स्वबळावर, स्वकर्तृत्वावर, जिद्दीने अतिशय हिंमतीने खडतर परिस्थितीचा धीराने व धैर्याने सामना करत स्वतः बरोबर इतर महिलांनाही सक्षम करण्याचा ध्यास घेतलेल्या, सौ प्रतिभा राजेंद्र भेलोंडे यांची कहाणी अंगावर शहारे उभे करते…..
सौ प्रतिभा राजेंद्र भेलोंडे यांचा जन्म १ मे १९९१ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आडगाव येथे झाला. वडील दामोदर नीलकंठराव कोरडे व आई मंगला दोमोदर कोरडे. माहेरी शेती व बंगडीचा व्यवसाय होता. त्यांनी कसे बसे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
पुढे २८ मे २०११ रोजी श्री राजेंद्र वासुदेव भेलोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या वेळी एकत्र कुटुंब होते. सासरी रॉकेलचा व्यवसाय होता. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
पती दारूच्या आहारी गेले होते. रोजचे वादविवाद. त्यात लहान मुलगी पदरी होती. घर प्रपंच कसा चालवायचा हा खूप मोठा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. प्रचंड मानसिक त्रास होता. जीवन नकोसे झाले होते.
जिचा नवरा दारू पितो त्या महिलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन अतिशय वाईट असतो. त्या वाईट नजरा चुकवाव्या लागतात. अशा वेळी जीवन नकोसे झाले हे सांगताना त्या अतिशय भावुक झाल्या. तरीही असे अनेक चटके खात त्या संसार करत होत्या.
कोणाचीही साथ नसल्याने आत्महत्या करण्याचा विचार ही अनेक वेळा प्रतिभा ताईंच्या डोक्यात येत होता. पण त्या निष्पाप मुलीकडे कोण बघणार ? तिचे काय होणार ? केवळ या विचाराने त्यांनी हार मानली नाही.
प्रतिभाताईंनी परिस्थितीशी लढायचा संकल्प केला. आता मागे वळून पहायचे नाही हा निर्णय ठाम झाला. त्यांनी पतीला व्यसन मुक्ती केंद्रात ठेवले. अथक प्रयत्नाने पतीची दारू सोडवली.
कर्ज घेऊन गावात शेती सुरू केली. कष्टाचे फळ गोड असते असे म्हणतात ना तसेच झाले. २०१५ साली शेतात चांगले पीक आले ४० पोती सोयाबीन, ६ पोती तूर तर ५ पोटी उडीद आले. आता जगण्याची उमेद नव्याने जागृत झाली.
लहान भाऊ शुभम याच्या मदतीने व शेतीच्या उत्पन्नाने त्यांनी २०१६ साली स्वतःचे घर बांधले. भाऊ लहान असून देखील आपल्या ताईला नेहमी मदत करत असे. त्यावेळी देखील त्याने ५०,००० हजारांची मदत केली ते त्या कधीही विसरू शकणार नाही कारण चांगल्या वेळेत तर सगळेच असतात पण वाईट वेळेत जे मदत करतात तीच खरी आपली माणसं असतात.
येथेच न थांबता पुढे काही तरी करायचे हे विचार स्वस्थ बसून देत नव्हते. त्या मुक्त विद्यापीठातुन २०१८ साली बारावी झाल्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या स्वामी स्वयं सहायता समूहामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. महिलांसाठी नेहमीच काही तरी करावे, त्यांना सक्षम करून स्वावलंबी बनवावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. अभ्यास केला, जेणेकरून इतर महिलांना लाभ होऊन त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावतील हा प्रामाणिक हेतू होता.
उमेद अभियानामध्ये त्या २०१८ पासून काम करत आहेत. त्यांनी एकूण ५० समूह तयार केले आहेत. कोणतेही मानधन न घेता निस्वार्थीपणे निरपेक्ष भावनेने त्यांचे काम सुरू आहे.
महिलांना सक्षम करण्यासाठी त्या नेहमीच सज्ज असतात. त्यांना व्यवसायाचे मार्गदर्शन करतात. त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे हा प्रमुख हेतू.
बचत गटाचे फायदे, शिक्षणाचे महत्त्व त्या पटवून देतात. स्वावलंबनाचे धडे देऊन बँकेचे व्यवहार कसे करावे हे देखील त्या स्वतः शिकवतात.
त्यांचे समूह दशसूत्रावर चालतात.
१) नियमित बैठक घेणे.
२) नियमित बचत करणे.
३) नियमित अंतर्गत कर्जाची देवाण घेवाण.
४) नियमित कर्जाची परतफेड.
५) नियमित रेकॉर्ड लिहिणे.
६) शिक्षणविषयक जागरूकता.
७) आरोग्यविषयक काळजी घेणे.
८) पाळी विषयी माहिती. पॅडची नियमित विक्री. त्याचे महत्व तसेच विविध तपासणी इत्यादि.
९) नियमित सरकारी योजनांचा लाभ घेणे.
१०) उपजिविकेचे साधन तयार करणे.
त्यांनी समूहातील अनेक महिलांना कर्ज मिळवून दिले त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत झाला व त्या स्वावलंबी झाल्या.
