मी इयत्ता नववीत होते. कापडण्याला माझ्या खेडे गावात नुकत्याच उघडलेल्या हायस्कूल मध्ये शिकत होते. माझी आई सही करण्यापुरती शिकली होती नि जुन्या काळची गृहिणी होती.
दुपारचा चहा मी करत असे. चहा झाला की दूध तापवून ठेवायचे व स्टोव्ह (पितळी टाकीचा, फर्र फर्र आवाज करणारा) पिन सोडून विझवायचे माझे काम. चहा करून दिला आईला नि दूध तापवायला ठेवले, अगदी स्टोव्ह जवळ बसून पण …
हातात पुस्तक .. अर्ध लक्ष दुधाकडे, अर्ध लक्ष पुस्तकाकडे…
काय होणार ? तुम्हाला कळलेच असेल. दूध उतू गेलेच..
मग काय ? बसला ना ओरडा.. किती वेळा सांगितले असे पुस्तक समोर ठेवून काम करू नको म्हणून…?
मंडळी, आता ही हा प्रसंग डोळ्यांसमोर मला लख्ख दिसतो आहे. आमच्या लांबलचक घरात स्वयंपाक घरात मी परकरातली (खरंच बारीक हो.. खोट नाही बोलणार 😊) दोन वेण्या घातलेली, पाय मुडपून बसलेली मला मी दिसते आहे.
आईला पुस्तक घेऊन काम केले की खूप राग यायचा.
येणारंच हो ! ती बिचारी गृहिणी, तिला कशाला हवे पुस्तकांचे कौतुक ? ते ही इतक्या जुन्या काळी जेव्हा तिच्या पिढीतले फारसे कुणी शिकलेलेच नव्हते.
हा प्रसंग अशा साठी सांगितला की, आता लेख लिहितांना मला खूण पटली की, अर्रे.. म्हणजे मला वाचनाचे वेड होते तर .. तेव्हा त्या काळी शाकुंतल नाटका विषयी एक संस्कृत पुस्तक माझ्या हाती लागले होते व धडपड करून संस्कृत विषय शिकत नसतांनाही मी ते वाचले होते व मला त्याचा थोडाफार अर्थ लागला होता. आमच्या गावात वर्तमान पत्र महाराष्ट्र टाईम्स फक्त आमच्या घरी येत असे.
माझे वडिल थोर स्वातंत्र्य सैनिक विष्णुभाऊ पाटील हे अत्यंत पुरोगामी विचारांचे व गावाचे मुख्य कारभारीच होते. त्या मुळे मला आठवते मी नियमितपणे पेपर वाचत असे. इंदिरा गांधी नभोवाणी मंत्री झाल्याचा व त्यांचा नऊवारीतला फोटो आज ही मला डोळ्यांसमोर दिसतो.
मला वाटते, तुमच्या लक्षात आलेच असेल की, माझ्या छंदाची पायाभरणी अशी माझ्याही नकळत झाली होती नि त्याचा मला थांगपत्ताही नव्हता. असे घडले नसते तर…?
बाप रे ? कुठे राहिले असते हो मी ? आणि आज तुमच्यासाठी लेख तरी लिहिला असता का ? नक्कीच नाही. तर मंडळी वेड म्हणा छंद म्हणा ते व्यसन माणसाला असावेच ..
नाही तर काही खरे नाही. आज माझा मोठा भाऊ म्हणतो, बघा, बाईचा (माझे टोपण नाव) किती छान वेळ जातो. दिवसभर लिहित, वाचत असते ती ! नाही तर आम्ही ? वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. मलाही वाटते हे वाचनाचे वेड मला नसते तर …? मी कल्पनाही करू शकत नाही.
पुढे धुळ्याला पी डी ला ॲडमिशन घेतल्यावर तर माझे हे वाचनाचे वेड वाढतच गेले. SSVPS कॅालेजची प्रचंड मोठी लायब्ररी माझ्या हाती लागली नि मी वेड्यासारखी वाचत सुटले. फडके खांडेकर अत्रे पु ल माडखोलकर हरी भाऊ आपटे साने गुरूजी, किती नावे घ्यावीत, मराठीतील तमाम लेखक ह्या दोन वर्षात मी वाचून काढले. वय अवघे १६/१७ फक्त.
