जागतिक महिला दिनानिमित्त काही कविता आपण आज वाचू या. तर काही कविता उद्या वाचू या.
महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
१. कुळरक्षिता
शान घराची मुलगी
होता तुझे आगमन बाळे…
किती आनंदली
लेक धनाची ती पेटी
माझ्या कुशीत लाभली….
सृजनास दिली हाक
निसर्गाच्या नियमाने
असो भरलेली ओटी
निर्मितीच्या गं लेण्याने….
सासरची माहेरची
आहे कुळाची रक्षिता
होशी स्वामिनी गृहिणी
घर मंदिर करता….
पेर संस्कारांचं लेणं
तुझ्या येणा-या पिढीत
बळ देई मनगटी
लढण्यास संकटात…..
प्रेम मायेचा आधार
वात्सल्याचा तू सागर
शान घराची मुलगी
देई मायेची पाखर…..
अभिमान स्त्री जन्माचा
मनी जोपासून सदा
लेणं कर्तृत्वाचं तुला
तूच गृहाची संपदा….।।
— रचना : अरुणा दुद्दलवार
२. ‘स्त्री शक्तीचा जागर‘
स्त्री जन्मा तूं नितांत सुंदर भासतसे हिरकणी
अष्टपैलूंनी लखलखणारी मनोहारी रमणी
कन्या, भगिनी, जाया, माता विविध रूपे नटली
स्नुषा, भावजय, सखी, नणंदही अंतरी सामावली
महिमा शतकाशतकातूनी तव वनिते किती वर्णिती
दुर्गा, अंबा, उध्दरण्या जग स्वर्गातूनी प्रगटती
माया, ममता, प्रेम, करूणा दयार्द्र मन तव ते
संयम मर्यादांच्या म्यानी वीरश्री तळपते
पंचकन्यकांची नित करिती प्रभातीस वंदना
सतीसावित्री, तपस्विनी त्या स्वाभिमानी ललना
पराक्रमाने जिजा, अहिल्या, लक्ष्मी झळझळल्या
सुवर्णाक्षरे इतिहासाच्या पानावरी विलसल्या
वेदशास्त्रपारंगत असती विदुषी ललना त्या
राजसभापटु, राजकारणी, विजिगिषु विजया त्या
गगनाला घालीत गवसणी आजही त्या लढती
स्वयंप्रकाशित स्वकर्तृत्वे श्रेष्ठपदे भूषविती
देशभक्त, शास्त्रज्ञ, सुधारक जन्मा जी घालते
सृजनशील या वसुंधरेशी नाते ती जोडते
करूनी साधना, संस्कार, संस्कृति जगात जी रूजवते
‘स्त्री जन्मा’ चे म्हणुनी मजला अप्रुप किती वाटते.
— रचना : स्वाती दामले.
३. महती स्त्री ची
महिलादिनी सक्षम होऊ लढू दिनरात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात ॥धृ.॥
जनजागृती घडवू सारे नारी हृदयात
नाना संकटे धावुनी येती नारी जीवनात
घरची राणी स्वाभिमानी लढे दिनरात
चला ग सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात |१|
प्रेमापोटी जिंकुनी घेई सदा गणगोत
दिन उगवता कामावर जाई चिंता मनात
अन्नपूर्णा भोजन बनवी प्रेम ओते त्यात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात |२|
कोमलकांता, सृजनशक्ती विश्वा घडविते
नराधमांना धडा शिकवण्या रणरागिणी होते
नारी तूची नारायणी असशी या जगतात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात |३|
उंच उडुनी घाले गवसणी
झाली विश्वाची रमणी
नवे संकल्प हातात अन् प्रगती विज्ञानात
चला गं सख्यांनो फेर धरू या स्त्री महती गात
महिलादिनी सक्षम होऊ लढू दिनरात |४|
— रचना : शोभा कोठावदे. नवी मुंबई.
४. तेथे कर माझे…जूळती
प्रेमळ भगिनी ती माहेरची,
भावंडावर प्रेमाचा वर्षाव करी
सून ती नंतर सासरची,
दिर,जाऊ व नंणदेवर जीव लावी
तेथे कर माझे जुळती.