त्यांनी समूहातील महिलांचे छोटे व्यवसाय सुरु केले आहे जसे की किराणा दुकान, पाणी पुरी व्यवसाय, कुकुट पालन, शेळी पालन, महिलांना अंडी विक्रीचे मार्गदर्शन इत्यादींमुळे अनेक महिलांना लाभ झाला आहे व त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत.
प्रतिभाताईंनी ज्या महिलांना कोणताही आधार नव्हता, त्या महिलांना एकत्रित केली आहे. अशा ५०० कुटुंबांना समुहात आणले. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा दिली. वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन केले व सहकार्य केले.
प्रतिभाताईंची प्रतिभा खरंच कौतुकास्पद आहे. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे. त्यामुळे अतिशय तळमळीने व प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहे.
स्त्रियांना सक्षम करणे हाच आज त्यांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश आहे. त्या कायम नवीन योजना अमलात आणतात. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निर्भीड पणे विरोध करतात व त्या पीडित महिलेला न्याय मिळवून देतात. तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात.
ज्या महिलांना कोणी नाही, त्यांना त्या स्वतः धान्य देतात. गरोदर महिलांना वेळोवेळो दवाखान्यात घेऊन त्यांची तपासणी केली जाते. त्यांना योग्य मदत करतात.
कोविड काळात त्यांनी निरपेक्ष भावनेने कोणताही मोबदला न घेता मदत केली. मोफत मास्क, धान्य, किराणा, बिस्कीट, सॅनिटीझरचे वाटप केले.
हिरकणीप्रमाणे गावातील नागरिकांना लसीबाबत माहिती सांगून त्यांनी मनबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या बरोबर जाऊन लसीकरण करून घेतले. अत्यंत हिंमतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनजागृती केली. त्यामुळे त्यांच्या गावात कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाला.
प्रतिभाताई घेत असलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात देखील विविधता पहायला मिळते. महिला जागृतीला प्रथम प्राधान्य दिले जाते. महिलांना स्वतःचा परिचय कसा द्यावा हे शिकवले जाते. त्यांना बोलते केले जाते. त्यांचा मनातील भीती काढून त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण केला जातो.गावातील सर्व महिलांना किमान प्राथमिक शिक्षण देऊन लहान लहान गोष्टी त्या शिकवतात. त्यांनी महिलांना स्वतःची सही कशी करावी हे शिकवले आहे.खरच आगळा वेगला विचार व नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या प्रतिभाताई यांच्या कामाचे स्वरूप निश्चितच महिलांना प्रेरणादायी आहे यात शंका नाही.
प्रतिभा ताईंचा मनाचा मोठेपणा व कामाचा खरेपणा हा प्रशंसनीय आहे. त्यांचा निर्मळ व निस्वार्थी स्वभाव असल्याने त्या सर्वांशी जोडून आहे.
प्रतिभाताईना अनेक राज्यस्तरीय पुरकार मिळाले आहेत.
सामाजिक कामात मग्न असणाऱ्या प्रतिभाताई प्रांजलपणे कबूल करतात की त्यांना पतीची पूर्ण साथ आहे. त्यांचे पती फारसे शिकले नसले तरीही त्यांची विचारसरणी अतिशय आधुनिक अशी आहे. ते नेहमीच प्रतिभा ताईना त्यांच्या कामात प्रोत्साहन देतात कौतुक करतात. मात्र कधीही हस्तक्षेप करत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर कधीही संशय घेतला नाही. कारण अनेक वेळा त्यांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. पुरुषांशी देखील बोलावे लागते. अनेक लोक त्यांचे कान भरतात. चुकीचे सांगतात. मात्र त्यांचा पत्नीवर पूर्ण विश्वास आहे असे त्या आवर्जून सांगतात. स्वतःला सुशिक्षित व आधुनिक म्हणवणाऱ्या पुरुष मंडळींनी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.
आज प्रतिभाताई जे काही सामाजिक कार्य करू शकल्या ते केवळ त्यांच्या पतीच्या सहकार्यामुळे व दिलेल्या स्वातंत्र्यामुळे असे त्या आवर्जून सांगतात.
प्रतिभाताईंचे विचार देखील प्रगल्भ आहेत. स्वतःच्या मुलीसोबत एका अनाथ मुलीच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च करण्याचा त्यांची इच्छा आहे. गावातील लोकांची अशी विचारसरणी शहरातील उच्चशिक्षित लोकांना लाजवेल अशीच आहे. खरच या अशा विचारांसाठी दोघांना मानाचा मुजरा.
आज त्यांचे गावात स्वतःचे स्टेशनरी चे दुकान आहे. आपल्या मुलीच्या नावाने सुरू केलेला व्यवसाय म्हणजे अक्षरा चिप्स याला देखील आज उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आलू पापड, लोणचे, बटाटा चिप्स याला चांगली मागणी आहे. अनेक ठिकाणी प्रदर्शनात भाग घेऊन साधारण वीस हजारांची कमाई होते. हे सर्व पदार्थ अतिशय स्वच्छ व उत्तम दर्जाचे असतात जे त्या स्वतः घरी बनवतात.
अतिशय मेहनतीने, जिद्दीने त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. अशा प्रकारे सामाजिक दायित्व बरोबर आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधून त्या एक उत्तम कर्तबगार महिला म्हणून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.