माझ्यासाठी कर्तुत्ववान महिला म्हणजे माझी आई !
ती म्हणजे ताई !
ती म्हणजे मैत्रीण !
ती म्हणजे पत्नी !
ती म्हणजे मुलगी !
ती म्हणजे जन्म !
ती म्हणजे माया !
ती म्हणजे सुरुवात !
ती नसेल तर, बाकी सारे व्यर्थ !
जागतिक महिला दिनानिमित्त व्हॉट्सअप, फेसबुकवर, समाज किंवा संघटने द्वारे तर मिडीया वरून बऱ्याच प्रसिद्ध महिलांची नावे घेतली जातात. त्यांच्या कर्तुत्वाला मानचिन्ह दिले जाते.
मीही अश्या तमाम कर्तुत्ववान महिलांचा आदर करते, त्यांना मानाचा सलाम !
पण चटकन या दिवशी माझी आई, माझ्या डोळ्यासमोर येते. ती शिकली नव्हती. अंगठा लावणे ही तिच्या सहीची ओळख होती. वाचनरुपी ज्ञान तिच्याकडे नव्हते. पण अनुभवाचे भांडार तिच्याकडे होते. गणितातील बेरीज -वजाबाकी तिला ठाऊक नव्हती. पण हिशोबी व्यवहार ती अचूक करत असे. त्यामुळेच तिने बेघर कुटुंबाला घर मिळवून दिले होते.
घरासाठी मोठे धाडस, या माऊलीने केले होते. बेघर झाल्यानंतर पंधरा -सोळा माणसांनी भरलेले कुटुंब कसे तारले होते ? हेच तिचे धाडस होते.
आपण गोष्टीत वाचले आहे, चिमणीचे घर वाहून जाते, तेव्हा पोपट तिला आपल्या पिंजऱ्यात राहावयास बोलवतो. पण ती चिमणी ठरवते की, स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बंदिस्त पिंजऱ्यात राहणे, किती चुकीचे आहे !
अगदी असेच माझ्या कुटुंबात घडले होते. या प्रसंगी ठामपणे, तटस्थ कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली, ती होती सौ. भागीरथी बाळा कोयंडे. तिच्या त्या धैर्यास माझा मानाचा मुजरा !
सन १९६४-६५ काळ. माझा जन्म कोकणात, देवगड मधील वीरवाडी गावात, भागीरथी कोयंडे, अश्या धाडसी मातेच्या उदरी झाला. आम्ही एकूण चार भावंडे, तीन काका -काकी, त्यांची मुले आजी व माझे आई -बाबा असे आमचे एकत्रित मोठे कुटुंब होते.
कोयंडे, पाटील घर म्हणून मानले जात असे. घरात चुलत काकांचे कुटुंबही मोठे होते. त्या मानाने घरही मोठे होते व आजही आहे. फक्त आज आमचे कुटुंब त्या घरात नाही.
माझे बाबा मुंबईला, बीपीटी मध्ये क्रेनड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. आईचे वय तेरा चौदा असतानाच लग्न झाले होते. लहान वयातच वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या तिच्यावर पडल्या होत्या. कुटुंबात मोठी सून या नात्याने, लहान दीर व नणंद अश्या पाच भावंडांचे लग्न करून देण्याची जबाबदारी, माझ्या आईने, उत्तमपणे पार पाडली . दरमहा बाबा पाठवत असलेल्या मनीऑर्डरवर पूर्ण कुटुंबाचे पालनपोषण, कुटुंबाच्या सर्व जेष्ट सभासदांना एकत्रित ठेवून, एकमेकांना मदतीचा हातभार देत सुरळीत पार होत असे.
काही वर्षांतच चुलत काका व आमच्या कुटुंबाचे एकमेकांत, मालमत्ता व घरावरून वाद होऊ लागले होते. वादाचे रूपांतर मारामारी पर्यंत येत असे. शिवीगाळ होत असे. हे पाहून आजी फारच खचू लागली होती. आईने ह्यावर तोडगा म्हणून तिन्ही काकीना त्यांच्या मुलांसह, त्यांच्या माहेरी पाठविले होते.