फडके खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी आम्हाला वेड लावले होते, नव्हे त्यातील नायिका आम्हीच आहोत असे आम्ही जगत होतो. त्यात काही शरच्चंद्रां सारखे हिंदी लेखकही हाती लागले ते ही वाचून काढले.
लग्न होऊन नाशिकला आले तरी खंड पडला नाही. नवरा ललितचे खंड व पुस्तके KTHM College मधून आणून देत असे. पुढे शिक्षण, एस वाय बीए नंतरचे राहिले होते ना ? ते व वाचन असा एम ए पर्यंतचा प्रवास झाला व १९७९ ला KTHM College मध्येच नोकरीला लागल्यामुळे येथिल लायब्ररी हाती लागली नि मी चार्ली चॅप्लिन पासून ते इझाबेला व हिराबाई बडोदेकर ते राजा रविवर्मा पर्यंत काही ही वाचायचे सोडले नाही. जी एंची सर्व पुस्तके मला माझ्या कॅालेज मध्ये मिळाली. बाबा आमटे, जन्मठेप इथेच वाचले. गो नि दा, शंकरराव खरात, ८० च्या दशकातले सर्व दया पवारांपासून ते कोल्ह्याट्याचे पोर पर्यंतचे विद्रोही दलित वाड्.मय वाचून काढले. समस्त जयवंत दळवी, नाझी भस्मासुराचा उदयास्त डोस्टोव्हस्की सारख्या रशियन कादंबऱ्या व मॅक्सिम गॅार्कीचे पाडस व आई, पॅपिलॅान, नॅाट विदाऊट माय डॅाटर, काय आणि किती वाचले याची गणती नाही हो !
छंद कोणताही असो (नाना प्रकारचे छंद आहेत त्याची उजळणी मी करण्याचे कारण नाही) माणसाला गुंतवून ठेवतोच पण प्रचंड आनंद ही देतोच पण समृद्ध ही करतोच करतो. त्या काळात आपण जणू हरवलेले असतो, एका वेगळ्याच भाव विश्वात असतो. भले ह्या एवढ्या पुस्तकातले डिटेल्स आता इतक्या वर्षांनी मला आठवणार नाहीत पण त्यांनी मला समृद्ध केलेच ना ? त्या मुळे साडे अठ्ठाविस वर्षे शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रचंड आत्मविश्वासाने मी उभी राहू शकले (ते येरा गबाळ्याचे काम नाही) व माझ्या परीने त्यांनाही व्याख्यानातून समृद्धकेल्यामुळे माझे हजारो विद्यार्थी आज ही मला विसरले नाहीत. ही माझ्या आयुष्याची केवढी मोठी जमापुंजी आहे व मी केवढी श्रीमंत आहे हो ! अत्यंत तृप्त आणि समाधानी.
ह्या वाचनाचाच परिपाक म्हणा, मी कधी कवितेतला क लिहिल अशी सुतराम शक्यता नसतांना मी १९९२ पासून अचानक कविता लिहू लागले व आज माझ्या नावावर २७ पुस्तकांचे धन असून कुठलीही खटपट न करता माझ्या कविता शालेय पाठ्यपुस्तकातून हजारो विद्यार्थी शिकत आहेत ही केवढी समाधानाची बाजू आहे. (यात कुणाला अतिशयोक्ती वाटली तर माझा नाईलाज आहे, वाटो बिचाऱ्यांना). म्हणजे बघा.. एक साधा छंद माणसाला कुठून कुठे घेऊन जातो, नव्हे त्याचे आयुष्यच बदलून टाकतो जे त्यालाही अपेक्षित नसते.
म्हणूनच मी नेहमी सांगते, वाचा वाचा वाचा…
वाचनाबरोबर इतरही छंद गाणे चित्रकला वाद्य वाजवणे (सिनेमातील मोठे कलाकार यातूनच पुढे आले) इ. हे सारे छंद प्रचंड आनंददायी व कल्याणकारी आहेत. म्हणूनच माणसाला काही छंद असावाच. त्यामुळे जीवन अडचणीतही सुसह्य होते. छंद अमुकच असावा असे काही नाही. हो, समाजसेवेचाही छंद असू शकतो ना ? आमच्या प्रमोद गायकवाडांना आदिवासी दुर्गम भागात विहिरी खोदून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचा छंद आहे. किती छान ना ?
