नमस्कार मंडळी.
जागतिक आनंद दिवस, नुकताच २० मार्च रोजी होऊन गेला.
या निमित्ताने “चला, आनंदाने जगू या” हा लेख आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला. हा लेख खूप लोकांना आवडला. त्यांचे मनःपुर्वक आभार.
आपले एक ज्येष्ठ लेखक, कवी श्री सुनील चिटणीस यांनी त्यांना गवसलेल्या आनंदा विषयी छान लिहून पाठविले आहे. त्यांचा लेख पुढे देत आहे.
इतरही लेखक, वाचक यांनी त्यांच्या आनंददायी उपक्रमाविषयी लिहून पाठविल्यास ते लेखन अवश्य प्रसिध्द केले जाईल.
चला, तर मग आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेऊ या…
– संपादक
आज मी प्रवास करताना हायवेवर मोठ्ठं होर्डिंग पाहिलं. त्यावर ग्रेट अमिताभ बच्चनचा मोठ्ठा फोटो होता अन त्या सोबत ठळक अक्षरात लिहिलेले “आनंदाचा खजिना” हे दोन शब्द डोळ्यात भरत होते.
चालत्या गाडीतून संपूर्ण जाहिरात वाचणे शक्यच नव्हते. परंतु, आनंदाचा खजिना हे दोन शब्द मात्र माझ्या मनांत कोरले गेले. कसा असावा बरं हा आनंदाचा खजिना ? जुन्या नाण्यांच्या संग्रहाचा, पोस्टल तिकीटांचा, दुर्मिळ कागदपत्रांचा, पेपरातल्या कात्रणांचा, काडेपेटीच्या कव्हर्सचा, परदेशी चलनाचा, पुरातन वस्तूंचा, आवडीच्या पुस्तकांचा खजिना असतो हे मला माहित आहे. माझ्याकडेही कित्येक वर्ष मी जमवलेल्या दुर्मिळ नाण्यांचा व दुर्मिळ पोस्टल तिकिटांचा खजिना मी आयुष्यभर जमवला आणि आता तो माझा नातू शानील याला भेट दिला……….
पण आनंदाचा खजिना कसा जतन करायचा असतो ? हा मला प्रश्नच पडला. मन माझे मग यातच गुंतले अन आज मी आनंदाच्या खजिन्यावर सिरियसली विचार करू लागलो……………….!
त्यातच आज एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की……….
आनंदी व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते. कितीही बिकट परिस्थिती असली तरी आनंदी रहाणारी व्यक्ती कोणत्याही संकटावर सहज मात करू शकते. आनंदी राहिल्यामुळे जीवनशैली सुधारण्यास मदत होते. मी माझ्या पत्निच्या वियोगाच्या दुःखात पार बुडालेला होतो, परंतु माझ्या हृदयस्थ सदगुरुंच्या आशिर्वादाने कवी – लेखक झालो अन साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांची ओळख पाळख व्हायला लागली. काव्य मैफीलीतील माझा सहभाग वाढायला लागला. मी स्वतः कविता, ललीत लेख, शुभेच्छा पत्र, रसग्रहण असे लेखन करायला लागलो. अन या चार पाच वर्षात यातूनच हवाहवासा नितळ, निखळ श्रावणसरीं सारखा वा खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारख्या आनंदाची अनुभूती मिळायला लागली………. हा तर आनंदाचा खजिना आहेच की याची मनोमन खात्री पटली. लिहिता लिहिता कधी पाच पुस्तके प्रकाशित झाली ते मला कळलेच नाही. मला इथेच आनंदाचा खजिना गवसला, बरं का !
मी हदयरोगाचा पेशंट, माझी अंजिओप्लास्टी काही वर्षांपूर्वी झाली आहे. पण या आनंद खजिन्यामुळेच त्या रोगापासून आता मी दूर राहिलो आहे. माझे ताणतणाव नक्कीच कमी झाले आहेत अन आयुष्यमान वाढण्याची शक्यता वाढीस लागली आहे. आता मात्र प्रयत्नपुर्वक माझ्यातली साहित्य संपदा, प्रतिभाशक्ती विकसित करणेचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरुच आहे अन तो मी तसाच सुरु ठेवणार आहे हे नवकीच !
