मागच्या भागात तुम्हाला दुबई तील सफर व स्टॉकहोम पर्यंत च्या प्रवासाची माहिती सांगितली. आम्ही 13 तारखेला संध्याकाळी लेका कडे पोहोचलो. 14 तारखेला त्याला ऑफिस ला जाव लागणार होते. त्यामुळे झोपायच्या आधी त्याने घरात काय कुठे आहे (विशेषतः स्वयंपाक घरात 😄) आणि बाकी सर्व दाखवून ठेवले. जेवण झाल्यावर दमल्यामुळे खूप गाढ झोप लागली.
दुसर्या दिवशी सकाळी लेक लवकर उठून जिम ला जावून आला. तो स्वतःचे आवरून, नाश्ता करून 8 वाजता ऑफिस ला गेला. आम्ही मात्र आरामात उठून आवरलं व नाश्ता केला. मग परत आराम करून जेवण केले 😆.
लेकाने दुपारी 4 वाजता तयार रहा, तोपर्यंत घरी येतो असे सांगून ठेवले होते. आम्ही यायच्या आधी त्याने जमेल तेव्हढे घर आवरून ठेवल होते 😁. त्याच IKEA मधून आलेल्या नवीन फर्निचर पैकी डायनिंग टेबल सेट केल होते. (ते स्वतः assemble म्हणजे जोडाव लागते. त्यात 3/4 तास जातात.) किंग sized पलंग मात्र अजूनही बॉक्स मध्येच होता. त्याला जोडण्यासाठी बराच वेळ लागणार म्हणून ते राहिलं होतं. मात्र सोफा, खुर्च्या, 2 स्टडी टेबल, एक दिवाण एवढा पलंग, एक सिंगल गादी आणि एक डबल गादी ह्यामुळे आम्हाला बसायला/झोपायला 😅 काही अडचण नव्हती. किंवा त्या पलंगच्या न
जोडण्यामुळे काही अडत नव्हते. शिवाय घर जरी एक बेडरूम अपार्टमेंट असले तरी मोठं आहे. कपाट पण भरपूर आहेत. हॉल मध्ये त्याने एका शेल्फ वर देव घर सुद्धा केलय. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि रोज तिथे न चुकता दिवा लावतो. 😇 ते बघून मला फार छान वाटलं.
त्याने mid समर फेस्टिवल ला जोडून 6 दिवस रजा घेतली. त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र असे 25 तारखेपर्यंत सलग 11/12 दिवस मिळणार होते. 25 तारखेला प्रशांत ची परतीची फ्लाइट असल्याने आम्हाला तेवढे दिवस जेवढे जास्त फिरता येईल, तेवढे त्याने प्लॅन केले होते.
चिराग ऑफिस मधून 3.45 लाच घरी आला. त्याच्या ऑफिस colleague नी त्याला ड्रॉप केल्या मुळे जरा लवकर आला. येतानाच त्याने आम्हा तिघांना SL कार्ड आणले जे आम्हाला कोणत्याही (बस, ट्राम, लोकल ट्रेन, long distance ट्रेन, मेट्रो, ferries – waterways except फ्लाइट 😁) ट्रान्सपोर्ट मोड वापरताना उपयोगी पडणार होते. आणि प्रशांत च्या फोन साठी एक लोकल सिम कार्ड हि घेतले.
ईश्वरी साठी student discount SL card मिळाले. त्यामुळे त्यात एक महिन्याच टॉप अप केल. आणि आमच्या दोघांच्या कार्ड मध्ये 72 hrs च टॉप अप केल. कारण आम्ही 14, 15, 16 दुपार पर्यंत स्टॉकहोम, स्वीडन मध्येच हिंडणार होतो. त्याने फार विचार करून नियोजन केल्यामुळे पैसे तर वाचलेच शिवाय पाहिजे तशी भटकंती पण झाली. विनाकारण गरज नसताना पैसे खर्च न करण्याची मी दिलेली शिकवण त्यानी अगदी छानच अंगीकारली आहे. 😁 आणि शोभतो economist आजोबांचा नातू, असं मी मनात म्हणाले.😅(needs are limited, wants are unlimited 😁)
4.10 ला आम्ही घरातून निघालो. त्याने कार्ड कसे वापरायचे ते सांगितले. बस स्टॉप घराजवळच असल्याने बस च्या वेळा बघून त्या आधी 5 मिनट आम्ही घरातून निघून स्टॉप वर जायचो. Södertälje centrum स्टेशन पर्यंत बसने जाऊन तिथून स्टॉकहोम centrum पर्यंतची ट्रेन घेऊन 45 मिनिटात तिथे पोहोचलो. मुंबईत बोरिवली ते चर्चगेट फास्ट लोकल ने एवढाच वेळ लागतो 😅.

