आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाचू या विशेष लेख. महिला दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
८ मार्च हा दिवस खास महिलांच्या सन्मानार्थ सर्वत्र साजरा केला जातो . आता महिलांना त्यांच्या कर्तुत्वाने , साक्षर झाल्यामुळे खूप स्वातंत्र्य मिळते .त्यामुळे त्या अधिकच कर्तबगार झाल्या आहेत .म्हणूनच त्यांचे कौतुक करण्याचा हा खास दिवस !
खरंतर स्त्री ही मुळातच अत्यंत हुशार ,धोरणी , उत्तम व्यवस्थापन करणारी ,सुगरण , आणि तरीही मनाने जितकी खंबीर तितकीच हळवी !
वेळोवेळी तिच्यातील या सर्व गुणांची प्रचिती सर्वांनाच येत असते .म्हणूनच म्हणतात ना ,की समुद्राचा तळ आणि स्त्री चे मन यांचा ठाव लागणे अगदी अशक्यच असते .
अगदी पूर्वी जेंव्हा स्त्रीला जेंव्हा ‘चुल आणि मूल’ एवढ्या छोट्या क्षेत्रात गुंतवून ठेवले होते तेंव्हासुद्धा कोणी पाहुणा अचानक आला तरी असेल त्या जिन्नासातून झटपट आणि त्यातल्या त्यात सुंदर रांधून गरमगरम सात्विक जेवण प्रसन्नतेने वाढायच्या . पाहुणा आनंदाने जेवून तृप्त झाला की तिला समाधान मिळायचे . एरवी सुद्धा घरातील सर्वजण पोटभर जेवल्यानंतर मग जे शिल्लक राहील ते ती जेवत असे. त्यातून तिची समाधानी वृत्ती , कितीही उशीर झाला तरी सर्वांचे व्यवस्थित झाल्यावर जेवणे यातून त्याग , सहनशीलता , औदार्य दिसते . साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही उक्ती त्यांनाच लागू पडते . व्रत ,उपवास यातून आदर भावना ,गोग्रास , दानधर्म यातून भूतदया दिसते.
हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकत्र नटूनथटून भेटण्यातून एकीची भावना असे कित्तीतरी रंग ,गुण दिसायचे . लज्जा हा तर तिचा अत्यंत सुंदर आणि सर्वांत मौल्यवान अलंकारच आहे . आणि कोणत्याही काळात तिने तो जपायलाच पाहिजे असे अगदी मनापासुन वाटते .
तेंव्हासुद्धा सावित्रीबाई , जिजाबाई , रमाबाई, आनंदीबाई यांच्यासारख्या कित्तीतरी समाज सुधारण्यासाठी धडपडणाऱ्या महान आणि आदर्श स्त्रीया होत्याच की . त्यांनी कधीही डोक्यावरचा पदर ढळू दिला नाही की मर्यादाही सोडल्या नव्हत्या .आत्मभान सांभाळूनच त्या समाजासाठी प्राणपणाने झटल्या म्हणुनच त्या अजरामर झाल्या .त्यांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियाना समाजात मानांचे स्थान मिळायला सुरुवात झाली . त्यांचे हक्क आणि कर्तव्यें त्यांना समजल्यामुळे समाजात सुद्धा बरेच बदल झाले.
