नाशिक येथे नुकतीच झालेली २ दिवसांची
अ. भा. महिला वकील परिषद यशस्वी झाली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी, प्रत्येकजण आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने झगडत असतो, यातून काहीवेळा त्याला यश मिळते तर काहीवेळा अपयशालाही सामोरे जावे लागत असते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून न्याय हक्कासाठी समाजात व्यापक काम उभे रहायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महिला वकीलांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या समस्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने कार्य करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्सचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही त्यांनी नमूद केले.
श्री. गोखले यांच्यासह व्यासपीठावर न्यायमुर्ती भारती डांगरे, शालीनी जोशी- फणसाळकर, नाशिकच्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम.व्ही भाटीया, कर्णिक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँन्ड गोव्याचे चेअरमन जी.बी.चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्षा ऍड प्रीती शाह व माजी अध्यक्षा ऍड इंद्रायनी पटनी आदी उपस्थित होते.
या अनोख्या उपक्रमाचे सुरवातीलाच कौतुक करून श्री. गोखले म्हणाले, न्यायप्रक्रीयेत मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. हे बदल स्विकारून त्याप्रमाणे आपल्यात काळानुरूप जिकरीचे काम महिला वकील करत आहे. एवढेच नव्हे तर आपल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी सुध्दा त्यांना फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स सारखे राष्ट्रीय व्यासपीठ लाभले हि खूप आनंदाची बाब आहे. अशा व्यासपीठामुळे प्रश्न सोडवण्यासाठी एक नवी उर्मी मिळते हे लक्षात घ्यावे. यावेळी त्यांनी बदलत्या कायद्यांवतील तरतूदींवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
श्री.चव्हाण म्हणाले, महर्षी कर्वे, सावित्राबाई फुले यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्यांतूनच आज आशादायक चित्र समाजात उभे राहिले आहे. ज्यावेळेस सामान्यांना न्याय मिळेल, तेव्हा आमची व्यवस्था अधिक सक्षम होईल. महिला परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होत आहे, ही चांगली बाब आहे.
विविध उदाहरणे देत शालीनी फळसाळकर-जोशी म्हणाल्या, प्रशासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रे महिलांनी काबीज केली असून प्रत्येक क्षेत्रात आपल्या वेगळा ठसा उमटवत घौडदौड करतांना दिसतात. नुकत्याच झालेल्या टोकिओ ऑलिम्पिकमधील पदकांची लयलुट करणाऱ्या महिला बघितल्या कि हवेहवेसे वाटते. नैराश्याच्या गर्तेत महिला स्वतःला त्याचप्रमाणे कुटूंबाला सावरत वाटचाल करत आहेत हे आशादायक चित्र समाजात कायम रहावे. यावेळी त्यांनी भारत व इतर देशांतील महिलांची नोकरी, व्यवसाय व अन्य कार्यात असणाऱ्या महिलांची माहिती दिली.
न्यायमुर्ती भारती डांगरे यांनी हिंदु विवाह, वारसा हक्क, घटस्फोट, हुंडाबंदी कायदातील तरतूदी स्पष्ट करत महिलांना कशाप्रकारे न्यायहक्क प्राप्त होऊ लागला ते सांगितले. विशेषतः १९५० अस्त्वित्वात आलेल्या या कायद्यांमुळे महिलांना जणू कवच कुंडलेच मिळाली. यावेळी कायद्यांचा विकास होत गेला, नवीन कायदे आले आहे, पण अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ हि चिंताजनक आहे, यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करावा, यावेळी त्यांनी सीता अँक्ट, मथुरा गॅंगरँप यासारखी उदाहरणे देत सामाजात जागरूकता हवी असे सांगितले.
अँड. शाह यांनी प्रास्ताविक केले. अँड. पटणी, अँड. अंजली पाटील यांनी स्वागत केले. अँड. राजेश्वरी बालाजीवाले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा संदेश वाचला. अरुणा कोटप्पा यांनी आभार मानले
विविध ठराव
कौटुंबिक हिंसाचारांच्या प्रकरणांमध्ये प्रशिक्षित संरक्षित अधिकाऱ्यांची नियुक्ती असावी, राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी पिडीत व्यक्ती, कुटूंबाच्या मदतीसाठी तत्पर असावे, वयोवृध्दांना शासनाने सर्व अद्यावत वैद्यकीय सुविधा द्याव्यात, बालगुन्हेगाराच्या पुनर्वसनासाठी केंद्र सुरु करण्याचा विचार व्हावा, यासारख्या ठरावांना महिला वकीलांच्या राष्ट्रीय परिषदेत मंजुरी देण्यात आली.
ऑल इंडीया फेडरेशन ऑफ वुमन लॅायर्स (अ. भा. महीला वकील परीषद) तर्फे बीएलव्हीडी हॉटलमध्ये घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप न्यायमुर्ती मकरंद कर्णीक यांच्या उपस्थितीत झाला. व्यासपीठावर परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ऍड प्रीती शाह, माजी अध्यक्षा, खा. डॉ.अमी याज्ञीक, के.अरूणा, शीला अनिश, माजी अध्यक्षा ऍड इंद्रायनी पटनी, सचीव ऍड. अंजली पाटील, नाशिक बार असोसिसिएशनचे अध्यक्ष अँड.बाबुराव ठाकरे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात न्यायमुर्ती कर्णीक यांनी त्यांना मुंबई, सोलापूर, आजादीचा अमृतमहोत्सव कार्यक्रम तसेच लालबागच्या राजाचे दर्शनावेळी आलेल्या महिलांच्या कामकाज पध्दतीचे अनुभव सांगितले. महिला सक्षमीकरणाचा विषय निवडून त्यावर सांगोपांग चर्चा करण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे, अशा परिषदांमधून एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान होते आणि तीच खरी काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी शहराची महती सांगत इतर राज्यातून आलेल्या प्रतिनिधींना पुन्हा येण्याचे आवाहन केले.
सावधानता महत्वाची कानाडोळा नको
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात सायबर क्राईममधील विविध धोके सायबरतज्ञ विकास नाईक यांनी मांडले, ते म्हणाले, तंत्रज्ञान जेवढे प्रगत झाले, त्याचप्रमाणात साधने उपलब्ध होऊन धोके, जोखीम वाढली आहे. केवळ महिलाच नव्हे तर सर्वांनीच आपण करीत असलेल्या कामात सावधानता बाळगणे हे आपल्या हिताचे असते, यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देत सायबर गुन्हे कसे वाढत आहे हे स्लाईड शोसह सांगत दैनंदिन कार्यालयीन काम करतांना काही महत्वाच्या टिप्स महिला वकीलांना दिल्या. यावेळी अँड. ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
शीला अनिश यांनी विविध ठरावांचे वाचन केले. त्यानंतर सर्वानुमते अशा ठरावांना मान्यता देण्यात आली. अध्यक्षा शाह यांनी प्रास्ताविक केले. अँड,.पटणी यांनी परिचय करून दिला. रितू पटेल यांनी सुत्रसंचालन केले. अँड.पाटील यांनी आभार मानले. यावेळी परिषदेस मदत करण्याऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अँड. एम. वाय. काळे,
महेश आहेर, जालिंदर ताडगे, सईद सैय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बक्षिसेही देण्यात आली.
– लेखन : नरेंद्र जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800