उभी राहते सतत सणवाराला
अगत्य किती पाहूणचाराला
काळजी वाहे आजारपणाला
वागणूक असे व्यवहार ज्ञानाला
तेथे कर माझे जूळती
पिढी पिढीत असते अंतर,
जून्या नव्या पिढीचे जुळवे सूर
सदा वाहे परिस्थितीची जाण,
प्रत्येकाचा जपे स्वभाव नी नूर
तेथे कर माझे जूळती
आखीव रेखीव दिनचर्येत कर्तव्याचे भान,
वेळेत पूर्ण करण्याचा ध्यास
कर्तव्यदक्ष आणि संयमी,
मान सन्मानाचा नसे हव्यास
तेथे कर माझे जूळती.
प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा
लागे सर्वाना तिचा लळा,
गुणगुणते भजन गाते गीत,
ठेवते वातावरण सुदंर, सुमधूर
तेथे कर माझे जूळती
मुलाबाळांना देई शिक्षण आणि संस्कार
गोरगरीबांचा, कष्टकरीचाही उचले,
आपुलकीने भार
तेथे कर माझे जूळती
गृहिणी सर्वांगीण सुंदर अशी
अशी स्त्री लाभो प्रत्येक घरी
हीच अन्नपूर्णा, हीच शारदा, हीच देवी
सर्व गुण संपन्न अशी ही गृहिणी
तेथे कर माझे जूळती
तेथे कर माझे जूळती
— रचना : पूर्णिमा शेंडे.
६. ती
तूच तुला अनोळखी
जरी जगास ओळखी
नाकारलेस स्वतःला
स्व:ताच्याच अस्तित्वाला
बेड्या मना मनांच्या
रुतवल्या पायाला
हरवूनी स्वत्वाला
आयुष्य सारे वेचूनी
झगडलीस हरक्षणाला
झिजूनी कणा कणाने
जागलीस कर्तव्याला
पचवूनी सारी दु:खे
झेलूनी सुख आनंद
पोचलीस पूर्णत्वाला
घडवलीस आयुष्ये
खडतर जगून
तिळ तीळ तुटून
तावून सुलाखून
गाठलीस शिखरे लौकिकाची
जिंकलेस जग
जिवाचे रान करून
बळ आले पंखात
पिल्ले उडून गेली
रिते पणाची भावना
मन उसवून गेली
झाले क्षण निवांत
उरी फुटला एकांत
काहुरले मन
जीव खंतावला
स्वतःच स्वतःला
शोधू लागला
मी पणाची जाण आली
उगा मनी पाल चुकचुकली
अस्तित्वाचे भान आले
तोडून सारी बंधने
निर्धाराच्या निश्चयाने
ताठ मानेने ती मुक्त झाली
आत्मविश्वासा च्या भरारीने
पूर्तता स्वप्नांचीझाली
स्वयंभू अन् स्वाभिमानी,
ती नव्याने जन्मली
गवसली तिलाच ती
मावळतीच्या साक्षीने
सार्थकी लागले जीवन
निकराच्या लढाईने.
ती दुर्गा, ती लक्ष्मी
ती अहिल्या, ती आनंदी
सलाम त्या आत्मभानाला
जाणिवांच्या नेणीवेला
–– रचना : मीरा जोशी
७. नारी तू नारायणी…
तू सीता झालीस, सावित्री झालीस,
द्रौपदी, राधा, रुक्मिणी झालीस,
किती गं रूपे तुझी
पण सर्वात भावणारे तुझे रूप म्हणजे
जन्मदात्रीचे, तुझ्या आभाळभर मायेचे,
घरभर आपल्या अवखळ दुडूदुडू पायांनी धावणारी
गोड बालिका तू,
कधी मोठी होऊन मायची देखील माय झालीस
हे तुला तरी कळले का गं ?
अल्लड वयात स्वप्नांत रमणारी तू,
अचानक जबाबदारीचे ओझे खांद्यावर येताच
किती समंजस झालीस ना ?
