चला, आज मी चाळीस वर्षे (1983 सालात) मागे जाऊन स्वतःलाच पाहते.
आपण पाच बहिणी, एक भाऊ आणि आई, दादा. सर्व साधारण मध्यमवर्गीय सुखी कुटुंब.
आपण सगळीच भावंड सुंदर आणि निरागस होतो.
आपलं सर्वाचेच शाळा, कॉलेज शिक्षण चालू होते.
आपल्या वडिलांना (दादाना) मुलीच्या लग्नाची काळजी होती तसं पाहायला गेलो तर खुप वय नव्हतं झालेले पण तो काळ वेगळाच होता. त्या त्या वयात लग्न होणं किंवा व्हायलाच हवं असा होता. साहजिकच स्थळं येत होती.
ठरवता ठरवता एकदम तिघी बहिणीची लग्न ठरली. ती पण एकाच ठिकाणी, एकच शहर, दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर तिघींची सासर, त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या जवळपास राहत होता. आई दादाची काळजी मिटली.
हो ते 1983 च साल, कर्नाटक मधली स्थळं, आपण मुबंईचे, त्यामुळे, नविन राज्य, नविन शहर, नविन कन्नड भाषा, नविन लोकं, तिकडची मोठी लांब लांब घरं, मोठ मोठी कुटुंब, काही सुचत नव्हतं. काही समजायच्या आत 1983 ला काही महिन्यांच्या अंतराने तिघीही लग्न होऊन सासरी गेल्या. लग्नाची खरेदी, लग्न पत्रिका, आमंत्रणं, कर्नाटकात लग्न म्हणजे सामानाची बांधाबांध, तिकडची कुटुंब एवढी मोठी की काही समजत नव्हते. प्रत्येक लग्नात एवढी गर्दी झाली होती की आपल्याला दडपण येत होते. पण सर्व काही व्यवस्थित पार पडले.
आपलं बालपण, आपलं खेळणं, आपण भावंड आता हळू हळू दूरावणार. तुम्ही बहिणी कधी भेटणार, कधी मुंबईला घरी येणार या कल्पनेने जीव भरून आला होता.मनाला, घराला एकदम रिकामपण आले होते, कुठेतरी पोकळी जाणवत होती. त्या वेळी भेट पण सहज होत नव्हती, फोन तर नव्हतेच, बोलणंही होत नसे.
आठवणीनी अगदी जीव कासावीस होत होता.
मी तर किती वेळा बहिणीची आठवण करत एकटीच रडत असे, वाटत होतं अगदी उडत उडत जावं आणि सर्व तिघीजणी कश्या आहेत, कश्या राहत आहेत. नविन संसार, नविन नाती, तुम्ही तिघी कश्या ग
राहिल्या. तुमचं खरच कौतूक करावं का धैर्य म्हणावं समजत नाही.
पण मला अजूनही ते लग्नाचे दिवस लख्ख आठवत आहे. लांबून लांबून नातेवाईक आले होते मुंबईतली पण मित्र परिवार होता. खुपच गर्दी होती, जेवणावळी, पंगती, साड्या, ओटी भरणं, प्रत्येक आहेर, पाकिटं, सांभाळताना त्रेधातिरपीट होत होती.
लग्नानंतर लगेच पण किती विधी होते आठदहा दिवस ते लग्नाच घर गजबजलेलं होतं. आपण सर्वचजण आणि आई, दादा पण बावरलेले होते. तुम्हाला सोडून मुंबईला येताना डोळे पाण्यानी भरले होते. ते दिवस गेले, वर्षे गेली आणि आता मागे वळून पाहताना आपल्या सर्वांच्या संसाराचा वटवृक्ष बहरलाय.
अनेक फांद्याना फळंफुलं आली आहेत. वृक्ष मोठा झाला आहे. मुलं, नातवंडानी घर भरलंय, आई, दादाचा आशीर्वाद सतत पाठीशी आहे. सर्वाची कृपा आहे.
सर्वेजण सुखी भवः
तुम्हा सर्वांची लाडकी बहिण,

– लेखन : पूर्णिमा शेंडे- कोल्हापूरे.मुंबई
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800