दोन्ही काकांना नोकरी निमित्त शहरात पाठविले होते. आता फक्त आम्हीच तिथे राहत होतो. कारण त्यांनी राक्षसी विकृतीपणे, माझ्या काकीला शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.
गोठ्यात बांधलेली गुरे, त्या विकृत माणसांनी, भर अर्ध्या रात्री सोडून, पळवून लावली होती. ती माणसे हातात सुरी व कोयता घेवून अंगावर धावून येत असत. त्यावेळी माझा भाऊ पाच -सहा वर्षांचा असेल. भीतीने आईचे दोन्ही पाय मागून पकडत असे. घाबरून रडत, आईला म्हणत असे, “तू पुढे जाऊ नकोस, तुला मारून टाकतील ते ! आई…” असे मोठमोठ्याने किंचाळत असे.
मी त्यावेळी जेमतेम सहा -सात महिन्यांची असेल. आजी उंचीने असल्याने त्या उतरत्या वयात, पूर्ण कमरेत वाकली होती. आमच्या आयुष्यात अति प्रसंगाचा तो दिवस, आईने आम्हाला मोठेपणी सांगितला होता, तो तसाच आजही आम्हाला दिसतो.
आजीने मला पोटाशी आडवं घेतलं होत॑, आईच्या पदराला धरून, लपत रडत असलेला माझा भाऊ, तर माझ्या मोठ्या दोन बहिणी, डोक्यावर गाठोडीत बांधून घेतलेले सामान घेऊन, घाबरत आजीच्या मागे लपत होत्या. आईला घरातून बाहेर पडण्यास लावलेली, त्या विकृत माणसांची बळजबरी !
परिधान केलेल्या कपड्यांच्या जोडीवरच, आम्हा भावंडांना व आजीला घेऊन, आई काळजावर मोठ्या संकटाचे ओझे घेवून, घराबाहेर पडली होती. अंधारी काळोखी रात्र होती. ती रात्र सारंग कुटुंबीयांच्या आश्रयास काढली होती. दुसऱ्या दिवशी बाईत कुटुंबीयांची पडवी निवारा म्हणून मिळाली होती. आमच्या मालकीच्या गुरांची सोय, आईने तिच्या माहेरी मोंड गावी केली होती. तिथूनही गुरांची दावी सोडून, त्या गुरांना आणण्याचा प्रयत्न, त्या विकृत माणसांनी केला होता. त्यावेळी आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ते तिचे चुलत भाऊ व तिची काकी !
बाबांना, सारा प्रकार पत्राने आईने कळविला होता. नोकरीपायी ते येऊ शकले नाहीत. शिवाय भांडणे कोपाला जातील असा विचार करून, आईने नाडण मधील पुजारी यांची जमीन, घरासाठी ह्याच गावी मिळवली. मासे, कालवाची, गावोगावी डोक्यावर टोपली घेऊन, पायी अंतर कापत, विकू लागली होती. शेतात काम करून खाण्यापूरते धान्य पिकवत होती. गुरांची व आजीची काळजी घेत होती. बाबांनी पाठवलेल्या पैश्यावर घर बांधण्यास सुरुवात केली होती. घाटी चढून आई सोबत, माझी मोठी बहीण पाणी चढवत असे.
अति श्रम व जिद्द ठेवून आईने घर उभे केले.
ध्येयवादी माझ्या आईस, आजच्या महिला दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
माऊलीची कामगिरी एका घारीसारखी होती.
ऋण तुझे अपार,
ध्येय तुझे ठाम ॥
जन्मभूमी तुझी माय,
दूरदृष्टी तुला फार ॥
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/05/IMG_20210507_221714-150x150.jpg)
– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल
– संपादन : अलका भुजबळ. ☎️9869484800
खूप कठीण प्रसंगातून गेलात वर्षाताईतूम्ही (तूमची आई,कुंटूंबीय)नमन तूमच्या मातेला ,तिच्या उदरी जन्मलेल्या स्री शक्तीला.🙏🙏
वर्षा भाबल यांच्या कणखर मातेस आदरपूर्वक
वंदन!!