तिथून Drottninggatan स्ट्रीट नी मस्त फिरत बघत चाललो. Drottninggatan म्हणजे क्वीन्स स्ट्रीट. इथल्या एका क्वीन Christina ज्यांनी 1632 ते 1654 स्वीडन मध्ये शासन केले, त्यांच्या स्मरणार्थ हे नाव दिले आहे. हि स्ट्रीट मुख्यत्वे शॉपिंग साठी प्रसिद्ध आहे. इथे vehicle एंट्री नाहिये. ह्या रस्त्यावर ठिकठिकाणी शोभेच्या कुंड्या व त्यात फुलझाडं लावलेली आहेत. भरपूर कॅफे आणि restuarants आणि souvenir shops आहेत. मस्त रमत गमत बघत पुढे गेलो. तिथला उन्हाळा चालू असल्याने भरपूर लोक रस्त्यावर व कॅफे मध्ये होते. एखाद्या उत्सवा प्रमाणे ते उन्हाळा ऋतू साजरा करतात कारण इतर वेळी साधारणपणे सप्टेंबर पासून दिवस लहान व्हायला लागतो व नोव्हेंबर ते मार्च पर्यंत बर्फ पडते, त्यामुळे कामाशिवाय जास्त बाहेर पडता येत नाही.
स्टॉकहोम हे खूप सार्या बेटांवर वसलेले शहर आहे. हि संख्या 30000 बेटं एवढी आहे. ह्याला स्टॉकहोम द्वीपसमूह (archipelago) म्हणतात. ह्या बेटांच्या मधून जे समुद्राचे पाणी आहे त्याला lake Malaren म्हणतात. हे स्वीडन मधील खूप सार्या शहरांना जोडते. त्यामुळे ह्यातून फेरी सर्विस पण आहे.
Drottingatan रस्त्याच्या पुढे लेक malaren वर एक पूल आहे. तिथून उजव्या बाजूला स्टॉकहोम सिटी हॉल दिसतो. पूल ओलांडला की समोर स्विडीश पार्लमेंट चा परिसर आहे. त्या परिसरात हि आपण चालू शकतो. फक्त आत इमारती मध्ये प्रवेश निषिद्ध आहे. पार्लमेंटच्या बाहेर ग्रेटा थनबर्ग हि स्विडीश पर्यावरण कार्यकर्ती पर्यावरण बाबतीत जागरूकता आणण्यासाठी दर गुरुवारी ठराविक वेळी बसायची.
पार्लमेंट च्या पुढे आल्यावर अजून एक पूल आहे जो ओलांडून ज्याच्या पुढे सरळ गेले की गमलास्तान (ओल्ड टाऊन ला ते गमलास्तान म्हणतात) आहे व डाव्या बाजूला रॉयल पॅलेस आहे जिथे स्विडीश रॉयल कुटुंब राहते. म्हणजे ह्या राजवाड्याच्या आजूबाजूला जी पहिली वस्ती आहे तिला ओल्ड टाऊन/गमलास्तान म्हणतात. जसं की आपल्या पुण्यात लाल महाल आणि शनिवार वाडा च्या आजूबाजूला वस्ती आहे ती शनिवार पेठ /कसबा पेठ आहे. फरक एवढाच आहे की इथे स्वच्छता व टापटिपपणा फार आहे.
आम्ही पुढे गेलो. तिथे थोडा चढ उतार असलेला भाग आहे. एका कॅफे मध्ये कॉफी आणि त्या बरोबर तिथली लोकल डिश churros (त्यावर चॉकलेट सॉस व स्ट्रॉबेरी सॉस असलेले) खाऊन बघितले. हे मला जरा तेलकट आणि जास्त गोड वाटले म्हणून मी आणि प्रशांत नी जास्त खाल्ल नाही. मात्र ईश्वरी नी आवडीनी खाल्ल.
तिथून थोडे चढणीच्या रस्त्याने जाऊन नोबल प्राइस संग्रहालयाजवळ पोहोचलो. तिथे आजूबाजूच्या इमारती ह्या कलर स्कीम, खिडक्या, दरवाजे इत्यादी एकसारख्या पध्दतीने मेंटेन केल्या आहेत. खूप सारे प्रवासी हे संग्रहालय व आजूबाजूचा परिसर (चर्च, इतर इमारती) बघायला येतात. शिवाय ह्या परिसरात भरपूर कॅफे आहेत. मधल्या रिकाम्या जागेत लोकांना बसायला बेंचेस ठेवलेले आहेत. तुम्ही तिथे बसून निवांत आजूबाजूचा परिसर न्याहाळू शकता.

