प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार अनिल बर्वे यांचा आज स्मृतिदिन आहे. या निमित्ताने त्यांचे बंधू, लेखक तथा आकाशवाणी / दूरदर्शनचे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे यांनी आपल्या भावाच्या जागवलेल्या काही आठवणी..
अनिल बर्वे यांना विनम्र अभिवादन.
संपादक
आम्ही ४ भावंडे होतो. अनिल चा जन्म १७ जुलै १९४८ रोजीचा तर माझा १५ ऑक्टोबर १९५१ रोजीचा. आम्हा दोघांचाही जन्म पुणे येथे झाला. शालेय शिक्षण औरंगाबादेतील न्यू मिडल स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात म ए सो कॉलेजात झाले. वडील पोलीस खात्यात होते. आम्हा दोघांचेही शिक्षण पुण्यातच झाले. वडील सरकारी नोकरीत असल्याने आमची परिस्थिती तशी चांगली होती.
अनिल ला लेखनाची प्रचंड आवड होती. अगदी २२ वर्षी त्याने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी दोन नाटके सादर केली. त्यात “कोलंबस वाट चुकला” या नाटकास सोविएत (Soviet Land) नेहरू पुरस्कार मिळाला.
अनिलने साप्ताहिक माणूस मध्ये ७० च्या दशकात लिहिलेली “रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता” ही नक्षलवादी चळवळीचा आढावा घेणारी लेखमाला फार गाजली. त्याने “फुलवा” नावाचे एक फिल्मी मासिक काही दिवस काढले. या नावावरुनच त्याने मुलीचे नाव “फुलवा” ठेवले.
आपल्याला कल्पना असेलच आज ती आघाडीची नृत्य दिग्दर्शक, नृत्यांगना आहे.
अनिलचा मूळ पिंड डाव्या विचारसरणीचा असल्याने त्याने “रणांगण” हे राजकीय साप्ताहिक काढले. ते काही दिवस चालवले पण जाहीराती अभावी ते बंद पडले.
पुढे नक्षलवादी पत्रके छापल्याच्या आरोपाखाली अनिल दीड वर्षे तुरुंगात होता. याच वास्तव्यात त्याने “थांक्यू मिस्टर ग्लाड” ही कादंबरी लिहिली. ती आणीबाणीच्या काळात ‘साप्ताहिक माणूस’ मध्ये प्रसिद्ध झाली आणि अतिशय गाजली सुध्दा. पुढे या कादंबरीवर त्याने प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या संस्थेसाठी नाटक लिहिले. तेही लोकप्रिय झाले.
अनिलचे “हमिदाबीची कोठी” हे वेश्यावस्तीतील जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणारे नाटक विजया मेहता यांनी अशोक सराफ, नाना पाटेकर आदि दिग्गज कलाकारांना घेऊन रंगमंचावर आणले. त्याला समिक्षकांनी चांगले उचलून धरले. त्यानंतर त्याने निपुत्रिकांच्या समस्येवर लिहिलेले ‘पुत्रकामेष्टी’ (प्र.भु.डॉ प्रभाकर पणशीकर), राजकीय नेत्यांवर आधारित लिहिलेले ‘आकाश पेलताना’ (प्र.भु. डॉ श्रीराम लागू), इच्छा मरणावर वर आधारित “मी मालक या देहाचा” (प्र.भु. विक्रम गोखले) आदि एकाहून एक सरस नाटके रंगमंचावर आली.
वेगवेगळे विषय अभ्यास करून लिहिणे ही अनिलची खासियत होती. ‘डोंगर म्हातारा झाला’ (आदिवासी जीवन) ‘११ कोटी गालन पाणी’ (चासनाला खाणीची दुर्घटना) ‘होरपळ’ (अभयारण्ये) ‘स्टडफॉर्म’, ‘फाशिगेट’ अशा विविध विषयांचा वेध घेणाऱ्या कादंबऱ्या त्याने लिहिल्या.
अनिल ला साहित्याचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यात काही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील आहे. त्याच्या लेखनाचे अनेक भाषांमध्ये रुपांतर झाले. त्यावर हिंदी, मराठी चित्रपट ही आले. प्रसिद्ध शाहीर अमर शेख हे त्यांचे सासरे होत.
अनिलची फुलवा खामकर व राही बर्वे ही मुले आज आपापल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहे, ही खूपच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
अशा या माझ्या भावाचे, अनिल बर्वे याचे ६ डिसेंबर १९८४ रोजी अल्प वयात निधन झाले. देह रूपाने जरी तो गेला असला तरी आठवणींच्या रूपाने माझ्या सोबत तो कायमच आहे आणि राहील.
— लेखन : चंद्रकात बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800