसेल तर या पीढीचं काय होणार ?”
तिचं हे भाष्य, हे प्रश्न ऐकल्यावर मी थक्क झाले !!. माझ्याकडे ऊत्तरं होतीही, नव्हतीही. तिला विचारावेसे वाटणारे प्रश्नही मनात ऊभे राहिले… पण प्रातिनिधीक स्वरुपातच मला शांभवी दिसली.

एका महत्वाकांक्षी पुरुषाच्या मागे स्त्री सर्वस्वाचा त्याग करून जबाबदारीने उभी असते, तेव्हांही ती दुय्यम स्थानांवर, आणि स्त्रीपणाचा ऊंबरठा ओलांडून चार पाऊले पुढे टाकते, तेव्हांही ती गौरवमूर्ती न बनता, समाजाच्या नजरेत अपराधीच !
हीच समस्या कालही होती आजही आहे…..!!
म्हणूनच आजच्या महिला दिनी स्त्री शक्तीचा ऊदो ऊदो करताना “जोगवा” मागायचाच असेल तर तो संपूर्ण सक्षमतेचा..स्वशक्तीचा, खंबीर बनण्याचा…
आत्मनिर्भरतेचा… निर्णयक्षमतेचा आणि त्याच बरोबर एक नवा जाणीव असलेला, समान दृष्टीकोन असलेला, अविकृत समाजबांधणीचा….
कारण, जरी चढलो असलो उंचावरी तरी पायर्‍या अजुन बाकीच आहेत.

राधिका भांडारकर

– लेखन : सौ. राधिका भांडारकर. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी