आईला जाऊन जवळ जवळ पाच दशके उलटली. पण प्रत्येक श्वासात आई कुठेतरी असतेच. तिच्या पाऊलखुणा जशा जाणवतात तसे हाताच्या खुणाही !
तिच्या हातचे कपबशांचे त्या काळातील पितळी छान सुबक टांगायचे घर ज्यावर ‘गृहलक्ष्मी’ अशी पितळी अक्षरे आहेत ते आजही मी जपून ठेवले आहे. तिच्या हातचे पोळपाट आणि विशेष म्हणजे ज्याने माझ्या पाठीशी अखंड संवाद साधला ते लाटणे आजही स्वयंपाक घरात कार्यरत आहे. नाही म्हणायला तिचा बसायचा सागवानी पाॅलीश केलेला आणि पितळी फुले असलेला पाट मात्र आज खिळखिळा झालेला असल्याने जरा बाजूला पडला आहे.
आईच्या हातची लाकडी मांडणी अजूनही आहे. कितीतरी दिवस मी तिचा बुक शेल्फ म्हणून वापर करीत होतो. त्यातील त्या काळातील वैभवी पितळी पातेले, पितळी तांबे, पितळी पेले परिस्थितीमुळे एकेक करुन माझ्या लहानपणीच मोडीच्या बाजारात गेले त्यामुळे त्याची हळहळ वाटत रहाते.
नाही म्हणायला एक पितळी चपटा डबा ज्यात आई गुळ ठेवायची आणि मी तो डब्यावर चढून चोरुन खायचो तो डबा आणि एक पितळी ताट ज्यात आई पेटत्या चुलीच्या उजेडात एकीकडे चुलीत लाकूड पुढे ढोशीत कणिक जोर्यात तिंबत रहायची ते ताट एवढेच शिल्लक आहे.
एक पितळी पंचपात्री होती पण ती बहिणीच्या लग्नात ऐनवेळी पंगतीत स्वयंपाक संपल्याने आतेमामाने ती घेऊन पैसे पुरवले होते.
एक पाणी तापवायचा बंबही होता ज्यात कधीकाळी रागाच्या सपाट्यात बाबांची प्रमाणपत्रे आणि माझा ‘नवा व्यापार’ हा खेळ जो तिला एकप्रकारे जुगाराचा खेळ वाटला तो आईने स्वाहा केला होता.
आईच्या हातचा एक लाकडी सोर्या आहे. तो पाहिला की दिवाळीच्या दिवसात लगबगीने तिखट शेव व चकल्या करणारी आई आठवते. तिच्या गळ्यातील पोवळ्याची माळ, तिची मोरपंखी चोळी आणि पैठणी कधी कधी अचानक पुढे येतात आणि तिची आठवण करुन देतात.
ती सकाळी जी घडीची आरशाची पेटी उघडायची ती काळाच्या ओघात कुठे गेली कोणास ठाऊक. देवघरात त्याकाळी भिंतीवर एक लाकडी मांडणीतला आरसा होता. त्यातील ड्रॉवरमध्ये मी गोट्या, लोखंडी चकत्या, सिगारेटच्या पाकीटांची कव्हर्स असे काहीबाही जमा करुन ठेवायचो आणि मग तेच मार खायचे निमित्त व्हायचे. ती मांडणीही काळाच्या ओघात कुठेतरी गेली.
आईच्या हातचा एक अवघ्या 20 रुपयांचा छोटा लाकडी टेबल होता जो मला हौसेने अभ्यास करण्यासाठी घेतलेला होता. एक लाकडी छोटे कपाटही होते जे अवघ्या 20 रुपयातच घेतले होते, ज्यात त्याकाळात दुधाचे भांडे आणि इतर संसार होता. त्यानंतर ते मी माझी पुस्तके ठेवण्यासाठी वापरले होते.
आज हे टेबल, घडीची लाकडी खुर्ची आणि लाकडी कपाट काहीही शिल्लक राहिले नाही. ज्या वस्तू शिल्लक राहिल्या त्या प्रत्येकीत आईची काही ना काही आठवण आहेच. आईच्या हाताचा तेव्हाचा खांबावर टांगून ठेवलेला छोटा ट्रान्झिस्टर ज्यात मी गाणारी बाई कुठे बसली आहे ते लहानपणी वाकून वाकून मी पहायचो आणि माझा हात पुरणार नाही एवढ्या उंचीवर जो मुद्दाम टांगून ठेवलेला होता तो ट्रांझिस्टरही आज राहिलेला नाही.
लहानपणी ती मला ज्या सिन्नरकर महाराजांच्या किर्तनाला घेऊन जायची त्या महाराजांकडून तिने घेतलेली श्रीराम नामावली मला खूप शोधल्यावर गवसली, तेव्हा किती आनंद झाला ! तिची पाने जीर्ण झालेली पण त्यांना तिच्या बोटांचा झालेला स्पर्श जणू अजूनही शिल्लक राहिलेला आहे.
आईचे अस्तित्व असे न पुसणारे आहे. कुठल्या न कुठल्या वस्तूच्या रुपाने त्याभोवती असलेल्या आठवणींच्या रुपाने ते अस्तित्व अगदी दरवळतच राहतेय !
– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800