आज जागतिक महिला दिन आहे. त्या निमित्त वाचू या काही कविता.
विशेष म्हणजे ज्येष्ठ कवयित्री सौ निर्मला भयवाळ यांचीही कविता आपल्याला आज वाचायला मिळेल. त्यांचे एनएसटी परिवारात हार्दिक स्वागत आहे. महिला दिनाच्या आपल्याला मनःपुर्वक शुभेच्छा.
– टीम एनएसटी
१. महिला दिन
दरवर्षीच येत असतो
जागतिक महिला दिन
सर्वच जण करीत असतात उदोउदो
या दिवशी महिलांचा.
त्यांचे तोंडभरून कौतुकही होत असते
या एकाच दिवशी.
मात्र संपला हा दिवस की,
सर्वच जण सारे विसरून जातात
आणि पुन्हा
‘ये रे माझ्या मागल्या’
हीच म्हण पुढे येते.
खरंच जेव्हा सर्व पुरुषांचा
महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन असेल पवित्र
तेव्हाच खऱ्या अर्थाने होईल
जागतिक महिला दिन साजरा.
– सौ. निर्मला भयवाळ. छत्रपती संभाजीनगर
२. “स्त्री”ची वाटचाल
मायबापाची होते सोनुकली ,
बालपणाची ती भातुकली ,
म्हणूनच आठवायची थोडी थोडी ,
उर्वरित जीवन प्रवास करायचा ,
जीवनात आनंद फुलवायचा ॥१॥
मिळाली बक्षिसे विद्यार्जनी ,
कौतुक झाले होते जनी ,
जग जिंकणे ईर्षा मनी ,
निराशेतून आशेला जगवलं ,
जिद्दीने नशिबाला घडवलं ॥२॥
यौवनात होत्या आकांक्षा ,
पतीप्रितीची ती अभिलाषा ,
समान हक्कांची केली अपेक्षा ,
पदरी पडत होती उपेक्षा ,
तरी जीवनी नव्हती निराशा ॥३॥
गृहास्थाश्रमी केले पदार्पण ,
सर्वत्वाचे केले समर्पण ,
मिळेल त्यात समाधान मानले ,
आनंदाने जीवन फुलवले ,
कर्तव्यकर्माने सारे सोसले ॥४॥
वंशवृद्धीची वेळ आली ,
जीवघेणी यातना अनुभवली ,
स्त्रीसन्मानाची कसोटी दिली ,
बाळदर्शनी सार्थक मानले ,
त्यागातच स्व:जीवन झिजवले ॥५॥
बालवृद्धांची सेवा केली ,
शेगडीपासून देवडीतागत धावलो ,
केलं ! केलं ! असे नाही म्हणालो ,
मूकपणे गृहिणीधर्म जागलो ,
अन् तटस्थ जीवन जगलो ॥६॥
प्रौढत्वाची जोखीम आली ,
मुलाबाळांचे संगोपन केले ,
मायेच्या हातांनी गोंजारले ,
सर्वत्व ओतून प्रेम दिले ,
तनमन आता शीण झाले ॥७॥
कन्यादानाची वेळ येताच ,
पोटाची खळगी रिती केली ,
काळजात कळ ठुसठुसली ,
हुंदक्याना आतच दडवायचं ,
जावई नात्याला कुटुंबात जोडायचं ॥८॥
आला आयुष्याचा मध्यान्ही ,
व्याहीविहीणीची केली देणीघेणी ,
कितीही केले तरी वाटतील उणी ,
गोड बोलून सर्वांना जिंकलो ,
दुर्लक्षूण निरपेक्ष जीवन जगलो ॥९॥
संसाराचा सारीपाट खेळायचं ,
अखेर अंथरूणातच पायांना पसरायचं ,
मोह विसरून त्यागी व्हायचं ,
ओंजळीभरून दानधर्मी खर्चायचं ,
अन् अलिप्त जीवन जगायचं ॥१०॥
बघता बघता साठी आली ,
मुलांची राज्ये सुरू झाली ,
खटकल्या बाबींना टाळायचं ,
कुणी विचारलं तरचं सांगायचं ,
निवृत्त जीवन समाधानात जगायचं ॥११॥
दिसू लागेल पैलतीर ,
मनी दाटेल हूरहूर ,
भावनांना विवेकांनी आवरायचं ,
मोहपाश तोडून स्वर्ग गाठायचं ॥१२॥
– रचना : सौ. वर्षा भाबल.