म्हणतात ना , स्त्री हा कुटुंबाचा आरसा असते . ‘मुलगी शिकली ,प्रगती झाली ‘ हे प्रत्यक्षात दिसत आहेच . त्यांच्या मनापासून केलेल्या प्रयत्नामूळेच आजचा हा ‘सोनियाचा दिन’ सर्वांना दिसत आहे . त्यान्च्या प्रेरणेमुळे आता महिला पुरुषांच्या बरोबरीने शिकत आहेत . प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र कार्यरत आहेत .त्यांची बुद्धिमत्ता , ताकद यापासून त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कुठेही कमी पडत नाहीत. उलट कधी कधी काकणभर सरसच असतात हे त्यांनी सिद्ध केले आहे . सर्व प्रकारचे खेळ , अगदी कुस्ती , वेटलिफ्टिंग मध्ये सुद्धा त्यांनी अनेक पदके देशाला जिंकून दिली आहेत . बस ,रेल्वे, गाड्या ड्रायव्हिंग पासून ते अगदी विमान चालवण्यातच काय पण कल्पना चावला सारख्या स्त्रिया आता अंतरीक्षात सुद्धा पोहोचल्या आहेत . शिक्षण क्षेत्र , खाजगी छोटे आणि मोठे उद्योगधंदे सुद्धा ती खंबीरपणे आणि सक्षमपणे करत आहे . आता तरी सर्वोच्च पदावरसुद्धा ती उत्तम जबाबदारी समर्थपणे आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पुरुषांच्या बरोबरीने पार पाडू शकते हे राष्ट्रपती मा.द्रौपदी मुरूमू , सुधा मूर्ती , वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी ज्या देशाच्या सर्वांत उच्च ,
महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर केवळ विराजमान झाल्या नाहीत तर जितक्या सहज आणि समर्थपणे स्त्रीया कुटुंबाची जबाबदारी , व्यवस्थापन सांभाळतात तितक्याच सुंदर आणि आदर्शपणे ही मोठ्ठी जबाबदारी पार पाडत आहेत, याचा सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या प्रमाणे अनेक मोठ्या पदांवर अनेक महिला आघाडीवर आहेत . नुकत्याच झालेल्या दिल्लीचा ‘ मुकुटमणी ‘ मानल्या जाणाऱे मानाचे मुख्यमंत्री पद कित्येक भल्याभल्या नेत्यांना मागे सारून मा. रेखा गुप्ता यानी पटकवले . कौतुक करावे तेवढे कमीच आहे .
एकीकडे महिलांची इतकी प्रगती होते आहे तर अजूनही समाजात निर्भया दिसल्या की मनाला खूप वेदना होतात . प्रमाण कमी असले तरी अजूनही बालहत्या , बलात्कार, मानसिक छळ
दिसत आहेतच . त्यासाठी महिलांनीच आता सशक्त, सक्षम होण्याची ,अन्यायाला प्रतिकार करण्याची तयारी करणे , स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे . त्याच बरोबर आपणसुद्धा आपल्या स्त्रीत्वाच्या मर्यादा ओळखून समाजाचे भान ठेवून तसे वर्तन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे . फॅशन करणे , मॉडर्न राहणे म्हणजे बेतालपणे वागणे आणि स्वैराचार नव्हे हे लक्षात घेतले , आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तन केले तर समाजात नक्कीच आणखीन चांगले आणि अपेक्षित बदल घडतील .
सावित्रीबाईं सारख्या अनेक स्त्रियांनी आपल्यासाठी इतके कष्ट घेऊन आपल्याला या वळणावर आणून ठेवले आहे याची जाणीव सतत तेवत ठेवलीच पाहिजे .त्यांची बरोबरी करणे केवळ अशक्यच आहे . पण त्यांचे नावं जसे आजही सर्वजण अभिमानाने आणि आदराने घेतात तसेंच पुढच्या पिढीसाठी आपल्यापैकी काही नावसुद्धा तसेंच गौरवाने घेतले जावे यासाठी आपण सुद्धा ‘महिला दिन ‘ या एकाच दिवशी महिलांसाठी काहीतरी कार्य करण्यापेक्षा आणि महिला दिन हा एव्हेन्ट न समजता त्यांच्यासाठी , समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या कल्याणासाठी असे काही भरघोस कार्य करावे की यापुढील इतिहासात आपल्या पिढीतील काही नावे ही तितक्याच अभिमानाने घेतले जावीत तरच आजचा हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल, असे मला वाटते.

— लेखन: सौ .स्नेहा मुसरीफ ,पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800