उंच जाई माझा झोका
साथ शब्दांची लाभता
हर्ष होई मज फार
शब्द गुंफण पाहता..
तारकांचे रूप घेई
अक्षरांचा खेळ सारा
मनातील भावनांचा
फुले सुंदर पिसारा..
अंतरीचे गुज खरे
होते व्यक्त अलवार
मीच मला नित दिन
सापडते नवी फार ..
वेड लावी छंद जिवा
निर्मितीची वाटे आस
धुंद करतात क्षण
स्वतःसाठी असे खास..
प्रयत्नांच यश तेव्हा
जेव्हा कधी मिळे दाद
अनुभूती स्फूरणाची
भासे ईश्वरी प्रसाद..
विश्व न्यार हे काव्याचं
देत असते ते मोका
तमा मनीच्या सारत
उंच जातो माझा झोका..

रचना : मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.