माझे बालपण : भाग एक
एमटीएनएलमधून महाव्यवस्थापक( संचरण) या पदावरून निवृत्त झालेले, श्री चंद्रशेखर गाडे यांच्या हृद आठवणी…..
“बालपणीचा काळ सुखाचा” असे कुणी तरी म्हटले आहे यात तथ्य आहे हे मला आज पटतंय.
तसे माझे बालपण सहयाद्रीच्या कुशीत वसलेले, पुणे जिल्ह्यातील आंबेेेगाव तालुक्यातील, आमच्या साकोरे गावात, आजी आजोबांच्या सान्निध्यात गेले. साकोरे गावातील आठवणी वेगळ्या आहेत.
मला चांगले आठवते वडिल पोस्टात नोकरीला होते व त्यांचे एक वर्ष पुण्याला ट्रेनिंग होते तेव्हा आम्ही गावी रहात होतो. मी व माझा धाकटा भाऊ आम्ही गावच्या शाळेत होतो. मी दुसरीत तर तो पहिलीला होता. तेव्हा मी चवथी पाचवीची पुस्तके वाचायचो. शाळेत हा चर्चेचा विषय झाला होता हे मला आजही आठवते आहे.
आमच्या घराच्या बाहेर भला मोठा पाण्याचा रांजण भरलेला असे व येणारे जाणारे वाटसरू नि: संकोचपणे पाणी पिऊन जात असत. माणूसकीचा पहिला धडा मी येथे गिरवला.
एकदा दुपारी माझे आजोबा घराच्या बाहेर आले व रस्त्याच्या दुतर्फा लांबवर पाहू लागले. मी त्यांना विचारले तुम्ही कुणाला शोधता? तर म्हणाले आज आखिदी आहे. मी अतिथीला शोधतो आहे. जर कुणी अतिथी असेल तर त्याला जेवायला बरोबर बसवून सण साजरा करायचा. हे मला नवीन होते.
एकदा संध्याकाळी आम्ही अंगणात बसलो होतो. तेव्हा एक माणूस बैल घेऊन आला. त्याने बैल दगडाला बांधला. माझ्या आजोबांनी त्याला वैरण घातली. मी खूप खुश होतो की आपल्या कडे नवीन बैल आला. आलेला पाहूणा रात्री मुक्कामाला होता. तो जेवला, रात्री गप्पा झाल्या. सकाळी तो उठला, आजीने त्याला गुळपाणी दिले व तो बैल सोडून घेऊन गेला. मला वाईट वाटले कारण नवीन बैल आणल्याचा आनंद क्षणभंगुर ठरला.
मी आजीला विचारले तेव्हा तिने सांगितले की त्याने मंचरच्या बाजारात बैल खरेदी केला होता व आपल्या घरी येईपर्यंत गडाद पडलं होतं म्हणून तो रात्री मुक्कामाला थांबला. तो कुणी नातेवाईक, ओळखी पाळखीतला नव्हता.
पूर्वीच्या काळी आता सारखी हाॅटेल्स नव्हती पण लोकं अडीअडचणीला निरपेक्ष वृत्तीने मदत करीत असत. या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे.
रात्री मी माझ्या आजोबांबरोबर मांडवाकडे (गुरें बांधण्याची जागा) झोपायला जात असे. रात्री अंगावर गोधडी घेत कधी झोप लागायची कळायचे नाही. सकाळी थंड वाऱ्याच्या झुळुकीने जाग यायची तर आजोबा उठलेले असायचे. ते मला सप्तर्षी दाखवायचे. ध्रुव तारा दाखवायचे तर कधी शुक्राची चांदणी दाखवायचे. कधी लवकर उठून मोट धरायचे. चामड्याच्या मोटीने विहिरीतून पाणी काढून शेतात पिकांना सोडायचे. त्यांची मोटेची गाणी ऐकुन भान हरपून जायचे.
सकाळी दहाच्या सुमारास आम्ही सर्व मुलं आमच्या नाना (धाकटा काका) बरोबर गुरें घेऊन नदीकाठी चरायला घेऊन जात असत. येथेच मी पोहायला शिकलो.
आमच्या गावात शेतकऱ्यांकडे आर्थिक तंगी असे. एकदा आजीने आम्हाला म्हाळूंगला वाण्याकडे घरचे तुप विकून पाच रुपये मिळतील ते घेऊन या असे सांगितले. मी व नाना एक किलो तुप घेऊन निघालो. मध्ये रस्त्यात नानाने सांगितले आपण तुप कुलकर्णी तात्यांना देऊ. म्हटले ठीक आहे. तात्यांची मुलगी नानाच्या वर्गात होती म्हणून त्याने तुप तात्याला देण्याचे ठरविले. आम्ही दोन मैल पायपीट करून तात्यांच्या घरी पोहोचलो. नानाने तुप आणल्याचे सांगितले. त्यांनी किती आहे म्हणून विचारले आम्ही एक किलो सांगितले. तर त्याची मुलगी म्हणाली कशावरून? तेव्हा तात्या म्हणाले शंका नको म्हणून मग वजन करण्यासाठी वाण्याकडे गेलो तेथे तुप जास्त भरले. मी उरलेले तुप परत घेऊन जाऊ म्हणत होतो पण तात्याने सारवासारव केली. तुमच्याकडून माप कधी कमी होणार नाही हे आम्हाला माहीत आहे, पण बेबीच्या मनात शंका आली म्हणून मी वजन करण्यासाठी आलो असे सांगितले. शेवटी मी तुपाचे पाच रुपये मागितले तर तात्या म्हणाले दिवे लागणीची वेळ आहे, अशावेळी लक्ष्मीला बाहेर पाठविणे बरोबर नाही. आम्ही पळून चाललो नाही. पैसे देऊ नंतर. मी तुप परत मागितले पण मी अगदी लहान असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व आम्ही रिकाम्या हाताने घरी परत आलो.
उरलेल्या गंमती जमती पुढच्या भागात.
– लेखन : चंद्रशेखर गाडे.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.