मग मंडळी, तुम्हाला आहे की नाही एखादा छंद ? अहो,
बे एके बे सगळेच करतात हो, पण त्यात छंद असेल तर
जीवन आनंद बनते. मग घ्या चला शोध आपण आपलाच
नि शुरू हो जाव भाई..
………॥धन्यवाद॥….. हो, एवढे वाचायला लावले म्हणून हो !
- — लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
तुमचा लेख वाचून मन भूतकाळात फिरून आले, तुमचा मराठी चा तास आठवला, खूप छान, प्रभावी असायचे तुमचे बोलणे. कॉलनी तील तुमचा शेजार आणि कॉलेज मधे शिकवणे दोन्ही ही समृद्ध करणारे होते. वाचनाचा छंद मलाही अगदी बालवयात होता, आणि उत्तरोत्तर तो वाढत गेला, आज ही रिकाम्या वेळात, प्रवासात, झोपताना पुस्तक सोबत करते. किती तरी पुस्तकांनी आयुष्य जगण्याचे धडे दिले, दृष्टी ही दिली. धीर ही दिला.
सानिया, गौरी देशपांडे, माधवी देसाई, कविता महाजन, गिरिजा कीर अशा आवडत्या लेखिकानी स्त्री म्हणून खंबीर, विचारी आणि धाडसी निर्णय घेण्याचे आत्मभान दिले तर अनेक नामवंत लेखकांनी सामाजिक भान दिले.
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असताना रुग्ण आधी माणूस म्हणून दिसतो, कळतो हे पुस्तकांचे उपकार. आज ही सोशल मीडिया ने जीवन व्यापलेले असताना पुस्तक वाचनाचा आनंद अवर्णनीय असतो. कळत न कळत तुमच्या सारख्या अनेक गुरुजनानी हे वाचनाचे संस्कार आमच्या वर केले या बद्दल मानावे तितके आभार थोडे च आहेत.
ईश्वर तुम्हाला सरस्वती ची सेवा करण्या साठी उदंड निरामय आयुष्य देवो ही सदिच्छा.
खरच आहे…छंद वाचनाचा आनंद देतो
प्रा.सुमतीताई पवार यांचा लेख वाचून खूप आनंद झाला.
खांडेकर फडके माडखोलकर ही नावं वाचून चक्क
अमृतकुंभच हाती आल्यासारखं वाटलं.वाचनाच्या
छंदाने ताई स्वतः तर समृद्ध झाल्याच परंतु हजारो
विद्यार्थ्यांनाही त्यांनी वाचनाची गोडी लागली.
ताईंचा लेख वाचताना मला आमचे डी.एड.व बी.एड.
काॅलेजचे प्राध्यापक आठवले.त्यांनी आम्हाला
वाचनाची गोडी लावली.प्रा.विष्णु देशपांडे सर आज हयात नाहीत परंतु वाचनाच्या छंदातून त्यांनी
आमच्यातला शिक्षक घडवला.त्यांनी मला बक्षीस दिलेला
कोरांटी या काव्यसंग्रहामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी
कविता लिहू लागलो.या सर्व आठवणी ताई तुमच्या
सर्वांगसुंदर अशा छंद या लेखामुळे जाग्या झाल्या.
त्यातून तुमचं कार्य किती मोठं आहे याची प्रचिती आली.
जो कोणी हा लेख वाचले त्याला नक्कीच वाचनाची
गोडी लागल्याशिवाय राहणार नाही.
कापडणे धुळे नाशिक ते थेट इंग्लंड हा तुमचा तेजोमय
प्रवास मन थक्क करणारा आहे.
पुन्हा पुन्हा वाचावा असा सुंदर लेख वाचण्याची
संधी दिल्याबद्दल ताईंसह न्यूज स्टोरी टुडेलाही
मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई.
गाव..प्रकाशे,जि.नंदुरबार (आधीचा जि.धुळे)