३. ती वेगळी आहे
ती वेगळी आहे,
जणू तलवारीची धार,
ती वेगळी आहे,
जणू सौंदर्य, श्रृंगार,
ती वेगळी असते,
जेव्हा होते ती सीता, चंडिका, निर्दालूनी असूरी सत्ता,
ती बहीण होते, आणि मातेची उणीव पुसते
ती सहचरिणी होते, जन्मांची सोबत करते,
ती प्रेयसी होता,
जग गुलाबी असते,
ती राधा होता,
कृष्णास सखाही करते,
ती पेटून ऊठता, स्फुल्लिंग चेतवून जाते,
ती रणरागिणी होता, सारे जिंकून घेते,
ती म्हणते जेव्हा,
माझे कधी कुणाला,
मग प्रेमच देते,
जपते त्या ह्रदयाला,
जपणूक करा,
ती हळवी आहे फार,
तीज हवाच आहे,
प्रेमळ शुद्ध आधार,
ती माता आहे,
फुटतो तिजला पान्हा,
ती जन्मदात्री हो,
तो तिचाच आहे कान्हा
– रचना : हेमंत भिडे. जळगाव
४. तू आहेसच खास !
डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील
तेव्हा कळेल
तू खुप वेगळी आहेस
सर्व घरासाठी
तु खास आहेस
आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास
प्रवासात कधी वादळवारी
नकळत येईल
खोल दरी
तु आहेच खास
रणरागिणी तु
घरसंसार चालवतेस
उद्याचा सैनिक घडवतेस
घरची लढाई तु जिंकतेस
भारतमातेचा शुर शिपाई निर्मितेस
स्त्री जन्मा तुझी कहाणी
आई होऊन जन्म
देतेस नव्या जीवाला
सुंदर जग दाखवतेस
त्रिवार वंदन माते
तुझ्या चरणाला
सुग्रृहिणी तू आदर्श
अनेक नाती सांभाळतेस तारेवरची कसरत करतेस
खरचं तू
आहेसच खास
आई आज्जी
जाऊबाई वहिणी
किती नाती
तुला बहाल होती
संसारात, आनंद समारंभात
उत्साह भरून राहाती
प्रेम सुखाची
नदी भरून वाहती
स्त्री जन्मा तुझी महती
वर्णावी किती
बहिण लहान असो
वा मोठी
माया तिची वेडी
कधी बनते आई
दाखवी ममता बडी
परघरची कन्या
स्त्री बनून सोडते घर
सावरते सुखी परिवार
आदर्श अर्धांगिनी रूपात
सजविते सुंदर घरदार
एकदा स्वतःला न्याहाळून बघ
तु आहेसच खास
महिला दिनाच्या निमित्तानं करतात
तुझा सन्मान !!
– रचना : सुरेखा तिवाटणे. पुणे
५. ‘उपकार’..?
नसेन ..मी सुंदर
नसेल मला रूप
पण, नक्कीच नाही मी
चारचौघीत कुरूप.
नसेन…. मी मिळवले
शिक्षणात पुरस्कार.
पण…नक्कीच देऊ शकते मी
मुलामुलींना चांगले संस्कार.
नसेन….मी कमवत
खोके नी पेट्या.
पण…नक्कीच कमविते मी माझ्या पोटापाण्या पुरते.
नसेन…मी चांगली
चारचौघात हूशार
पण…नक्कीच आचार विचारात मी करीन
न दुखविण्याचा विचार.
नसेन…मी मिळवली
यशाची सोनेरी किनार
पण..नक्कीच कर्तृत्वाने, सामर्थ्याने करते आहे
स्वाभिमानाने संसार.
मी आहे ‘स्त्री’
मला सार्थ अभिमान.
मी नाही खपवून घेत माझा अपमान
नाही घेत मी ‘लाच’….
नाही होणार कधी
मी ‘लाचार’…
जगते आहे मी ‘स्वबळावर’…
मग का घेऊ मी
कुणाचे ‘उपकार’ ?
– रचना : पूर्णिमानंद. मुंबई
६. ‘ स्त्री चा जागर ‘
स्त्री जन्मा तूं नितांत सुंदर भासतसे हिरकणी
अष्टपैलूंनी लखलखणारी मनोहारी रमणी
कन्या, भगिनी, जाया,
माता विविध रूपे नटली
स्नुषा, भावजय, सखी, नणंदही अंतरी सामावली
महिमा शतकाशतकातूनी तव वनिते किती वर्णिती
दुर्गा, अंबा, उध्दरण्या जग स्वर्गातूनी प्रगटती
माया, ममता, प्रेम, करूणा दयार्द्र मन तव ते
संयम मर्यादांच्या म्यानी वीरश्री तळपते
पंचकन्यकांची नित करिती प्रभातीस वंदना
सतीसावित्री, तपस्विनी त्या स्वाभिमानी ललना
पराक्रमाने जिजा, अहिल्या, लक्ष्मी झळझळल्या
सुवर्णाक्षरे इतिहासाच्या पानावरी विलसल्या
वेदशास्त्रपारंगत असती विदुषी ललना त्या
राजसभापटु, राजकारणी, विजिगिषु विजया त्या
गगनाला घालीत गवसणी आजही त्या लढती
स्वयंप्रकाशित स्वकर्तृत्वे श्रेष्ठपदे भूषविती
देशभक्त, शास्त्रज्ञ, सुधारक जन्मा जी घालते
सृजनशील या वसुंधरेशी नाते ती जोडते
करूनी साधना, संस्कार, संस्कृति
जगात जी रूजवते
‘ स्त्री जन्मा ‘ चे म्हणुनी मजला अप्रुप किती वाटते
– रचना : स्वाती दामले
७. स्त्री
अनाथ जनाबाई झाली भगवंताधिन
संत पदास पोहोचली द्वैत संपवून !!ध्रु!!