आता कसं आहे ना ? सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून किंवा वाचनात येणाऱ्या पुस्तकातून शिकायला पाहिजेत असं मुळीच नाही. काही सुंदर उपयुक्त धडे हे मित्र, नातेवाईक आणि भोवतालचा समाज आपल्याला शिकवत असतो. आपण मात्र डोळसपणे, भान न हरपता शिकत, स्विकारत राहिले पाहिजे. या नव्या मिळणाऱ्या धड्यांमधूनही आनंदाचा खजिना आपल्याला गवसत असतो. आपल्या मनांत फक्त सकारात्मक विचार असायला हवेत. आजूबाजूला पहाण्याचा दृष्टिकोनही तितकाच सकारात्मक हवाच !
खरं तर असंही म्हणतात की, सुखाला अंत नसतो म्हणून माणूस हा प्राणी कधीही शांत नसतो. शेवटी आपलं आपणच ठरवायचं असतं की सूख समाधान मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा ? त्यापाठी किती धावायचं ? किती पळायचं ? अन कुठं थांबायचं ? हे एकदा आपल्याला उमगलं की आनंदाचा खजिना कधीच रिता होत नाही.
आज आपण पाहतो सर्वश्रेष्ठ सचिन तेंडुलकर माही गणला जाणारा महेंद्र धोनी असे दिग्गज खेळाडू त्यांच्या निवृत्तिच्या योग्य वेळी त्या क्षेत्रातून निवृत्त झाले आहेत. हा आदर्शवत धडा आपणही स्विकारला पाहिजे, अंगिकारला पाहिजे. म्हणजे नक्की केंव्हा कुठे थांबायचं हे स्वतःला कळलेच पाहिजे.
एखादा डॉन अमिताभ बच्चनसारखा असतोही ………. पराजय – विजय पुन्हां पराजय तदनंतर विजय हे त्याच्या आयुष्यात सुरुच आहे, अजूनही तो आनंदाच्या खजिन्यामागे त्याची उरली सुरली शक्ती लाऊन आनंद शोधायचा प्रयत्न करतोच आहे. मुकद्दर का सिकंदर चा त्याचा सिलसिला सुरुच आहे. नियमाला अपवाद असतात काही, असो……….!
असंही म्हटलं जातं की जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात अन त्या पराभवातून बाहेर पडल्यावरसुध्दा आता नक्की कुठे थांबायचं ? हे सांगायला ते पराभवच मार्गदर्शक ठरतात, हे ही तितकेच नितळ सत्यच !
आनंदाचे डोही आनंद तरंग किंवा आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे, असा चोहिकडे विखुरलेला आनंद हा आनंदाचा खजिना असू शकतो, ज्याने त्याने योग्य वेळी त्याचा शोध लावावा अन तो आनंद खजिना आपल्या अखेरपर्यंत जतन करून ठेवावा.
आनंद खजिन्याबाबत यापेक्षा अधिक काय लिहावे बरे? आपापल्या वाटेला आलेला आनंद खजिना आयुष्यातून हरपून, करपून, हरवून जाऊ देऊ नये………. आनंदाचे लाभलेले कण अन क्षण वेचत राहून आपापल्या आनंदाच्या खजिन्यात सातत्याने वाढ करत रहाणे, खजिना समृद्ध करत रहाणे, एकेक क्षण मोत्यांच्या माळेतल्या मोत्याप्रमाणे गुंफत रहाणे अन सरतेशेवटी आनंदरूपी ती माळ आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रत्येक मोती हा आनंदाचा खजिनाच आहे, सूख समाधानाच्या धाग्यात गुंफलेला एक अनमोल खजिना आहे हे सत्य स्विकारून आनंदघनावर स्वैर विहार करायला काय हरकत आहे ?
आजसे पहले आजसे जादा खुशी आजतक नही मिली……….,
असे होण्यापूर्वीच आपण आपला आनंद खजिना जपून ठेवला पाहिजे.
खरं आहे ना ?

– लेखन : सुनील चिटणीस. खेड – रत्नागिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम लेख.👌👌👍👍🙏🙏