औद्योगिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात
उत्तुंग भरारी घेतलीस, पण तुझातील स्त्रीत्व
मात्र कायम जागृत ठेवलंस,
सर्वात जास्त आवडणारे तुझे रूप म्हणजे
तुझे गृहिणी असणे..
कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रित्या सांभाळत,
सुसंस्कृत समाज घडवणारी तुझी घोडदौड कौतुकास्पदच
कन्या, सखी,भार्या, भगिनी, माता विविध रुपात वावरणाऱ्या
मूर्तिमंत शक्तीचे नाव आहे स्त्री
खरं तर तुझं स्त्री असणं हाच तुझ्यासाठी सन्मान आहे
तुझं सामर्थ्य, तुझा बहुमान म्हणजे तुझं महिला असणं
तुझी कला, तुझं कौशल्य, तुझी हिम्मत, तुझी धोरणे,
तुझी महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी खरंच अद्भुत,
आपल्यासारख्याच दुसऱ्या जीवास जन्म देणारी शक्ती,
तुझ्याशिवाय कोण आहे ?
फुलाहूनही कोमल असणारी तू,
प्रसंगी वज्राहून ही कठीण होतेस,
आव्हाने झेलतेस, जिद्दीने स्वप्नं पूर्ण करतेस,
तुझ्याशिवाय घराला नसतं घरपण,
तू म्हणजे समर्पण, त्यागाचं दर्पण,
सलाम तुझ्यातल्या शक्तीला,
तुझ्या कर्तुत्वाला, तुझ्या विशुद्ध प्रेमाला,
तुझ्या दातृत्वाला, तुझ्या नवनिर्मितीला,
तुझ्या स्वर्णमय स्त्रीत्वाला
— रचना : प्रणाली म्हात्रे
८. अभिव्यक्ती स्त्री मनाची
(अष्टाक्षरी)
माता जगत जननी
मातृ शक्ती भूतलाची
संयमाची आहे मूर्ती
अभिव्यक्ती स्त्री मनाचे
घेण्या शिक्षण आतूर
बुद्धिमान ही सबला
बळ भरून पंखात
जुन्या तोडून शृंखला
उंच भरारी घेतली
सिद्ध करण्या अस्तित्व
श्वास घेऊ द्या मोकळा
दाखवेल ती कर्तुत्व
तेजपुंज अभिमानी
आली भिंत ओलांडून
हात द्यावा आधाराचा
लावू नका हो बंधन
मार्ग शोधू द्या वेगळा
नवनव्या कल्पनांचा
यश शिखर गाठेल
डंका साऊ फातिमाचा
— रचना : अनिसा सिकंदर. दौंड
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सर्व कविता भावपूर्ण…वाचून हर्षित झाले मन
गृहिणी….
नीलवर्ण आकाशात चद्रासवे रोहिणी
विजयात घरात मिरवे गृहिणी
नणंदा भावजयी वावरती जणू मैत्रिणी
जावा-जावा जणू पाठच्या बहिणी…..
‘
ओळखता न ये कोण सासुरवाशिणी
अहो!निरखा-परखा कोण माहेरवाशिणी
सर्वस्व समर्पूनी पतीची सहधर्मचारिणी
वर्चस्व जपूनी मानाची करी राखणी…..
क्षमस्व म्हणूनी टाळे प्रसंग आणीबाणी
मनस्वी होऊनी जीव होई पाणी पाणी
उलट्या सीध्या टाक्यांच्या अनेक विणी
चौकटी बाहेर पडण्याची एक परवणी…..
सार्यांनी घालावे खत पाणी
खणून माती, जशी करावी खुरपणी
खणून मती, बदलावी विचार सरणी
खूणगाठ बांधा, जपत मंत्र हा स्मरणी……
फुलबाग बहरेल खुशीत फुलराणी
नव्या युगाची ओळखता नवी मागणी
हातात हात गुंफुनी गावीत गाणी
अशी ही सुरस कहाणी,बोला जय हिरकणी…..
विजया केळकर________
( महिलादिनी विशेष)