दळण कांडण करणारी सदा राबणारी
तिचे सर्व काम करणारा पीतांबरधारी
मुक्त झाली सारे कर्म कृष्णार्पण करून !!1!!
नामदेव गुरु ज्ञानोबा संतांचा सहवास
स्त्री जन्म म्हणून न झाली कधी उदास
दासी झाली योगिनी आत्म उन्नतीतुन !!2!!
जनाबाईचे अभंग हृदयातील बोल
सहज सुंदर आशयगर्भ वाढे आत्मबल
परमार्थातील मिळवला तिने बहुमान !!3!!
जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा ! 💐💐💐
– अरुण गांगल. कर्जत -रायगड
८. झुगारता बंधने ही
आधुनिक नारी आहे मी
झुगारते ही बंधने सारी
झुरले, जगले अबला म्हणूनी
आता करते दुनियेची वारी.
अवकाशाला कवेत घेऊन
परी होऊनी उंच उडाले
गवसणी घालत नभो मंडली
ज्ञान साधना पुजूनी, घडले
भिती न आता मला तमाची
नारी झाले मुक्त युगाची
मनासारखे जगता जगता
चिंता करते मुलां, घराची
जोखड नाही परंपरेचे
बंधन नाही नात्याचे ही
खरा सोबती झाला नवरा
झुगारलेल्या बंधनात ही
– सौ.मानसी जोशी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
९.💃🏽 *महिला दिन* 💃🏽
आजची स्त्री आहे का
परिपुर्ण सबला नारी !!
सैनिक पोलिस शुर स्त्री
तरीही असुरक्षित घरी दारी !!
आई बाबाची सुंदर नाजुक
असते हि परि!!
रिती प्रमाणे संसार करते
परक्या घरी!!
पाळण्याची दोरी आहे हिच्या
करी!!
तरी सगळ्या कुटुंबाला सांभाळण्याची हिच्या वर जबाबदारी !!
महिला दिनाच्या तिला
आज मिळतील खुप शुभेच्छा!!
रोज कितीदा मनातच मारत
असते ती तिच्या छोट्या छोट्या ईच्छा!!
नको आहे तिला खोटी
सहानुभूती !!
स्वतः चे निर्णय घेण्याची
तिलाही द्या कधी तरी
अनुमती!!
सीता द्रोपदी आहिल्या
कितीदा देतील परिक्षा!!
शिक्षण हुद्दा ज्ञान हे सोडुन
नारी म्हणून करता तिची
उगाच उपेक्षा!!
चुकत तिही असेल कधी
पण न केलेल्या गुन्ह्याची
तिला भोगावी लागते
शिक्षा!!
आई बहिण लेक मैत्रिण
म्हणून नाही तर एक स्त्री
करा कधी तरी तिची
रक्षा!!
नको हो फार काही तिला
शिक्षीत स्वावलंबी कमावती
आहे आहे ती सबला!!
कौतुकाचे दोन शब्द बोला
नका बोलू सतत तिला अबला!!
नारी शिवाय नर नाही!
नरा शिवाय नारी नाही!
वाद हा काही सुटत नाही !
प्रेमा शिवाय वाद मिटत नाही!!
राधा मीरा सारखी हवी
असते सगळ्यांना सखी!!
पण कृष्ण सखा होऊन
कोणी ना तिची लाज राखी!!
दुर्योधन दुःशासना ची भरली
आहे सगळी कडे सभा!!
तुझा रक्षण करता डोळ्यावर पट्टी बांधून आहे लांब उभा!!
गर्भात असतानाच पोटावर
मारल्या कितीही लाथा!!
तरीही सर्व क्षमा करणारी
आहेस जननी तु माता!!
स्वीकारत आहे आता
तुला तुझा जन्म दाता!!
असाही येईल महिला दिन!!
जेव्हा नसशील तु हिन दीन !!
तुझ्या सौख्याची त्यांच्या
साथीने प्रगतीचे धागे तु विन !!
सगळ्या जगाची तु होशील
क्वीन!!
तुझ्या कष्टाचे फिटत आहे
थोडे थोडे ऋण!!
मनापासून आंनदाने साजरा
कर आज जागतिक महिला
दिन!!!!
जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्यांना खुप खुप आनंदी, उत्साही हार्दिक शुभेच्छा* 💐💐💐😍😍💃💃💃💃
तुमची मैत्रीण
– रचना : सौ.मंदा विजय शेटे. चेंबुर …..🙏😊
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800