आम्ही नोबल संग्रहालय आत मध्ये जाऊन बघितले नाही कारण लेकाने सांगितले की आत मध्ये एवढ काही विशेष नाहिये. त्यानी आधी बघितल होत.
तिथून पुढे आम्ही एका गल्लीतून एका शाळेजवळ गेलो. त्या शाळेत फक्त गमलास्तान मध्ये राहणार्या लोकांच्या मुलांनाच प्रवेश मिळतो. त्या शाळेच्या समोर एक अरुंद गल्ली आहे जिच्या पायर्या उतरून पुढे आपण परत मेन रोड वर येतो. हि तिथली सर्वात अरुंद गल्ली आहे. आजूबाजूच्या भिंतीवर इथे मोठी पेंटिंग आहेत.
मेन रोड वर आलो की समोर लेक malaren दिसते. उजव्या बाजूला भारतीय दूतावास आहे. एकदम प्रिमीअर लोकेशन आहे. बाकी सर्व दूतावास हे Djurgården परिसरात आहेत. फक्त भारतीय दूतावास एकदम मध्यवस्तीत आहे.
उन्हाळ्यात इथले लोक रस्त्यावर स्केटिंग, सायकल चालवणे, पळणे, कॅफे मध्ये socialising करणे अश्या गोष्टी करताना दिसले. मोकळ्या जागेत मुले फुटबॉल देखील खेळत होते.
भारतीय दूतावास समोर फोटो काढून (ते गरजेचे असते 😃) बाजूच्या गल्लीतून आम्ही पुढे निघालो. तिथे एक इंडियन आणि पाकिस्तानी restuarant आहे. म्हणजे two in one 🤨(हे काय पटले नाही बुवा) जगात खूप ठिकाणी पाकिस्तानी लोक भारताचा झेंडा लावून भारतीय restuarant चालवतात. कारण त्यांना तस लिहिल की व्यवसाय चालतो. नाहीतर कोण जाणार तिकडे ?😅 हा मात्र काही authentic इंडियन restuarants आहेत. जसे की स्टॉकहोम मध्ये चेन्नई च्या सर्वणा भवन ची शाखा आहे.
आम्ही त्याच्या समोरच्या इटालियन restuarant मध्ये रात्रीच जेवण म्हणुन पिझ्झा खाल्ला. 9 वाजत आले होते. तिथले सर्व restuarants 9 वाजता बंद होतात. म्हणून त्या आधी ऑर्डर प्लेस केली. खाउन झाल्यावर आम्ही गमलास्तान स्टेशन कडे चालत गेलो. ते स्टेशन लेक malaren च्या खूप जवळ आहे. म्हणजे एका बाजुने वर चढून गेल की waterfront आहे. इथली काही स्टेशन हि underground आहेत. गमलास्तान हे त्या पैकी एक.
तिथून आम्ही घरी जाण्यासाठी 9.45 ला Södertälje centrum ची ट्रेन घेतली. तिथे गेल्यावर परत बस घेऊन घरी पोहोचायला आम्हाला 11 वाजले. चालल्यामुळे दमलो होतो 😅त्यामुळे लगेच झोप लागली.
दुसर्या दिवशी 16 तारखेला लेकाच विद्यापीठ परिसर व अजून काही गोष्टी बघायच्या ठरवल्या होत्या.
तुम्हाला गमलास्तान व परीसर सफर आवडली का ? ते नक्की कळवा. परत पुढच्या भागात भेटूयात. तोपर्यंत मस्त फिरा, स्वस्थ्य रहा 😊
क्रमशः

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रवासवर्णन वाचताना आपणही ते क्षण अनुभवतो असंच वाटत होतं.
सुप्रिया, खुपच छान शब्दांकन.असे वाटते की आम्ही स्वतः बघतो आहोत.जिवंत वर्णन. अशीच लिहित रहा. All the best 👍
खुपच छान शब्दांकन. सुप्रिया तु इतके सुंदर वर्णन केले आहेस, आहे वाटते आहे की आम्ही स्वतः बघतो आहोत. अशीच लिहित रहा👍
Hi Supriya. chaan varnan.